Women Safety Law : वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवून...; विरोधकांची मागणी काय?

    06-May-2026
Total Views |

Varsha Gaikwad
 
मुंबई : (Women Safety Law) राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवून शक्ती कायदा लागू करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. शरद पवार गटाचे आ. रोहित पवार आणि काँग्रेस खा. वर्षा गायकवाड यांनी याबाबतची मागणी केली. (Women Safety Law)
 
आ. रोहित पवार 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हणाले की, "अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात अवघ्या १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची गंभीर आणि संतापजनक घटना घडली. नसरापूर, केज, पालघर, पर्वती अशा एकामागोमाग एक अशा अनेक घटना घडत आहेत याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा तसूभरही धाक राहिला नाही. सरकार अजून किती चिमुकल्यांचा बळी जाऊ देणार आहे? सरकारला आता तरी जाग येईल की नाही? सरकारला मायबाप म्हणलं जातं तर तत्काळ एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवून शक्ती कायदा का अमलात आणला जात नाही? किंवा वटहुकूम का काढला जात नाही?" (Women Safety Law)
 
हेही वाचा : Pune Child Abuse Case : पुण्यात सख्ख्या आजोबाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न! काय घडलं? 
 
खा. वर्षा गायकवाडांचे राज्यपालांना पत्र
 
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर खा. वर्षा गायकवाड यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहिले आहे. त्या म्हणाल्या की, "महाराष्ट्राची ओळख प्रगत आणि सुरक्षित राज्य अशी होती, पण आज परिस्थिती भीषण आहे. राज्यात महिला आणि चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार पाहून महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासला जात आहे. महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांना २१ दिवसांत फाशीची शिक्षा देणारा कठोर 'शक्ती कायदा' मंजूर केला. मात्र, दुर्दैवाने मागील ३ वर्षांपासून हा कायदा केंद्र सरकारकडे धूळ खात पडला आहे. भगिनींना न्याय हवा असेल, तर हा कायदा त्वरित लागू होणे गरजेचे आहे. राज्यपालांनी यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करावा, यात हस्तक्षेप करावा," अशी मागणी त्यांनी केली. (Women Safety Law)