म्हारी छोरिया छोरों से कम हैं के!

    06-May-2026
Total Views |
Madhavi Patil Sports Leadership India
 
खेळाडू ते संघटनात्मक नेतृत्वाची धुरा समर्थपणे सांभाळत, रात्रंदिवस खेळाडूंच्या उत्कर्षाचा ध्यास बाळगणाऱ्या माधवी पाटील यांच्याविषयी...
 
चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. अलीकडे भारतीय मुलींनी क्रीडा क्षेत्रात लौकिक मिळवणे, तसे नित्याचेच. पण, जेव्हा-जेव्हा भारतीय कन्या सातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकवतात, तेव्हा एक वाक्य जवळपास सर्वांच्याच मुखी असते, ते म्हणजे ‌‘म्हारी छोरिया छोरों से कम हैं के!‌’ कुस्तीवर आधारित ‌‘दंगल‌’ या चित्रपटातील हा गाजलेला संवाद, हरियाणाच्या मातीतील रांगडेपणाचे दर्शन घडवते. आता विषय रांगडेपणाचा आला म्हटल्यावर कोल्हापूरचे नाव न आल्यासच नवल! ‌‘दंगल‌’ चित्रपटातील या प्रसिद्ध संवादाला मूर्तरूप, एका भारतीय कन्येने काही वर्षांपूर्वीच दिले होते. माधवी पाटील यांची ही गोष्ट.
 
माधवी यांचा जन्म कोल्हापुरात १९७६ साली झाला. त्यांच्या वडिलांनी शरीरसौष्ठव प्रकारात ‌‘भारत श्री‌’, सलग सातवेळा ‌‘मिस्टर इंडिया‌’ आणि पहिले ‌‘महाराष्ट्र श्री‌’ होण्याचा बहुमान पटकावला, तर, माधवी यांच्या आई कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू. त्यामुळे माधवी यांना खेळाचा वारसा आई-वडिलांकडूनच लाभला. माधवी यांचे आजोबा स्वातंत्र्यपूर्व भारतातील अव्वल कुस्तीपटू. त्यांना ब्रिटिश शासनाने ‌‘सँडो‌’ किताबाने गौरवले होते. वडिलांच्या व्यायामशाळेतच माधवी यांच्या क्रीडा क्षेत्रातील कारकिदचा श्रीगणेशा झाला. इयत्ता चौथीमध्ये असतानाच माधवी यांनी ‌‘वेटलिफ्टिंग‌’चे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत हा खेळ कोल्हापुरात ‌‘पुरुषी‌’ समजला जाई. माधवी या कोल्हापुरातील पहिल्या महिला ‌‘वेटलिफ्टर‌’ ठरल्या. साधारणत: इयत्ती दहावीपर्यंत माधवी यांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्येच चमकदार कामगिरी करण्याचा धडाका कायम ठेवला. मात्र, दहावीमध्ये उदयपूर येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्या पहिल्यांदा सहभागी झाल्या. माधवी यांनी १९८५ ते २००१ या काळामध्ये २७ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांमधूनच माधवी यांची निवड ‌‘विश्व अजिंक्यपद स्पर्धा‌’ आणि ‌‘आशियाई अजिंक्यपद स्पर्धे‌’साठी झाली. या काळात ‌‘इंडिया कॅम्प‌’मध्ये माधवी जवळपास साडेतीन वर्षे होत्या. त्यावेळी तेथील प्रशिक्षकांकडून माधवी यांना ‌‘वेटलिफ्टिंग‌’चे प्रगत शिक्षण मिळाले. त्याच वेळी ‌‘अथेन्स ऑलिम्पिक‌’साठीच्या नवोदित गुणवंत खेळाडूंमध्येही माधवी यांचा समावेश झाला.
 
माधवी यांनी ‌‘बीकॉम‌’नंतर ‌‘बीपीएड‌’, ‌‘एमपीएड‌’, योगविद्या, ‌‘नॅचरोपॅथी‌’चे शिक्षण घेतले. माधवी यांचे बंधूही क्रीडा प्रशिक्षक. त्यामुळे त्यांना कायमच मैदान जवळचे वाटले. मात्र, बाळाच्या जन्मानंतर माधवी यांना दीर्घकाळ ‌‘वेटलिफ्टिंग‌’पासून दूर राहावे लागले. याचेच शल्य माधवी यांना बोचत असे. त्याच काळात ‌‘टग ऑफ वॉर‌’ अर्थात, ‌‘रस्सीखेच‌’ खेळ नव्याने आकार घेत होता. माधवी यांना यामध्ये योगदान देणे सहजशक्य होते. शिवाय, मैदानापासून इतके दिवस राहिलेला दुरावादेखील संपणार होता.
 
माधवी यांनी ही संधी साधली. या खेळात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला ‌‘सुवर्णपदक‌’ मिळवून दिले. त्यानंतर त्यांच्याकडे या खेळाच्या कोल्हापूर संघटनेची जबाबदारी आली. या सर्व क्षेत्रात खेळाप्रति असलेली आवड, खेळाडूंच्या कल्याणाप्रतिची तळमळ पाहून, त्यांना या खेळातील संघटनात्मक विविध पदे मिळत गेली. २००८ पासून आजतागायत त्या ‌‘रस्सीखेच‌’ खेळाच्या ‌‘महाराष्ट्र राज्य अध्यक्ष‌’ म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या अध्यक्षीय कारकिदचे विशेष म्हणजे, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आज हा खेळ पोहोचला आहे. रस्सीखेच खेळाडूंना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये राज्यात आरक्षण मिळावे, शिक्षणात हक्काचे गुण मिळावेत, यासाठी त्यांनी आजवर यशस्वी लढा दिला असून, काही बाबतीत त्यांचा लढा आजही सुरू आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या अनेक मुलांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पराक्रम गाजवला. सध्या माधवी यांच्यावर महाराष्ट्र अध्यक्षाबरोबरच दक्षिण आशियाच्या सचिवपदाची जबाबदारी असून, ‌‘टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया‌’ या संघटनेच्या तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांच्याच खांद्यावर आहे. तसेच भारतीय रस्सीखेच खेळाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीपदाची जबाबदारीही माधवी यांच्याकडेच आहे.
 
१९९७ साली क्रीडा क्षेत्रातील
 
सर्वोच्च ‌‘शिवछत्रपती‌’ पुरस्कारानेही माधवी यांना सन्मानित करण्यात आले. आज विविध जबाबदाऱ्यांचे निर्वहन करतानाही, त्या 40 वर्षांवरील गटामध्ये ‌‘पॉवर लिफ्टिंग‌’ही करत आहेत. सध्या इटली येथे होणाऱ्या परिषदेत ‌‘रस्सीखेच‌’च्या ऑलिम्पिक समावेशासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी माधवी यांनी विविध देशांशी चर्चा केली. गेल्या ऑलिम्पिकच्या वेळी दोन मते कमी पडल्याने रस्सीखेचप्रवेश लांबला होता, यावेळी तो होईल, असा आशावाद माधवी व्यक्त करतात. माधवी यांच्या मार्गदर्शनात रस्सीखेच खेळात देशाला ‌‘ऑलिम्पिक पदक‌’ मिळावे, याच दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या माधवी पाटील यांना शुभेच्छा!
 
कौस्तुभ वीरकर