बाबा, त्या कोलकात्याच्या आत्याबाई वाघिणीसारख्या लढत आहेत, असं तुम्ही म्हणाला होतात. पण, त्या हरल्या. लोक म्हणत आहेत की, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने आपला पोपट केला. आता कोलकात्याच्या आत्याबाईंचा पण पोपट झाला. तर, बाबा तुम्ही आत्याबाईला वाघीण बोललात आणि लोकांनी आत्याबाईंचा पोपट केला! जादूचा खेळ. होय ना बाबा? शूऽऽ गप्प बस. असं नाही म्हणायचं बाळा. आपले दिल्लीतले राजकुमार काय म्हणाले की, त्या हरल्या नाहीत. त्या पण तर म्हणाल्या की, त्यांचा नैतिक विजय झाला आहे, तर आपणही म्हणायचं की, त्याच विजयी झाल्या. बाबा, पण लोक म्हणतात की, पोपट मेला हे ममता बॅनर्जींना कुणीच सांगत नाही! बाबा, कोलकात्याच्या आत्याबाईंकडे पोपट होता? बाबा हे कोण म्हणतं की, आत्याबाईंकडे पोपट होते की नाही माहिती नाही; पण त्यांच्याकडे सत्तेसाठी हिंदूंना दुय्यम वागणूक देणारे लबाड लांडगे होते.
बाबा, आपण मुंबईमध्ये पेंग्विन आणले तसे आत्याबाईंनी तिथे लबाड लांडगे आणले का? जाऊ दे बाबा, आत्याबाईला पोपट मेला हे कुणी का सांगत नाही? कोणता पोपट होता त्यांच्याकडे? बाबा, हे कोण म्हणतंय की, तुम्ही स्वतःला महाराष्ट्र समजायचा आणि दीदी स्वतःला पं. बंगाल समजायची, स्वतःबद्दल तुम्हाला आणि दीदीला जो गैरसमज होता ना, तो गैरसमज म्हणजे पोपट होता? पण, लोकांनी निर्णय दिला की, दीदी म्हणजे प. बंगाल नाही. त्यामुळे स्वतःला राज्य समजण्याच्या गैरसमजाचा जो पोपट होता ना, तो मेला. बाबा, म्हणजे आत्याबाई हरल्या, हे त्यांना कुणीच सांगत नाही. बाबा, आत्याबाई म्हणाल्या की, त्या राजीनामापण देणार नाहीत. हो बाळा, मी म्हणालो होतो ना; ती वाघीण आहे. बाबा, हे बघा ना कोणीतरी काय म्हणते आहे. हे कोण म्हणते आहे की, आत्याबाईंनी ‘माँ, माटी, मानुष’ म्हणून प. बंगालमध्ये बंगाली अस्मिता भरकटवण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यामध्ये इतक्या गुंग झाल्या की, प. बंगालमध्ये हिंदूही राहतात हेसुद्धा त्या विसरून गेल्या. त्यामुळे त्या हारणारच होत्या. बाबा, हे कोण आहे जे बोलते की, आत्याबाईंची हार हा जनतेचा आवाज आहे आणि ममता बॅनर्जी हरल्या नाहीत, त्यांचा नैतिक विजय झाला म्हणणे म्हणजे आत्याबाईंना मिशा असत्या, असेच म्हणणे आहे.
‘पाखंखुआ’ संघटना!
लोकशाही परंपरेनुसार, निवडणूक घेऊन जनमताद्वारे भाजप जिंकला. पण, राहुल गांधी म्हणतात की, भाजपने ‘व्होट’ चोरले आणि ते सत्तेत आले. दुसरीकडे ममता बॅनर्जी प. बंगालमध्ये निवडणूक हरल्या, तर त्या जनादेश नाकारून म्हणत आहेत की, प. बंगालमध्ये त्याच जिंकल्या. तर, इकडे महाराष्ट्रात ‘उबाठा’ गट ममता बॅनर्जींच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसतो. असे करून ममता बॅनर्जींसह राहुल गांधी आणि त्यांचे समर्थन करणारा ‘उबाठा’ गट हे संविधानात्मक तरतुदींना नाकारत आहेत. संविधानाचा अपमानच करत आहेत. पण, संविधानाचा अपमान झाला हे म्हणायला ना ‘डफली गँग’ पुढे सरसावली, ना सदान्कदा ‘संविधान खतरे में है’ असे म्हणणारे खोटे पुरोगामी निधर्मी लोक पुढे आले.
तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रमुकची आघाडी होती. पण, तामिळनाडूमध्ये ‘टीव्हीके’ पक्ष जिंकला. ‘टीव्हीके’कडे सत्तेची चावी जाणार हे दिसताच, काँग्रेसचा कल ‘टीव्हीके’सोबत जाण्याचा दिसू लागला. यावर द्रमुकने प्रतिक्रिया दिली की, ‘काँग्रेस ‘टीव्हीके’सोबत जाण्याचा कल दिसतो. म्हणजे काँग्रेस पाठीत खंजीर खुपसत आहे.’ दोन समान विचारांच्या व्यक्तींमध्ये किंवा संघटनेमध्येच एकी होते, हे जगजाहीर आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची शरद पवार गटासोबत आघाडी. शरद पवार यांचे नाव जरी घेतले, तरी ‘खंजीर’ आणि ‘पाठ’ आपसूक डोळ्यांसमोर उभी राहते. तर, काँग्रेसचा दुसरा सोबती ‘उबाठा’ गट. २०१९ मध्ये तर ‘उबाठा’ गटाने पण भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला होता, असे लोक म्हणतात. तर, हे दोघे काँग्रेसचे साथीदार आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, या सगळ्या समविचारी पक्षांची ‘पाठीत खंजीर खुपसणार’ अशी एक टोळीच बनवायला हरकत नाही. असो. तर आपणही अनेक राज्यांत सत्तेवर आहोत किंवा विरोधी पक्षांच्या आघाडीचा प्रमुख पक्ष आहोत, हे दाखवण्याचा काँग्रेसचा आटापिटा सुरू आहे. ममता आणि स्टॅलिन यांचा पराजय झाला म्हणून काँग्रेसला आता हुरूप आला. आघाडीचा शिलेदार म्हणून काँग्रेसच हक्क सांगणार, असे काँग्रेसींना वाटते. काय म्हणावे, एकमेकांना हरवून पुन्हा एकत्रितरीत्या भाजपकडून हरलेले हे पक्ष! यांना ‘पाठीत खंजीर खुपसा आघाडी’ (पाखंखुआ) नाव द्यावे का?