मुंबई : (West Bengal Violence) भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. विरोधकांनी तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणलाय. “मागच्या वेळी तुम्हाला सोडलं, पण यावेळी पूर्ण जबाबदारी माझी आहे. ४ मेनंतर दिल्लीहून कोणाचा बाप तुम्हाला वाचवायला येतो ते पाहीन.” अशा स्वरूपाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे भाजप नेत्यांनी या घटनेला 'लक्ष्य करून केलेली राजकीय हत्या' असे संबोधले असून, अभिषेक बॅनर्जी यांच्या आक्रमक प्रचार भाषणांमुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप केलाय.
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्रामजवळ बुधवारी उशिरा रात्री दुचाकीस्वार अज्ञात हल्लेखोरांनी रथ यांच्या वाहनाला अडवून जवळून गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. रथ यांच्या हत्येनंतर भाजपने तृणमूल काँग्रेसवर भीती, दडपशाही आणि हिंसाचाराचे राजकारण केल्याचा आरोप केला. भाजप नेत्यांनी दावा केला की, अभिषेक बॅनर्जी यांच्या भाषेतून निवडणुकीपूर्वीची राजकीय हतबलता दिसून येत होती. (West Bengal Violence)
अशी माहिती आहे की, चार मोटारसायकलींवरून आलेले किमान आठ हल्लेखोर या कटात सहभागी होते. सर्वांनी हेल्मेट घातले होते. घटनास्थळी सिलीगुडी नोंदणी क्रमांक (WB 74) असलेले संशयित वाहन आढळले असून त्याची नंबर प्लेट बनावट असण्याची शक्यता तपासली जात आहे. गोळीबारात रथ गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे चालक बुद्धदेव बेहरा हे देखील गोळीबारात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (West Bengal Violence)
तृणमूल काँग्रेसने या घटनेचा निषेध करत न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पक्षाने दावा केला की, अलीकडच्या काळात टीएमसी कार्यकर्तेही हिंसाचाराचे बळी ठरले असून सर्व घटनांची सखोल चौकशी व्हावी. (West Bengal Violence)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक