वाटेचा राजमार्ग करूया...!

    07-May-2026
Total Views |
Bengal BJP Victory
 
प. बंगालमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाची परिणती ही केवळ ममतादीदींच्या बेबंदशाहीचाच परिणाम नाही, तर हिंदू जागृतीचा तो नवअध्याय ठरला आहे. त्यामुळे आता सम्राट गोपालपासून, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर यांसारख्या धुरिणांनी दाखवलेल्या हिंदुत्वाच्या वाटेचा राजमार्ग करण्याचा संकल्प करावा लागेल.
 
इतिहासाची पुनरावृत्ती होते, अशी एक उक्ती आहे. बंगालमधील ममतादीदींची जनतेने केलेली उचलबांगडी ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. इ.स. ७५० या काळात आपण जाऊ. तेव्हा बंगालमध्ये ‘ममताराज’ निर्माण झाले. ‘ममताराज’ म्हणजे गुंडगिरी, सिंडीकेटशाही, गुंडांचे आणि पक्षकार्यकर्त्यांचे समांतर सरकार, सर्व प्रकारची असुरक्षितता, यात जनता भरडली गेली. ती वैतागली, समाजातील जाणती मंडळी एकत्र आली आणि त्यांनी त्यांच्यातील एका कर्तृत्ववान तरुणाला आपला नेता म्हणून निवडले. त्याचे नाव गोपाल. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे त्याला राजा म्हणून घोषित केले आणि या गोपालपासून ‘पालवंश’ सुरू झाला. ‘पाल साम्राज्य’ निर्माण झाले. बंगालची अभूतपूर्व भरभराट झाली. खर्‍या अर्थाने ‘सोनारबंगा’ निर्माण झाले. बंगालच्या जनतेने या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. आताच्या काळाप्रमाणे ‘राजवंश’ निर्माण न करता ‘पक्षवंश’ निर्माण केला. सम्राट गोपालने ज्याप्रमाणे बंगाल आणि आजूबाजूच्या प्रदेशात मोठे साम्राज्य उभे केले, तसे साम्राज्य आधुनिक काळात आधुनिक संकल्पनांच्या आधारे आताच्या नवबंगालला उभे करावे लागेल. दि. ४ मे २०२६ हा दिवस बंगालच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदविला जाईल, एवढे कर्तृत्व नवीन राजवटीला दाखवावेच लागेल.
 
बंगालचा इतिहास पाहिला असता, उत्थान आणि पतन या चक्रातून बंगाल गेलेला आहे. समृद्ध आणि कर्तृत्ववान राजवंश बंगालने पाहिले. नंतर आलेल्या आक्रमक मुस्लीम राज्यकर्त्यांची भयानक क्रूरता अनुभवली. बख्तियार खिलजीने ‘नालंदा’ विद्यापीठ उद्ध्वस्त केले. बंगाल जिंकला आणि तलवारीच्या धारेवर बंगाली हिंदूंना मुसलमान केले. आजचा बांगलादेश मुसलमानमय दिसत असला, तरी ते सर्व हिंदू मुसलमान आहेत, ही गोष्ट ते विसरले; तरी आपण विसरता कामा नये. त्यांना परत आपल्या सनातन संस्कृतीत आणायचे आहे. असो. मुसलमानी राजवटीनंतर बंगालच्या नशिबी इंग्रजांची क्रूर राजवट आली. या इंग्रजी राजवटीची सुरुवात बंगालपासून झाली. (प्लासीची लढाई १७५७) इंग्रजांनी नंतर बिहार, ओडिशा, तामिळनाडू इत्यादी प्रदेशांत हातपाय पसरले. इंग्रजांनी बंगाल, उसाच्या चरख्यात जसा ऊस पिळला जातो, तसा बंगाल पिळला. त्यांच्या आर्थिक पिळवणुकीच्या कथा अंगावर काटे आणणार्‍या आहेत. ‘ढाका मलमल’ची कथा जगप्रसिद्ध होती. ही मलमल इतकी तलम होती की, एका काड्याच्या पेटीत एक धोतर जोडी मावत असे, असे म्हणतात. असे वस्त्र विणणार्‍या कारागिरांचे अंगठे इंग्रजांनी कापून काढले. ते कौशल्य नष्ट केले, अशी कथा सांगितली जाते. ती अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकते; पण अतिशयोक्ती घडलेल्या घटनेची होत असते, हेही तितकेच खरे!
 
