राज्यात जहाजबांधणी आणि सागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाला वेग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य स्थळांचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश; आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश

    07-May-2026
Total Views |
shipbuilding project
 
मुंबई : (Shipbuilding Project Maharashtra) राज्यातील जहाजबांधणी व सागरी पायाभूत सुविधा विकासासाठी नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग या स्थळांचा तांत्रिक व आर्थिक आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्गला प्राधान्य देत सर्वेक्षण, पुनर्भरण, ट्रॅफिक लाँचिंग आणि सागरी पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. तसेच, जहाजबांधणी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना प्राथमिक माहिती व अहवाल उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.
 
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि.७ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी जहाजबांधणी प्रकल्पासाठी संभाव्य स्थळांबाबत सादरीकरण केले. यावेळी विविध स्थळांच्या तांत्रिक क्षमता, समुद्रातील खोली, भूगर्भीय स्थिती, संपर्क व्यवस्था आणि भविष्यातील औद्योगिक संधींचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, हस्कोनिंग कंपनीचे जॉन सम्यूएल, बिजापूर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.(Shipbuilding Project Maharashtra)
 
 
यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, “गोव्याच्या सर्वाधिक जवळ असलेला आणि सागरी विकासासाठी सक्षम असलेला भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. या परिसरात सुमारे ३० एकर जागेची ओळख पटवून संबंधित वन विभागाच्या अडचणींचा स्पष्ट आढावा घ्यावा.” तसेच संभाव्य स्थळांचे तत्काळ प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भविष्यात जहाजबांधणी, शिपिंग, सागरी पर्यटन आणि संबंधित उद्योगांमध्ये वाढत्या गुंतवणुकीच्या संधी लक्षात घेता महाराष्ट्र शासन विविध किनारी भागांमध्ये धोरणात्मक नियोजन करत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.(Shipbuilding Project Maharashtra)