‘व्होटचोरी‌’ नव्हे, अकलेची चोरी!

    06-May-2026
Total Views |
Mamata Banerjee EVM Allegations
 
सत्तेचा दर्प ममता बॅनर्जींच्या इतका डोक्यात गेला आहे की, मतदारांनी आपला पराभव केला, हे वास्तव स्वीकारणे त्यांना खूपच जड जात आहे. ईव्हीएम‌’ आणि निवडणूक यंत्रणेमुळे आपला पराभव झाल्याचा दावा करूनच त्या थांबलेल्या नाहीत, तर आपला पराभव झालेला नसल्याने आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाच देणार नाही, अशी आडमुठी भूमिका त्यांनी घेतली आहे. विरोधकांनीही त्यांना समर्थन दिले असून, ही ‌‘व्होटचोरी‌’ नव्हे तर ‌‘अकलेची चोरी‌’च म्हणावी लागेल.
 
अपेक्षेप्रमाणेच ममता बॅनर्जींनी आपल्या पराभवाचे खापर ‌‘ईव्हीएम‌’ आणि निवडणूक यंत्रणेवर काल फोडले. आपल्या क्रूर, हुकूमशाही आणि भ्रष्ट कारभाराला विटलेल्या जनतेने आपल्याला घरी बसविले, ही वस्तुस्थिती त्यांनी अजून स्वीकारलेली नाही, असे दिसते. आपल्या पराभवास आपला हा हेकेखोर स्वभाव आणि गैरकारभारच जबाबदार आहे, हे त्या मनोमन चांगलेच जाणून असतील. पण, त्याची उघड कबुली देणे त्यांना अहंकारामुळे शक्य होत नसेल. त्यामुळे ‌‘ईव्हीएम‌’द्वारे ‌‘व्होटचोरी‌’सारखे भंपक दावे करण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय नाही. वास्तविक, त्यांनी ‌‘आपण या पराभवाबद्दल आत्मपरीक्षण करू,‌’ इतके जरी म्हटले असते; तरी त्यांनी आपली शान राखली असती. पण, सतत दुसऱ्यांना दोष देण्याची सवय लागल्याने इतक्या मोठ्या पराभवाचा स्वीकार करणे त्यांना जड जात आहे. असो. १५ वर्षे पश्चिम बंगालमध्ये मनमानी कारभार रेटून सत्तेत असताना केलेल्या घोटाळ्यांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागेल, तो वेगळाच. यामुळेच दारुण पराभवाच्या धक्क्यामुळे आणि वयोमानानुसार त्यांचे वास्तवाचे भान सुटले असण्याची शक्यता आहे.
 
आता इतके करूनही त्या थांबलेल्या नाहीत. आपला पराभवच झालेला नाही, तर निवडणूक आयोगाने कट करून आपल्याला हरविले आहे, अशी भूमिका घेत त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासच नकार दिला. मात्र, ममतांची ही नवी नौटंकी असली, तरी त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक पेच उभा राहील की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात, राज्यपालांकडे असलेल्या घटनात्मक अधिकारांमुळे सत्तांतर होण्यात काही अडचण येणार नाही. कदाचित, आज-उद्या ममता आपली ही भंपक भूमिका मागे घेऊन वास्तवाचा स्वीकार करतीलही. तरीही, काहीकाळ घटनात्मक पेचप्रसंगाचे सावट उभे राहील, हे खरे.
 
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही लगेच ममतांच्या ‌‘ईव्हीएम‌’ घोटाळ्याच्या दाव्याच्या सुरात सूर मिसळला. राहुल गांधी यांनाही यापेक्षा वेगळे काही सांगता येत नाही. केरळम्‌‍मध्ये काँग्रेसने प्रचंड विजय मिळविला आहे. मग तो विजयही काँग्रेसने ‌‘व्होटचोरी‌’ करून मिळविला आहे का? की, केरळम्‌‍मधील ‌‘ईव्हीएम‌’ तेवढी बरोबर काम करीत होती; पण प. बंगालमधील ‌‘ईव्हीएम‌’मध्ये मात्र गडबड होती, असे त्यांना म्हणायचे आहे? ‌‘महाभारता‌’तील द्युतात शकुनीने आपल्याला वश असलेले फासे वापरले होते. त्यामुळे त्याला हवे तेच दान पडत असे. जिथे काँग्रेसचा पराभव होतो, तेथे निवडणूक आयोग अशी वशीकरण झालेली ‌‘ईव्हीएम‌’ वापरतो की काय, याचा राहुल गांधी यांनीच शोध घ्यावा.
 
