"मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त!" वाकोल्यातील बाजारात महापौर रितू तावडे यांनी कोळी भगिनींना दिला शब्द

    07-May-2026
Total Views |
Ritoo Tawde Koli Community Statement
 
मुंबई : (Ritoo Tawde Koli Community Statement) ‘वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे वाकोलासह मुंबईतील सर्व मासळी बाजारांमधील कोळी भगिनींनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः खंबीरपणे उभी आहे. मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त,’ अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुरुवार, दि. 7 मे रोजी मासळी व्यावसायिकांना आश्वस्त केले आहे.
 
वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने निर्बंध लादल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. विरोधकांकडून विशेषत: उबाठा गटाच्या नेत्यांकडून हा अपप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. यामुळे मासळी विक्रेत्या महिला आणि कोळी बांधवांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या प्रकरणी विरोधी पक्षांनी सत्ताधार्‍यांवर टीका सुरु केली होती.(Ritoo Tawde Koli Community Statement)
 
या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी थेट वाकोला मासळी बाजारात धाव घेतली. तेथील मासळी विक्रेत्या महिलांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. महापौर रितू तावडे यांनी यावेळी सांगितले की,‘मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. कोळी भगिनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः आणि संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका खंबीरपणे उभी आहे. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मासे कापण्याच्या अनुषंगाने ज्या काही बातम्या पसरवल्या गेल्या, तो अपप्रचाराचा भाग आहे.’
 
यावर स्थानिक कोळी भगिनींनीही आपल्याला कोणीही रोखले नसल्याचे आणि कुणीही त्रास देत नसल्याचे स्पष्ट केले. त्याववर ‘’जर कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर थेट माझ्याशी संपर्क करावा, सर्व अडचणींचे निराकरण मी स्वतः करीन,‘’ असा शब्द महापौरांनी मासळी विक्रेत्या भगिनींना दिला.(Ritoo Tawde Koli Community Statement)
 
असे आदेश दिलेलेच नाहीत : गणेश खाणकर
 
या वादाबाबत भारतीय जनता पक्षाचे महापालिका गटनेते गणेश खणकर म्हणाले की, ‘मासे कापायला बंदी, असा कोणताही प्रकार घडलेला नाही. जाणून-बुजून चुकीचा नरेटिव्ह पसरवला जात आहे. कोणीही अशा प्रकारचे आदेश दिलेले नाहीत. यामुळे कारण नसताना अफवांवर विश्वास ठेवू नये. ’
 
तर कठोर कारवाई करा : उपमहापौर संतोष घाडी
 
उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, ‘मासे पूर्ण द्यावेत, कापून देऊ नये किंवा वास येऊ नये असे कोणतेही आदेश मुंबई पालिका प्रशासनाने दिलेले नाहीत. असे आदेश कोणी दिले असतील तर त्याची चौकशी व्हावी. संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई अशी आमची मागणी आहे.’(Ritoo Tawde Koli Community Statement)