गोंधळात गोंधळ अन् विरोधात विरोध!

    07-May-2026
Total Views |
Bengal
 
बंगालमधील भाजपच्या भव्य विजयाने सर्वच प्रादेशिक पक्षांच्या मनात धडकी भरली आहे. आता पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्येही आपल्याला पराभव चाखावा लागेल, अशी भीती समाजवादी पक्ष व ‘आप’च्या नेत्यांच्या मनात घर करीत आहे. विरोधी पक्षांमध्येच पुन्हा नव्या जुळवाजुळवीची तयारी सुरू झालेली दिसते. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्येही आपला मित्र कोण आणि गद्दार कोण, याबद्दल संभ्रमाचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.
 
पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या भव्य-दिव्य विजयाने सर्वच विरोधी पक्षांचे धाबे दणाणले आहेत. तब्बल १५ वर्षे एकहाती आणि निष्ठूरपणे सत्ता राबविणार्‍या ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा भाजपने कसा धुव्वा उडविला, ते पाहून पुढील नंबर आपला, याची जाणीव काही प्रादेशिक पक्षांमध्ये निर्माण झालेली दिसते. पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाब या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात सलग दहा वर्षे भाजपने सत्ता राखली असून, आजही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियताही कायम आहे. किंबहुना, त्यांची लोकप्रियता आता अन्य राज्यांमध्येही वाढलेली पाहून विरोधकांचे अस्वस्थ होणे स्वाभाविकच. उत्तर प्रदेशसारखे महत्त्वाचे राज्य भाजप सहजासहजी हातचे जाऊ देणार नाही, हेही विरोधकांना समजून चुकले आहे. त्यातच ज्या मुस्लीम मतपेढीच्या जीवावर या विरोधी पक्षांना आत्मविश्वास वाटत होता, तिचा कसलाच प्रभाव आसाम व प. बंगालमध्ये दिसला नसल्याने त्यांची घालमेल वाढत चालली आहे.
 
हिंदूंचा आजवर यथेच्छ अपमान करून आणि मुस्लीम समाजाचे टोकाचे लांगूलचालन करून, या पक्षांनी आपली प्रतिमा बहुसंख्य हिंदूंमध्ये मलिन केली. ती इतक्या कमी कालावधीत बदलणे शक्य नाही, हेही त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे या निवडणुका कशा जिंकायच्या, हा मोठा यक्षप्रश्न या विरोधकांपुढे उभा राहिलेला दिसतो. हिंदूंमध्ये आता एकजूट निर्माण होत असून, त्यामुळे मुस्लीम मतपेढी निरर्थक ठरली. पण, आजवर हिंदूंना कस्पटासमान लेखल्याने या प्रादेशिक पक्षांवर ‘मुस्लीमधार्जिणे पक्ष’ असा शिक्का बसला आहे. तोच निवडणुकीत सर्वांत मोठा अडथळा ठरणार आहे. सोमवारी लागलेल्या विधानसभा निकालांमुळे विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास वाढीला लागला. ज्याच्याशी निवडणूकपूर्व युती केली, अशा पक्षाचीही साथ सत्तेसाठी सोडण्यास काही पक्ष तयार आहेत. तामिळनाडूत द्रमुक-काँग्रेस युतीचा दारुण पराभव झाल्यावर काँग्रेसने २४ तासही वाट पाहिली नाही आणि द्रमुक पक्षाशी असलेली आपली निवडणूकपूर्व युती तोडून नवा सुपरस्टार विजयच्या पक्षाशी हातमिळवणी केली. तीच गोष्ट अन्य छोट्या पक्षांची. विजयच्या ‘टीव्हीके’ पक्षाला बहुमतासाठी केवळ ११ जागा कमी पडल्या आहेत. त्यामुळे अन्य छोट्या पक्षांची मदत घेऊन सरकार बनविण्यासाठी विजय उत्सुक आहे. निवडणुकीत पराभव होऊनही सत्ता मिळत असेल, तर कोणता पक्ष अशी संधी सोडेल? त्यामुळे सर्वच छोट्या पक्षांमध्ये ‘टीव्हीके’शी हातमिळवणी करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. छोट्या पक्षांच्या या भूमिकेमुळे द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षांच्या आमदारांमध्येही चलबिचल सुरू झाली. कारण, या दोन्ही पक्षांतील काही आमदारांनाही आता सत्ता खुणावते आहे. परिणामी, या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडण्याची शयता दिसते. कारण, कोणालाच पाच वर्षे विरोधात बसायचे नाही.
 
