मुंबई : (Saini Ghosh Song Controversy) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष केवळ राजकीय मुद्द्यांपुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक आणि धार्मिक प्रतीकांच्या पातळीवरही पोहोचल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीदरम्यान तृणमूल खासदार सायनी घोष यांच्या एका गाण्याने निर्माण केलेल्या वादामुळे राज्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळाल्याचे दिसून येत आहे. सायनी घोष यांनी 'हृदय मा छे काबा, नयने मदीना' या ओळी असलेले एक गीत सादर केले. बांगलादेशी कवी अब्दुल रहमान बोयाती यांच्या या गीताचा वापर करून तृणमूल काँग्रेसने अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः मुस्लिम बहुल भागांमध्ये या गाण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आल्याचा दावा केला जातोय.(Saini Ghosh Song Controversy)
या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपने आक्रमक भूमिका घेतली. पक्षाने याला “मुस्लिम तुष्टिकरणाचे राजकारण” असे संबोधत तृणमूल काँग्रेसवर टीका केली. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत त्यांना 'सनातन विरोधी' ठरवले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “बंगालची ओळख काबाशी नाही, तर माता कालीशी आहे. आमच्या हृदयात महाकाली आणि डोळ्यांत चैतन्य महाप्रभु आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीतील धार्मिक ध्रुवीकरण अधिक तीव्र झाल्याचे मानले जाते.(Saini Ghosh Song Controversy)
ज्या गाण्याच्या माध्यमातून अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला, त्याच गाण्यामुळे बहुसंख्याक हिंदू मतदारांमध्ये प्रतिक्रिया उमटली आणि त्याचा फायदा भाजपला झाला, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सायनी घोष यांच्या गाण्याभोवती निर्माण झालेला वाद हा केवळ सांस्कृतिक नव्हता, तर तो थेट राजकीय रणनीतीचा भाग बनला आणि अखेरीस निकालावरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते.(Saini Ghosh Song Controversy)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक