मुंबई : (West Bengal Elections) आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये भाजप सत्तेत आली. पश्चिम बंगालमध्ये मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात होती, त्यामुळे काँग्रेसचा पराभव होणे जवळपास निश्चितच होते. काँग्रेसला आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मिळून एकूण २१ विधानसभा जागा मिळाल्या. त्यापैकी आसाममध्ये १९ तर पश्चिम बंगालमध्ये २ जागा मिळाल्या. यामध्ये एक विशेष बाब समोर आली, आसाममध्ये विजयी झालेल्या काँग्रेसच्या १९ आमदारांपैकी फक्त १ आमदार हिंदू आहे. पश्चिम बंगालमध्येही अशीच स्थिती दिसून आली. त्यामुळे काँग्रेस म्हणजे नवा मुस्लिम लीग झालाय का? असे आरोप सध्या होऊ लागलेत.(West Bengal Elections)
सन २०१८ मध्ये एका उर्दू वृत्तपत्राने एक बातमी प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये स्वतः राहुल गांधी यांनी काँग्रेस ही मुस्लिमांची पार्टी असल्याचे विधान केले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षाने या विधानाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पक्षाच्या तत्कालीन अल्पसंख्यांक मोर्चाच्या अध्यक्षांनी या विधानाची पुष्टी केली होती.(West Bengal Elections)
यंदाच्या निवडणुकीत आसाममध्ये विजयी झालेल्या काँग्रेसच्या १९ आमदारांपैकी फक्त १ आमदार हिंदू आहे. नोबोइचा मतदारसंघातून विजयी झालेले जय प्रकाश दास हे राज्यातील काँग्रेसचे एकमेव हिंदू आमदार आहेत. उर्वरित सर्व आमदार मुस्लिम आहेत. पश्चिम बंगालमध्येही अशीच स्थिती दिसून आली. फरक्का मतदारसंघातून मोताब शेख आणि राणी नगरमधून जुल्फीकार अली हे काँग्रेसचे विजयी उमेदवार ठरले.(West Bengal Elections)
दरम्यान, केरळमध्ये काँग्रेस इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) सोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. आययूएमएल च्या विचारसरणीवर अनेकदा टीका करण्यात आली आहे, तरीही राहुल गांधी यांनी या पक्षाला धर्मनिरपेक्ष असे संबोधले होते. आययूएमएल स्वतःचा उगम १९४८ नंतरचा असल्याचा दावा करते, मात्र काहींच्या मते ती ऑल इंडिया मुस्लिम लीग (एआयएमएल) चीच पुढील शाखा आहे. हीच ती संघटना होती, जी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी स्थापन केली होती. देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीग आणि भारतात इंडियन युनियन मुस्लिम लीग अस्तित्वात आली.(West Bengal Elections)
२०१८ मध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसला मुस्लिमांची पार्टी म्हटले होते की नाही, हा वाद वेगळा असला तरी काहींच्या मते पक्षाच्या कृतीतून त्याचा अंदाज येतो. सध्या या दोन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेसच्या सुमारे ९५% निवडून आलेल्या आमदारांचा धर्म मुस्लिम असल्याचे सांगितले जाते.(West Bengal Elections)
काँग्रेसमधील हिंदू नेत्यांनी विचार करायला हवा
आसाम व पश्चिम बंगालमध्ये हिंदूंनी जागरूक होऊन देशाच्या सुरक्षेसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी देशहिताचा व हिंदू हिताचा विचार करून मतदान केले. पण एक विषय चिंतेचा वाटतोय, ज्याबाबत संपूर्ण देशाने खासकरून काँग्रेसमधील हिंदू नेत्यांनी विचार केला पाहिजे की, आसाममध्ये काँग्रेसचे निवडून आलेले १८ आणि बंगामध्ये २ उमेदवार मुसलमान आहेत. यातून काँग्रेसचे स्वरूप कशाप्रकारे बदलत चाललेय, हे स्पष्ट होते. काँग्रेस देशातील बहुसंख्य समाजाचे प्रतिनिधित्व कराणारा राजकीय पक्ष उरलाय की नाही, याचा अत्यंत गंभीरपणे विचार समाजाबरोबरच काँग्रेसमधील सर्व हिंदू नेत्यांनी सुद्धा केला पाहिजे.(West Bengal Elections)
- मिलिंद परांडे, केंद्रीय संघटन महामंत्री, विश्व हिंदू परिषद
राजकारणाचा खरा चेहरा दर्शवणारी आकडेवारी
ही आकडेवारी काही साधीसुधी नसून काँग्रेस पक्षाच्या राजकारणाचा खरा चेहरा दर्शवणारी आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एकतर्फी तुष्टीकरण केले आणि त्याचा परिणार संपूर्ण देश या आकडेवारीच्या रूपाने पुन्हा बघतोय. एका विशिष्ट धर्माच्या लोकांचे लांगुलचालन करून आपली मतपेटी शाबूत ठेवण्याचे काम काँग्रेस करत आहे, त्यामुळे त्याची किंमत सुद्धा काँग्रेसला भोगावी लागतेय. काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस संकुचित मनोवृत्तीचे राजकारण करू पाहत आहे आणि एखाद्या धर्माला पकडून त्या आधारावर स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचे प्रयत्न करतेय, जे लोकशाहीला अत्यंत घातक आहे.(West Bengal Elections)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक