सिंधुदुर्ग - ग्रामपंचायतीनेच झाडे तोटून उद्धवस्त केली पाट तलावातील पक्ष्यांची आश्रयस्थाने

    05-May-2026
Total Views |
 sindhudurg pat wetland
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्गातील स्थलांतरित पक्ष्यांचे एकमेव आश्रयस्थान असणाऱ्या पाट तलावातील झाडांची तोड करण्यात आली आहे (sindhudurg pat wetland). सुशोभीकरणाच्या नावाअंतर्गत ही तलवातील झाडांची तोड करण्यात आली असून यामुळे पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट झाले आहे. (sindhudurg pat wetland). या विरोधात 'अर्थ जस्टिस कलेक्टिव्ह'ने (Earth Justice Collective) पाट ग्रामपंचायत आणि तहसीलदारांना कायदेशीर नोटीस बजावण्यात असून अधिवास पूर्ववत न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.(sindhudurg pat wetland)
 
 
पाट तलाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पाणथळ क्षेत्र आहे. याठिकाणी हिवाळ्यात मोठ्या संख्येने दूरदेशातून स्थलांतरित पक्षी येतात. स्थलांतरी आणि स्थानिक मिळून साधारण १६४ हून अधिक प्रजातींचे पक्षी याठिकाणी सापडतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तलावामधील पक्ष्यांच्या निवासाची झाडे तोडण्यात येत आहे. तलावाच्या सुशोभिकरणासाठी ग्रामपंचायतीला ३ करोड १६ लाख ३३ हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. याच निधीअंतर्गत तलावाचे शुशोभिकरण करण्यासाठी तलावामधील झाडे तोडली जात आहेत. पाट तलावाचे आकर्षण ही तेथील पक्षीसंपदा आहे. अशा परिस्थितीत सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जर पक्ष्यांची निवासस्थाने तोडली गेली, तर तलावाचे आकर्षणच नाहीसे होईल.
 
 
ग्रामप्रंचायतीच्या या निर्णयाविरोधात डॉ. योगेश कोळी (प्राणिशास्त्र) आणि डॉ. बाळकृष्ण गावडे (वनस्पतीशास्त्र) यांनी लेखी तक्रार दाखल वन विभाग आणि ग्रामपंचायतीकडे केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर ग्रामपंचायतीने तलावातील उद्धवस्त केलेला अधिवास पुन्हा सुस्थितीत करण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यानंतर पुन्हा अजून झाडे तोडली. या विरोधात आता 'अर्थ जस्टिस कलेक्टिव्ह' (Earth Justice Collective) तर्फे पाट ग्रामपंचायत आणि तहसीलदार यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी जर हा तलाव पूर्ववत केला नाही आणि निसर्गाची हानी थांबवली नाही, तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.