भाजप विरोधातील ‘इंडी’ आघाडीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष असला, तरी खरे बलवान पक्ष ममतांचा तृणमूल काँग्रेस व एम. के. स्टॉलिन यांचा द्रमुक हेच होते. या दोन पक्षांना आपापल्या राज्यात भक्कम बहुमत होते. या पक्षांचीही मदार मुस्लीम मतपेढीवर आणि विभाजित हिंदू मतदारांवर होती. पण, अशा या बलाढ्य पक्षांचाही भाजपने जो पालापाचोळा केला, ते पाहून अखिलेश यादव आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या पोटात गोळा आला आहे. आता राज्यात सत्ता नसल्याने आणि साधी आमदारही न राहिल्याने ममता बॅनर्जी या मोकळ्याच आहेत. आपण आता ‘इंडी’ आघाडी अधिक मजबूत करण्याचे काम करू, असे त्यांनी जाहीर केले आहे, ते पाहून मतदारांची करमणूक होत आहे. ‘इंडी’ आघाडीतील प्रत्येक पक्ष एकमेकांचा प्रतिस्पर्धी. ममता बॅनर्जी तर प. बंगालमध्ये काँग्रेससाठी एक जागाही सोडण्यास तयार नसतात. डाव्या आघाडीशी तर त्यांचे जन्मजात वैर. मग लोकसभेत बंगालमध्ये कोणती ‘इंडी’ आघाडी उभी राहणार आहे, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक!
 
तामिळनाडूत तर द्रमुकच्या जीवावर उड्या मारणार्‍या काँग्रेसने आता त्या पक्षाचीही साथ सोडून दिली. तरीही, त्या राज्यात ‘इंडी’ आघाडी अस्तित्वात आहे, हे फक्त वेडसर माणूसच मान्य करील. तशात लोकसभा निवडणुकीतही विजयचा पक्ष आतासारखीच नेत्रदीपक कामगिरी करेल, याची शंका आहे. येती दोन वर्षे या पक्षाचे सरकार कसे काम करते आणि दिलेल्या वचनांपैकी किती वचनांची पूर्ती करते, त्यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून राहतील. ‘आम आदमी पक्ष’ हा तर गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांत प्रथम ‘इंडी’ आघाडीतून बाहेर पडला होता. त्यानंतर दिल्ली विधानसभेत तो भाजपपेक्षा काँग्रेसशीच अधिक लढत होता, असे दिसले. पंजाबमध्ये त्याने काँग्रेसचा पराभव करूनच सत्ता मिळविली. त्यामुळे त्या राज्यात तो स्वतंत्रपणे निवडणूक लढवील, हे उघडच आहे. आता तर राज्यसभेतील त्याचे बहुसंख्य खासदार भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्याची शक्ती अगदीच कमकुवत झाली आहे. मग ‘इंडी’ आघाडी शिल्लक राहिली कुठे?
 
एकंदरीतच, विरोधकांमध्ये ‘गोंधळात गोंधळ’ नाट्याचा प्रवेश सुरू झाला आहे. कोण कोणाचा मित्र आहे, हे कोणालाच ठाऊक नाही. यांपैकी कोणतेही पक्ष आपापल्या राज्यात या कथित ‘इंडी’ आघाडीतील मित्रपक्षासाठी जागा सोडणार नाहीत. कारण, सारे विरोधी पक्ष हे पूर्णपणे सत्तालोलुप आहेत. तामिळनाडूत काँग्रेसने त्याची झलक दाखवून दिलीच आहे. शिवाय, या आघाडीतील कोणत्याही पक्षाचा आपले राज्य सोडले, तर दुसर्‍या राज्यात कसलाच प्रभाव नाही. त्यामुळे सत्ता मिळण्याची किंचितशीही संधी कोणी सोडणार नाही. आता विरोधी पक्षांमध्येच एकमेकांविरोधाचे राजकारण सुरू झाले आहे.
 
- राहुल बोरगांवकर