आदर्श गृहिणी आणि शिक्षणसेवेला समर्पित समाजसेविका म्हणून सुहासिनी देव यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरते. त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
पेणसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध; पण शिक्षणाच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत कधीकाळी मर्यादा असलेल्या शहरात, एका स्त्रीने आपल्या सासूबाईंच्या पावलावर पाऊल ठेवत अत्यंत जिद्दीने, कष्टाने आणि दूरदृष्टीने शिक्षणाचा दीप तेवत ठेवला; त्या विदुषी म्हणजे सुहासिनी घनश्याम देव. आदर्श गृहिणी, कुशल संघटक आणि शिक्षणसेवेला आयुष्य अर्पण केलेली समाजकर्ती अशी त्यांची ओळख . सुहासिनी यांचे बालपण पुण्यासारख्या शिक्षणनगरीत गेले. लक्ष्मीरोड परिसरात त्यांचे घर होते. वडील सराफी व्यवसायात असून, रत्नपारखी होते. त्यामुळे घरात सधनता आणि स्थैर्य होते. एकत्र कुटुंबातील संस्कार, शिस्त आणि परंपरा यांचे धडे त्यांना लहानपणापासूनच मिळाले. त्यांनी आपले शालेय शिक्षण शनिवार पेठेतील अहिल्यादेवी विद्यालयात पूर्ण केले. मात्र, आयुष्याने त्यांना लवकरच कठीण वळण दिले; लहान वयातच पितृछत्र हरपले. आई गृहिणी आणि लहान भाऊ यांची जबाबदारी समोर उभी राहिली. पण, या कठीण प्रसंगांनीच सुहासिनी यांना अधिक सक्षम बनवले.
लहानपणापासूनच त्यांना खेळांची विशेष आवड होती. खो-खो, कबड्डी, योग, लेझीम अशा विविध शारीरिक उपक्रमांत त्या उत्साहाने सहभाग घ्यायच्या. दामले यांच्या महाराष्ट्र मंडळात त्यांना या क्षेत्रातले मार्गदर्शन मिळाले. या सर्वांमुळे त्यांच्यात शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित झाली, जे पुढे त्यांच्या सामाजिक कार्यात उपयोगी पडले. १९६७ साली त्यांचा विवाह झाला आणि त्या पेणमध्ये सासरी आल्या. मोठ्या कुटुंबात त्यांनी सहजतेने आपले स्थान निर्माण केले. पती, त्यांच्या तीन बहिणी, सासू-सासरे आणि आजेसासू अशा मोठ्या कुटुंबात राहूनही त्यांनी घरातील जबाबदार्या समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या सासूबाई अत्यंत हुशार, दूरदर्शी आणि धाडसी होत्या. त्यांच्याच प्रेरणेने सुहासिनी यांच्यामध्ये सामाजिक कार्याची आवड अधिक बळकट झाली. पेणमध्ये लहान मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा अपुर्या असल्याची जाणीव सासूबाईंना झाली आणि त्यांनी बालवाडी सुरू करण्याचा निर्धार केला. या संकल्पनेतून ‘पेण शिक्षण महिला समिती’ची स्थापना झाली. १९५५ साली पहिली बालवाडी सुरू झाली. हे त्या काळातील अत्यंत धाडसी आणि परिवर्तनवादी पाऊल होते. पुढे १९६५ पासून इयत्ता पहिलीचे वर्ग सुरू झाले आणि आज ही संस्था इयत्ता दहावीपर्यंत मराठी व इंग्रजी माध्यमांतून शिक्षण देत आहे.
सासूबाईंच्या या महान कार्याचा वारसा सुहासिनी यांनी अत्यंत निष्ठेने पुढे नेला. १९९९ पासून त्या या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी संस्थेचा केवळ विस्तारच केला नाही, तर तिची गुणवत्ता, शिस्त आणि विश्वासार्हतादेखील जपली. आज या संस्थेत सुमारे १३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेत सुमारे एक हजार, ७००; तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुमारे एक हजार, ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १९९७-९८ साली सासूबाईंच्या कार्याचा गौरव म्हणून ‘श्रीमती सुमतीबाई देव प्राथमिक-माध्यमिक विद्यालय’ सुरू करण्यात आले. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे सर्व व्यवहार ‘कॅशलेस’ पद्धतीने पार पडतात. शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रशासनाचा हा आदर्श नमुना. सुहासिनी यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढवला. त्यांच्या संस्थेत समाजातील सर्व स्तरांतील महिलांना संधी दिली जाते. त्या नेहमी म्हणतात की, "समाजकार्य करताना सर्वप्रथम प्रामाणिकपणा आवश्यक आहे.” त्यांच्या या तत्त्वामुळेच संस्थेला समाजाचा मोठा विश्वास मिळाला आहे.
आज पालकांकडून संस्थेकडे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याची मागणी होत आहे, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती म्हणावी. बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या गरजा ओळखून त्या नवीन उपक्रम राबवण्यासही सज्ज आहेत. सुहासिनी देव यांची वाटचाल म्हणजे, संघर्षातून उभे राहण्याची, परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याची आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. एक आदर्श गृहिणी म्हणून घर सांभाळत, संस्थेचे नेतृत्व करत आणि एक संवेदनशील समाजसेविका म्हणून त्यांनी आपले आयुष्य अर्थपूर्ण केले. सुहासिनीताईंना त्यांचे पती घनश्याम देव यांचेही याकामी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सुहासिनी यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली ही संस्था केवळ शिक्षण देणारी शाळा राहिलेली नाही, तर ती अनेक कुटुंबांसाठी आशेचा आणि प्रगतीचा आधारवड ठरली आहे. ग्रामीण व निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी होत समाजात आपले स्थान निर्माण करत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी फलश्रुती. सुहासिनी यांचे कार्य हे केवळ पेणपुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक आदर्श ठरावे असेच. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने त्यांच्या जिद्दीला, समर्पणाला आणि कार्याला शुभेच्छा!