॥सौंदर्यलहरी भाष्य भाग २३॥

    07-May-2026
Total Views |
Goddess Lalita
 
सवित्रीभिर्वाचां शशिमणि-शिला-भङ्ग-रुचिभि-
र्वशिन्यद्याभिस्त्वां सह जननि सञ्चिन्तयति यः|
स कर्ता काव्यानां भवति महतां भङ्गिरुचिभि-
र्वचोभिर्वाग्देवी-वदन-कमलामोद-मधुरैः॥१८॥
 
आचार्यांनी या श्लोकात देवी ललिताच्या उपासनेतून प्राप्त होणार्‍या, काव्यशक्तीचे अत्यंत विलोभनीय चित्र रेखाटले आहे. श्री ललिता देवीच्या श्रीचक्रात वसणार्‍या अष्ट वाग्देवता वशिनी, कामेश्वरी, मोदिनी, विमला, अरुणा, जयिनी, सर्वेश्वरी आणि कौलिनी या देवीच्या वाणीशक्तीच्या, विविध अंगांचे प्रतिनिधित्व करतात. या सर्व देवता चंद्रकांतमणीच्या शिळेवर पडलेल्या चंद्रप्रकाशाप्रमाणे शुभ्र, शीतल, स्निग्ध, चंदेरी कांती धारण केलेल्या सस्मित आणि वरदायिनी आहेत. या अष्ट वाग्देवता श्री ललिता त्रिपुरसुंदरीसह श्रीचक्रात विद्यमान आहेत.
 
अष्ट वाग्देवता या श्रीचक्रातील अंतर्दशारचक्रात, अर्थात चक्राच्या अंतर्भागातील दशदल कमळात वास करतात. प्रत्येक वाग्देवता वाणीच्या एका सूक्ष्म स्तराची अधिष्ठात्री आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणींच्या विविध शक्ती, त्यांच्यात सामावलेल्या आहेत. जेव्हा साधक या देवतांसह ललिताचे ध्यान करतो, तेव्हा त्याची वाणी केवळ वैखरी म्हणजे उच्चारित वाणी या एकाच स्तरावर राहात नाही, तर ती मध्यमा आणि पश्यंती या सूक्ष्म स्तरांनाही स्पर्श करते. अशा बहुस्तरीय वाणीतून निघालेले काव्य वाचकाच्या केवळ बुद्धीलाच नव्हे, तर अंतरात्म्यालाही स्पर्श करते. असेच काव्य थेट हृदयाला भिडते. असे काव्य प्रसवण्याची क्षमता, हे श्री ललिता देवी आणि अष्ट वाग्देवी यांच्या एकत्रित कृपेचे फळ आहे.
 
स्वतः श्री ललिता त्रिपुरसुंदरी ही मातृका वर्ण रूपिणी म्हणूनच पूजिली जाते. अष्ट वाग्देवी तिच्याच साहाय्यिका आहेत. परंतु, आचार्य इथे ललिता देवीच्या जोडीला, अष्ट वाग्देवींच्या उपासनेचे आणि कृपेचे महत्त्वही विशद करत आहेत. कारण, वर्णमालेतील १६ स्वर आणि ३४ व्यंजन यांची आपण विभागणी केली, तर त्याचे अष्ट भाग होतात आणि या एकेका भागाची अधिष्ठात्री देवता एक एक वाग्देवी आहे. या केवळ उपासना मूर्ती नसून, त्या संपूर्ण वर्णमालेच्या म्हणजेच संपूर्ण वाणीच्या, ज्ञानाच्या आणि सृष्टीच्या प्रकटीकरणासाठी साहाय्यभूत ठरणार्‍या शक्ती आहेत. योगिनीहृदय, तंत्रालोक (अभिनवगुप्त) आणि वरिवस्यारहस्य (भास्करराय) या ग्रंथांमध्ये, त्यांचे विस्तृत निरूपण आढळते.
 
