सनातनचा महाशंखनाद : बंगालपासून तामिळनाडूपर्यंत तुष्टीकरणाचे गड उद्ध्वस्त...

    06-May-2026
Total Views |
Sanatan Wave Election Results India
 
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी सनातनचा महाशंखनाद केला असून, बंगालपासून ते तामिळनाडूपर्यंत तुष्टीकरणाचे गड उद्ध्वस्त केले आहेत. हिंदूंचा, हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही, हे या निकालांनी अधोरेखित केले असून, ही विजयगाथा लोकशाहीच्या उत्सवात ‘धर्मस्थापने‌’चा क्षण ठरली आहे.
 
भारतीय राजकारणाच्या कालखंडात काही क्षण असे येतात, जे संपूर्ण इतिहासाची दिशाच बदलून टाकतात. पण, नरेंद्र मोदी यांनी भारताचे नेतृत्व स्वीकारल्यापासून आजपर्यंत असे क्षण जणू ठोक भावाने दररोज समोर येत आहेत. मोदींची ‌‘भारत आणि भारतीय प्रथम‌’ ही संकल्पना रोज फुलत-फळत आहे. ‌‘सबका साथ, सबका विकास‌’, सुशासन, स्पष्टवक्तेपणा आणि पारदर्शकतेचे तत्व, या सर्वांनी मिळून आज पश्चिम बंगालच्या विधानसभा आणि दक्षिण भारतातील निवडणुकीचे निकाल जेव्हा समोर आले, तेव्हा हे स्पष्ट झाले की, हे केवळ सत्तांतर नाही, तर हा त्या कोट्यवधी वंचित-उपेक्षित स्वाभिमानांचा हुंकार आहे, ज्यांना दशकानुदशके ‌‘व्होट बँक‌’ राजकारणाच्या वेदीवर बळी दिले जात होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनाच्या लाटेने आज ज्या पद्धतीने आपला झेंडा फडकावला आहे, त्यामुळे डॉ. श्यामाप्रसाद मुखज यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. डॉ. मुखर्जी यांनी ज्या बंगालच्या मातीतून ‌‘एक राष्ट्र, एक विधान‌’चा संकल्प घेतला होता, आज त्याच मातीतून त्यांच्या विचारांच्या सरकारला जवळपास दोन तृतीयांश बहुमत देऊन नियतीचे चक्र पूर्ण झाले आहे.
 
या ऐतिहासिक जनादेशाची पायाभरणी केवळ विकासाच्या आश्वासनांवर नाही, तर त्या सुरक्षेच्या भावनेवर आधारित आहे, जी गेल्या एका वर्षात गंभीर धोक्यात आली होती. सुमारे दोन वर्षांपूर्वी शेजारी देश बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर जे काही घडले, ते बंगालचा हिंदू कधीही विसरणार नाही. बांगलादेशात ज्याप्रकारे सत्तांतर झाले आणि शेख हसीना यांना जीव मुठीत घेऊन भारतात पलायन करावे लागले, त्याने सीमापारच्या या बाजूला राहणाऱ्या बंगाली समाजालाही अक्षरश: हादरवून टाकले. ‌‘शांतीचे दूत‌’ म्हणून ओळखले जाणारे ‌‘नोबेल‌’ पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी सत्ता सांभाळताच, बांगलादेशात जे घडू लागले, त्याने भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा फाडून टाकला.
 
बांगलादेशातील प्रसिद्ध लोकसंगीतकार राहुल आनंद यांचे १४० वर्षे जुने घर जाळण्यात आले. ही केवळ एक घटना नव्हती, तर एका संस्कृतीला नष्ट करण्याचा तो अश्लाघ्य प्रयत्न होता. त्यांच्या हाताने बनवलेली वाद्ये जाळण्यात आली, तेव्हा त्याचे चटके पश्चिम बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद आणि नादिया जिल्ह्यांतही जाणवले. ‌‘इस्कॉन‌’च्या संतांची अटक आणि हिंदूंच्या हत्याकांडावर जेव्हा भारतातील ‌‘सेक्युलर जमात‌’ आणि ममता बॅनर्जी यांचे प्रशासन मौन बाळगून होते, तेव्हा बंगालचा सामान्य हिंदू समजून गेला की, जर आज तो जागा झाला नाही; तर उद्या त्याचीही अवस्था अशीच होईल. मतदान केंद्रांवर लागलेल्या लांबलचक रांगा ही या ‌‘अस्तित्वाच्या लढाई‌’चीच परिणती होती. यावेळी हिंदूंनी ‌‘चुपचाप कमल छाप‌’ नव्हे, तर ‌‘उघडपणे अधिकार‌’ ही नीती स्वीकारली.
 
ममतादीदींच्या ‌‘इमाम भत्ता‌’पासून ते धार्मिक तुष्टीकरणाच्या राजकारणाने बंगालच्या मूळ स्वरूपाला बासनात गुंडाळले होते. ‌‘जय श्रीराम‌’च्या घोषणांवर तुरुंगात डामणाऱ्या या मानसिकतेला, आज जनतेने सत्तेबाहेरचा मार्ग दाखवून हे सिद्ध केले आहे की, बंगाल आता ‌‘संदेशखाली‌’सारख्या घटनांना सहन करणार नाही. महिलांवरील अत्याचार आणि स्थानिक पातळीवरील तृणमूलच्या ‌‘सिंडीकेटराज‌’मुळे निर्माण झालेला रोष बांगलादेशातील घटनांनी ज्वलंत आगीत परिवर्तित झाला आणि आजचा निकाल हा त्या सामूहिक चेतनेचाच परिणाम आहे.
 
बंगालची ही लाट दक्षिणेकडेही तितक्याच वेगाने धडकली. तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन यांचा पराभव हा भारतीय राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. ज्यांनी सनातन धर्माची तुलना ‌‘डेंग्यू‌’ आणि ‌‘मलेरिया‌’शी केली होती आणि त्याला संपवण्याची शपथ घेतली होती, त्यांना तामिळनाडूच्या ईश्वरभक्त जनतेने आपली ताकद दाखवली. ‌‘द्रविडी‌’ राजकारणाच्या नावाखाली हिंदू संस्कृतीचा अपमान आता राज्यात मान्य नाही. भाजपने तेथे केवळ आपला जनाधार वाढवला नाही, तर स्टॅलिन यांच्या अभेद्य किल्ल्यालाही धक्का देत, हे सिद्ध केले की, ‌‘मुरुगन‌’ची भूमी अधर्म्यांच्या बाजूने उभी राहणार नाही.
 
आसाममध्ये भाजपच्या प्रचंड विजयाने मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या ‌‘घुसखोरीमुक्त आसाम‌’ या धोरणावर शिक्कामोर्तब केले आहे. आसामच्या मूळ रहिवाशांनी स्पष्ट केले आहे की, ते त्यांच्या लोकसंख्यात्मक रचनेशी आणि संस्कृतीशी कोणतीही तडजोड करणार नाहीत. पुदुच्चेरीसारख्या लहान केंद्रशासित प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन होणे हे दर्शवते की, ‌‘कमळ‌’ आता देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात फुलण्यासाठी सज्ज आहे. हा केवळ निवडणुकीतील विजय नाही, तर उत्तर ते दक्षिण असा वैचारिक एकात्मतेचा आणि सनातनचा शंखनाद आहे.
 
या निवडणुकीचा सर्वांत मोठा संदेश असा आहे की, आता हिंदू बचावात्मक नाही; तर ठामपणे पुढे येत आहे. तो आपल्या ओळखीबद्दल लाजिरवाणा नसून, हिंदू असण्याबद्दल अभिमान बाळगतो. तो विकासाबरोबरच आपल्या परंपरेचे रक्षणही करू इच्छितो. विरोधी पक्षांसाठी हा स्पष्ट धडा आहे की, बहुसंख्य समाजाच्या भावनांना तुडवत सत्ता मिळवता येत नाही.
आज जेव्हा कोलकात्याच्या रस्त्यांवर विजयी शंखनाद होत आहे, जो एका नव्या युगाचा प्रारंभ आहे, जिथे तुष्टीकरणाला कदापि स्थान नसेल. पश्चिम बंगालने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आता या दोन तृतीयांश बहुमतासह बंगालला पुन्हा ‌‘सोनार बांगला‌’ बनवण्याचे आव्हान आहे; जिथे कायद्याचे राज्य असेल, कट्टरतेचे नव्हे. ही विजयगाथा लोकशाहीच्या उत्सवात ‌‘धर्मस्थापने‌’चा क्षण आहे. हा विजय त्या हुतात्म्यांना अभिवादन आहे, ज्यांनी बंगालच्या अस्मितेसाठी प्राणांची आहुती दिली. आजचा सूर्योदय एका नव्या भारताचा- समर्थ, सक्षम आणि सनातनी भारताचाच उदय दर्शवतो.
 
आचार्य पवन त्रिपाठी