स्वातंत्र्यानंतर बंगालवर काँग्रेसची सत्ता राहिली. काँग्रेसच्या सत्तेचा अर्थ होतो, मुसलमानांचे लांगूलचालन, हिंदूंवर दडपशाही, समाजवादाच्या खोट्या कल्पना, प्रशासकीय भ्रष्टाचार, राजनेत्यांचा भ्रष्टाचार आणि घराणेशाही. बंगालने हे भोग भोगले. नंतर त्यांच्या नशिबी स्टॅलिन आणि लेनिनला आदर्श मानणार्‍या डाव्या कम्युनिस्टांची राजवट आली. या राजवटीने बूथ केंद्रापर्यंत ‘गुंडसेना’ उभी केली. डाव्या कम्युनिस्टांना मते न देणार्‍यांचा छळ सुरू केला. २०११ साली ममतादीदींनी तृणमूल पक्ष उभा केला आणि या पक्षाने कम्युनिस्टांची राजवट संपवून टाकली. सत्तेवरून कम्युनिस्टांना घालवणे सोपे काम नसते. सत्ता मिळवणे आणि मिळवलेली सत्ता राखणे, यात कम्युनिस्ट फार तज्ज्ञ आहेत. ममतादीदींनी हा चमत्कार घडवून आणला. राष्ट्रवादी लोकांच्या आकांक्षा खूप वाढल्या. आता ममतादीदी ‘ममतेने’ राज्य करतील, अशा अपेक्षा सुरू झाल्या. परंतु, ममतादीदींनी काँग्रेसचा वारसा जसाच्या तसा ठेवला आणि कम्युनिस्टांची ‘गुंडसेना’ आपल्या पक्षात विलीन करून टाकली. परिणामी, बंगालमधील हिंदू भरडला गेला. मुसलमानांची वाढती जनसंख्या, घुसखोरी, दहशत यातून हिंदू अस्तित्व रक्षणाचा जीवघेणा संघर्ष सुरू झाला.
 
बंगालमधील हिंदूंचे काय होणार? पुन्हा बंगालची फाळणी होणार का? बंगालमध्ये मुस्लीम दहशतवाद फोफावणार का? घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंगे बंगाल खाऊन टाकणार का? आ वासून असे प्रश्न उभे राहिले. या प्रश्नांची गंभीरता हिंदू जनतेच्या लक्षात आणून देण्याचे अतिकष्टप्रद काम नरेंद्र मोदी, अमित शाह, बंगालचे स्थानिक भाजप नेते आणि मूकपणाने काम करणारे संघाचे हजारो-लाखो कार्यकर्ते यांनी केले. यामुळे बंगाली हिंदू हळूहळू जागा होत गेला. भाजपला २०१६ सालच्या निवडणुकीत तीन जागा देणार्‍या हिंदूंनी २०२१च्या निवडणुकीत भाजपला ७७ जागा दिल्या आणि आता निर्विवाद बहुमत (२०७ जागा) दिले. बंगालची निवडणूक जागृत हिंदू समाजाने जिंकली. हिंदू जागा झाला की, काय चमत्कार घडतो हे बंगालने दाखवून दिले. ही हिंदू जागृती बंगालपुरती सीमित राहाणार नाही. अयोध्येच्या राम मंदिराची आस्था जशी अखिल भारतीय आस्था आहे, तशी बंगालची हिंदू जागरण अस्मिता अखिल भारतीय आहे. तिचे पडसाद सर्व देशभर उमटत राहाणार.
 
भारत जागरणात बंगालने नेहमीच अग्रदूताची भूमिका बजावलेली आहे. रामकृष्ण परमहंस - विवेकानंद यांनी काळानुरूप प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली. बंकिमचंद्र चटर्जी यांनी भारतमातेची संकल्पना जिवंत केली. सुभाषचंद्र बोस यांनी छात्रतेजाचे प्रगटन केले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सरस्वतीची आराधना केली. आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांच्या रूपाने बंगालने उद्योगश्रीचा श्रीगणेशा केला. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी शिक्षण आणि समाजसुधारणेची पायाभरणी केली. सर्व देशाने बंगालचे अनुकरण केले आहे. ही आपली परंपरा आहे. हिंदू जागृतीची जी ऊर्जा बंगालने प्रकट केली आहे, तिचे अनुसरण देशाला करावेच लागेल. बंगाली हिंदूंमध्येदेखील जाती आहेत, उच्च-नीचता आहे, पंथ आहेत, हे सर्व भेद गाळून बंगाली हिंदूंनी हिंदू राजकीय अभिव्यक्ती प्रकट केली. सत्तेचा विषय आला की, ‘आम्ही फक्त हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच मतदान करणार, हिंदू हितासाठी मतदान करणार, हिंदू हिताची काळजी वाहणार्‍यांना मत देणार,’ हे बंगाली जनतेने आपल्या कृतीने भारताला दाखवून दिले. सर्व हिंदूंना त्याचे अनुसरण करणे, ही या काळाची वाट आहे. म्हणून ही वाट प्रभावीपणे दाखविणार्‍या बंगाली जनतेचे हृदयपूर्वक अभिनंदन! आणि इथून पुढे या वाटेचा राजमार्ग करण्याचा आपण सर्वांनी संकल्प करूया!
 
 
- रमेश पतंगे