प्रत्येक वाग्देवता वर्णमालेतील एका विशिष्ट वर्णगटाची अधिष्ठात्री असते. हे वर्णगट उच्चारस्थानानुसार विभागलेले आहेत. म्हणजे तोंडाच्या कोणत्या भागातून तो वर्ण उच्चारला जातो, यावर आधारित. कंठ, टाळू, मूर्धा (टाळूचा वरचा भाग), दात, ओठ, नासिका या स्थानांशी देवतांचा थेट संबंध आहे. अशा प्रकारे प्रत्येक उच्चार हा एक शक्तिप्रकटीकरण आहे, असे तंत्र परंपरेत मानले जाते. अष्ट वाग्देवता आणि त्यांचे अत्यल्प निरूपण, हे या श्लोकाचा योग्य पद्धतीने रसपरिपोष होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
 
१) वशिनी
 
स्वरूप आणि अर्थ : ‘वशिनी’ या नावाचा अर्थ वश करणारी किंवा इच्छाशक्तीची स्वामिनी असा आहे. ती अष्ट वाग्देवतांमध्ये प्रथम असून, इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. श्रीविद्या तंत्रात इच्छा, ज्ञान आणि क्रिया या तीन शक्तींपैकी, इच्छाशक्ती ही सर्वाधिक मूलभूत मानली जाते. वशिनी त्याच इच्छाशक्तीचे साक्षात रूप आहे. वशिनी देवी संपूर्ण स्वरवर्गाची अधिष्ठात्री असून, मराठी आणि संस्कृत वर्णमालेतील एकूण १६ स्वर तिच्या अखत्यारीत येतात
 
र्‍हस्व स्वर (५) : अ, इ, उ, ऋ, लृ
दीर्घ स्वर (५) : आ, ई, ऊ, ॠ, लॄ
संधिस्वर (४) : ए, ऐ, ओ, औ
अयोगवाह (२) : अं (अनुस्वार), अः (विसर्ग)
 
उच्चारस्थान : स्वरांचे उच्चार विविध स्थानांतून होतात. ‘अ’ हा कंठातून निघणारा मूलभूत स्वर आहे. ‘इ’ आणि ‘ई’ तालव्य आहेत, टाळूपासून उच्चारले जातात. ‘उ’ आणि ‘ऊ’ ओष्ठ्य आहेत, ओठांच्या साहाय्याने उच्चारले जातात. ‘ऋ’ आणि ‘ॠ’ हे मूर्धन्य स्वर असून, जिभेचे अग्र टाळूला स्पर्श करते. ‘लृ’ आणि ‘लॄ’ हे दंत्य-तालव्य आहेत. ‘ए’ आणि ‘ऐ’ कंठतालव्य, तर ‘ओ’ आणि ‘औ’ कंठोष्ठ्य आहेत. अनुस्वार (अं) नासिकेतून, तर विसर्ग (अः) कंठातून उच्चारला जातो.
 
स्वर हे वाणीचे बीज असून, व्यंजनांना स्वराशिवाय उच्चार नाही. त्यामुळे वशिनी ही वाणीची, ज्ञानाची आणि सृष्टीच्या उत्पत्तीची मूळ शक्ती मानली जाते. जसे बीजाशिवाय वृक्ष नाही, तसेच स्वराशिवाय भाषा नाही.
 
२. कामेश्वरी
 
स्वरूप आणि अर्थ : कामेश्वरी म्हणजे काम-कलेची ईश्वरी, इच्छा आणि सौंदर्याची देवी. श्रीविद्येमध्ये कामेश्वर-कामेश्वरी हे शिव-शक्तीचे परम् युगल आहे. वाग्देवतांसंदर्भात कामेश्वरी ही ‘क’ वर्गाची, म्हणजे कंठातून उत्पन्न होणार्‍या वर्णांची अधिष्ठात्री देवी आहे.
 
अधिकृत वर्णसमूह - कवर्ग
कवर्ग (५) : क, ख, ग, घ, ङ
 
उच्चारस्थान : कंठ्य. कवर्गातील सर्व पाच वर्ण कंठातून, म्हणजेच घशातून उच्चारले जातात. या वर्णांना ‘कंठ्य’ असे म्हणतात. या वर्णांच्या उच्चारावेळी जिभेचे मूळ (जिभेचा मागचा भाग) मऊ टाळूला (कोमल तालूला) स्पर्श करते आणि श्वास त्या स्पर्शावर प्रस्फुटित होतो.
 
