बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात; महिन्याला १५ किमी ट्रॅक तयार

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Total Views |
Mumbai Ahmedabad Bullet Train
 
नवी दिल्ली : (Mumbai Ahmedabad Bullet Train) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम आता वेगाने सुरू असून दर महिन्याला सुमारे १५ किलोमीटर ट्रॅक तयार केला जात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. देशातील हा सर्वात महत्त्वाकांक्षी आणि अत्याधुनिक रेल्वे प्रकल्प मानला जात आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोर हा एकूण ५०८ किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून त्यापैकी ३५२ किलोमीटर मार्ग गुजरात आणि दादरा-नगर हवेलीमध्ये, तर १५६ किलोमीटर महाराष्ट्रात आहे.
 
अश्विनी वैष्णव म्हणाले, “आम्ही संपूर्ण प्रक्रियेचे स्टँडर्डायझेशन केले असून हा प्रकल्प ‘फॅक्टरी बिल्ड’ पद्धतीने उभारला जात आहे. ११ ऑगस्ट २०२१ रोजी या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली. गेल्या जवळपास पाच वर्षांत प्रकल्पाने चांगली प्रगती केली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “महाराष्ट्रात परवानग्या मिळण्यात सुमारे अडीच वर्षांचा विलंब झाला. त्यामुळे आम्हाला प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये बदल करून सुरतमध्ये डेपो उभारावा लागला. हा देशातील अत्यंत जटिल प्रकल्पांपैकी एक असल्याने आम्ही कोणतीही घाई न करता काम करत आहोत.”(Mumbai Ahmedabad Bullet Train)
 
हेही वाचा :  Women Safety Law : वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवून...; विरोधकांची मागणी काय?
 
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
 
बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३५० किलोमीटर असेल. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील महाराष्ट्रातील सात पर्वतीय बोगद्यांवर काम सुरू असून देशभरात ७,००० किमी बुलेट ट्रेन ट्रॅक उभारण्यास केंद्र सरकारची मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात ४,००० किमी आणि त्यानंतर आणखी ३,००० किमी ट्रॅक उभारला जाणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवासाचा कालावधी केवळ १ तास ५८ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे देशातील दोन महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांमधील आर्थिक आणि औद्योगिक संपर्क अधिक मजबूत होईल, असा सरकारचा दावा आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरमुळे साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सूरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई ही प्रमुख शहरे परस्परांशी जोडली जाणार आहेत.(Mumbai Ahmedabad Bullet Train)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.