मुंबई : (Trailer Driver Shortage) भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) ने बंदरात गर्दी आणि कामकाज ठप्प झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत कंटेनर टर्मिनल्स सुरळीतपणे कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे.
सीएफएसएआय आणि बीसीबीए यांनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर जेएनपीएने सांगितले की, बंदरातील सर्व पाच कंटेनर टर्मिनल्स पूर्ण क्षमतेने सुरू असून कोणताही अडथळा किंवा गोंधळ नाही. दररोज सरासरी १० ते १२ कंटेनर जहाजे बंदरात दाखल होत असून सुमारे २२ हजार टीईयू कंटेनर मालाची हाताळणी केली जात आहे. याशिवाय, दररोज जवळपास २० हजार टीईयू मालाची रस्तेमार्गे आणि २ हजार टीईयू मालाची रेल्वेमार्गे वाहतूक केली जात आहे.
जेएनपीए प्रशासनाने स्पष्ट केले की, सध्या निर्माण झालेली अडचण ही बंदरातील कामकाजामुळे नसून कंटेनर फ्रेट स्टेशन आणि कस्टम ब्रोकर्सकडून ट्रेलर्स व चालकांची अपुरी उपलब्धता यामुळे उद्भवली आहे. चालकांच्या कमतरतेमुळे कंटेनर उचलण्यासाठी येणाऱ्या ट्रेलर्सची संख्या घटली असून त्यामुळे मालवाहतुकीचा वेग कमी झाला आहे.(Trailer Driver Shortage)
बंदर प्रशासनाच्या माहितीनुसार, जेएनपीएची एकूण कंटेनर साठवण क्षमता १.७६ लाख टीईयू इतकी आहे. सध्या ऑक्युपन्सी १.१८ लाख टीईयू म्हणजेच केवळ ६७ टक्के आहे. यामध्ये २६ हजार टीईयू ट्रान्सशिपमेंट कंटेनर्सचा समावेश असून त्यामुळे बंदरात कोणतीही अतिरिक्त गर्दी निर्माण झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.(Trailer Driver Shortage)
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जेएनपीएकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रेल्वे सायडिंग असलेल्या सीएफएसपर्यंत कंटेनर्सची जलद रेल्वे वाहतूक, सीमाशुल्क विभागाशी समन्वय साधून मंजुरी प्रक्रियेला गती आणि पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश येथून सुट्टीवर गेलेल्या चालकांना परत आणण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.
जेएनपीएने सीएफएस आणि कस्टम ब्रोकर्सना तातडीने पुरेशा संख्येने ट्रेलर्स आणि चालक उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले असून, “बंदरातील कामकाज पूर्णपणे सुरळीत आहे आणि ग्राहकांना अखंड सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रशासनाने नमूद केले. (Trailer Driver Shortage)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.