‘क’ आणि ‘ख’ हे अघोष (कंठातील कंप नाही) आहेत. ‘ग’ आणि ‘घ’ हे घोष (कंठात कंप) आहेत. ‘ङ’ हा अनुनासिक कंठ्य वर्ण आहे. उच्चारात नासिकेचाही सहभाग असतो. कामेश्वरी या शक्तीची संबंधितता कंठाशी असल्याने, ती वाणीच्या उगमस्थानाची देवी ठरते; कारण वाणी कंठातूनच उत्पन्न होते, असे मानले जाते.
 
३. मोदिनी
 
स्वरूप आणि अर्थ : मोदिनी म्हणजे आनंद देणारी किंवा प्रसन्न करणारी. ती आनंदशक्तीचे प्रतीक आहे. तंत्रात वाणीतून आनंद कसा प्रकट होतो, याचे प्रतीक म्हणून मोदिनीला चवर्गाची-तालव्य वर्णांची अधिष्ठात्री मानले जाते.
 
अधिकृत वर्णसमूह - चवर्ग
चवर्ग (५) : च, छ, ज, झ, ञ
 
उच्चारस्थान - तालव्य. चवर्गातील वर्ण तालव्य आहेत; म्हणजे टाळूपासून उच्चारले जातात. या वर्णांच्या उच्चारावेळी, जिभेचा मध्य भाग कठोर टाळूला (दाट टाळूला) स्पर्श करतो.
 
‘च’ आणि ‘छ’ अघोष तालव्य आहेत. ‘ज’ आणि ‘झ’ घोष तालव्य आहेत. ‘ञ’ हा अनुनासिक
तालव्य वर्ण आहे. तालू हे भाषाशास्त्रात ‘मध्यम स्थान’ मानले जाते, कंठ आणि दंत यांच्यामध्ये. त्यामुळे ‘मोदिनी’ ही मध्यस्थ, संतुलन राखणारी, आनंद प्रवाहित करणारी शक्ती म्हणून ओळखली जाते.
 
४. विमला
 
स्वरूप आणि अर्थ
 
विमला म्हणजे निर्मल, शुद्ध, मलरहित. ती शुद्धशक्तीचे प्रतीक आहे. विमला देवी टवर्गाची-मूर्धन्य वर्णांची अधिष्ठात्री आहे. मूर्धन्य वर्णांच्या उच्चारात, एक प्रकारची दृढता, स्पष्टता आणि निर्मलता असते, जी विमलेच्या शुद्ध स्वभावाशी सुसंगत आहे.
 
अधिकृत वर्णसमूह - टवर्ग
टवर्ग (५) : ट, ठ, ड, ढ, ण
 
उच्चारस्थान - मूर्धन्य. टवर्गातील वर्ण मूर्धन्य आहेत; म्हणजेच मूर्धा (टाळूचा सर्वांत वरचा व मागचा भाग) येथून उच्चारले जातात. या वर्णांच्या उच्चारावेळी जिभेचे अग्र भाग वाकवून, टाळूवर आपटवले जाते. म्हणून यांना 'retroflexed’ असेही म्हणतात.
‘ट’ आणि ‘ठ’ अघोष मूर्धन्य आहेत. ‘ड’ आणि ‘ढ’ घोष मूर्धन्य आहेत. ‘ण’ हा अनुनासिक मूर्धन्य वर्ण आहे. मूर्धन्य वर्ण हे भारतीय भाषांचे एक वैशिष्ट्य आहे. युरोपीय भाषांमध्ये हे उच्चारस्थान फारसे आढळत नाही. विमला देवीशी मूर्धन्य वर्णांचा संबंध, हा ‘शीर्ष-शक्ती’ म्हणजे सर्वोच्च, शुद्ध शक्ती या कल्पनेशी जोडलेला आहे.
 
 
- सुजीत भोगले