यातील विनोदाचा भाग सोडला, तरी केरळम्‌‍ व तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे दावे पाहिल्यास ममता आणि राहुल यांच्या अकलेचे कसे दिवाळे वाजले आहे, ते दिसेल. एकीकडे ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी हे आपल्या रडीच्या डावाचे प्रदर्शन करीत असताना, तामिळनाडू व केरळम्‌‍मध्ये सत्ता गमावलेल्या अनुक्रमे एम. के. स्टॅलिन व पिनाराई विजयन यांनी आपल्या पदांचे राजीनामेही सादर केले. या दोन्ही नेत्यांनी आपल्या पराभवास ‌‘ईव्हीएम‌’ जबाबदार असल्याचे म्हटलेले नाही. या नेत्यांनी दिलेली कारणेही तितकीशी पटणारी नसली, तरी त्यांनी निदान आपल्या पराभवाच्या कारणांचे हास्यास्पद दावे तरी केलेले नाहीत.
 
या सगळ्यावरुन राहुल गांधी यांची भूमिकाही किती विरोधाभासी आहे, ते दिसेल. काँग्रेसने प. बंगालमध्ये ममतांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाविरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. पण, काँग्रेसला केवळ दोन जागा जिंकता आल्या. आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पराभवावर काँग्रेसच्या नेत्यांनी आनंदाची प्रतिक्रिया व्यक्त केली असता, त्यांना राहुल गांधी यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राहुल गांधींनी अशाप्रकारे ममतांच्या पराभवाचे समर्थन न करण्याचे सांगितले. कारण, त्यांनीही ममतांच्या बिनबुडाच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे. यामागची काही तर्कसंगती लागत नाही. एकतर काँग्रेस बहुतेक सर्व राज्यांमध्ये तेथील प्रादेशिक पक्षांच्या विरोधात लढत असतो. केरळम्‌‍ व प. बंगालमध्ये डावी आघाडी व तृणमूल काँग्रेस यांच्या विरोधात असतो, तर हरियाणात समाजवादी पक्षाच्या विरोधात. जम्मू-काश्मीरमध्ये तो नॅशनल कॉन्फरन्सविरोधात लढतो, तर दिल्ली व पंजाबमध्ये आम आदमी पक्षाविरोधात. पण, लोकसभा निवडणुकीत याच प्रादेशिक स्तरावरील आपल्या विरोधी पक्षांना एकत्र करून ‌‘इंडी‌’ आघाडी नावाचे एक कडबोळे त्याने तयार केले आहे. त्यामुळे या पक्षाच्या पराभवावर आनंद व्यक्त करायचा की दु:ख, हेच काँग्रेस नेत्यांना कळेनासे झाले आहे.
 
शिवाय, पश्चिम बंगालमध्ये जनादेशाची चोरी झाली, असे राहुल गांधी यांनी म्हटले असले; तरी हाच आरोप त्यांनी तामिळनाडूत केलेला नाही. तेथे काँग्रेसने द्रमुकशी युती करून निवडणूक लढविली होती. पण, या युतीचा दारुण पराभव झाला. मात्र, तिथे जनादेशाची चोरी झाल्याचे ना राहुल गांधी यांनी म्हटले, ना स्टॅलिन यांनी. हे कसे शक्य आहे?
 
अर्थात, भारतीय जनता आणि मतदार हा राजकीयदृष्ट्या या नेत्यांपेक्षा कितीतरी अधिक प्रगल्भ आणि समजूतदार आहे. या नेत्यांच्या दाव्यात काही तथ्य नाही, ही गोष्ट मतदारांच्याही आता पुरती लक्षात आलेली आहे. ‌‘व्होटचोरी‌’ ममतांचा पक्ष करीत असे. त्या पक्षाच्या गुंड-टोळ्या मतदारांना मतदान केंद्रांवर पोहोचूच देत नसत. तेथेही भ्रष्ट पोलीस यंत्रणेच्या मदतीने ‌‘ईव्हीएम‌’मध्ये तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचे बटण दाबले जात असे. मृत मतदाराच्या नावानेही मतदान होत असे. ‌‘व्होटचोरी‌’ त्याला म्हणतात. यावेळी निवडणूक आयोग व केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार, प. बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या मोठ्या प्रमाणात तैनात करून चोख बंदोबस्त ठेवला. राज्य पोलिसांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर आता मतमोजणीनंतरही दोन महिने ही सुरक्षा दले राज्यात तैनात ठेवली जातील. यामुळे बंगाली मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि त्यांनी भयमुक्त होऊन भरभरून मते भाजपच्या झोळीत ओतली. यंदा प्रथमच बंगालमध्ये मुक्त आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पडल्या आणि त्यामुळे बंगाली मतदारांची खरी भावना व्यक्त झाली. मनाने आपल्या आभासी आणि हुकूमशाही जगात वावरणाऱ्या ममतांना हे वास्तव स्वीकारणे जड जात आहे. दीदी, गेट वेल सून!