Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवार तर, राहुरीत अक्षय कर्डिले यांचा दणदणीत विजय

    04-May-2026   
Total Views |
sunetra pawar

मुंबई : (Sunetra Pawar Baramati) विधानसभेच्या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून या निवडणूकीत बारामती विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार तर, राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची तर, माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या निवडणूकीत बारामती विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध काही अपक्ष उमेदवार रिंगणात होते. यात सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ९६९ इतक्या प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांनी याच मतदारसंघातून १ लाख ६५ हजार मताधिक्यांचा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी हा विक्रमही मोडित काढला आहे.(Sunetra Pawar Baramati)
 
दुसरीकडे, राहुरीत दिवंगत माजी. आ. शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले आणि शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यात लढत झाली. यात अक्षय कर्डिले १ लाख ४० हजार ९३ मतांनी विजयी झालेत. तर, गोविंद मोकाटे यांचा २७ हजार ५०६ मतांनी पराभव झाला. त्यामुळे ही जागा पुन्हा एकदा भाजपच्या वाट्याला आली आहे.(Sunetra Pawar Baramati)
 
कुणीही विजयाचा जल्लोष साजरा करू नये - सुनेत्रा पवार
 
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करूया. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची."(Sunetra Pawar Baramati)
 
 "अजितदादांनंतरची ही पहिली निवडणूक आहे. अशा प्रकारच्या निवडणूकीला सामोरे जावे लागेल, असे मला कधीही वाटले नव्हते. मन खूप भरून येत आहे. पण आज बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचे प्रतिक म्हणून त्यांना ही भावांजली वाहिली आहे. बारामतीकरांनी दादांवरचा विश्वास आणि प्रेम मतांतून दाखवलेले आहे. दादांना आदरांजली वाहताना माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी बारामतीकरांचे आभार मानते. त्यांचा विश्वासाने माझ्यावरची जबाबदारी वाढवलेली आहे."- सुनेत्रा पवार, नवनिर्वाचित आमदार, बारामती विधानसभा (Sunetra Pawar Baramati)
 
"आज माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झालेली असून याक्षणी माझे वडील माझ्यासोबत नाहीत, हे मी माझे दुर्दैव समजतो. गेल्या ३० वर्षांपासून माझ्या वडिलांनी रक्ताचे पाणी केले, रात्रंदिवस सर्वसामान्य जनतेत राहिले. त्यांच्या सुखदु:खात सहभागी झाले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे आयुष्य जनतेसाठी समर्पित केले. आज त्याचेच फळ म्हणून जनतेने मला साथ दिली आहे. कर्डिले साहेबांवर असलेले जनेतेचे प्रेम यातून दिसले आहे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम केले आणि माझा शेवटचा श्वासदेखील जनतेच्या सेवेसाठीच राहील, हा विश्वास व्यक्त करतो."
- अक्षय कर्डिले, नवनिर्वाचित भाजप आमदार, राहुरी विधानसभा (Sunetra Pawar Baramati)
 
"पश्चिम बंगालमधील निकाल हे खऱ्या देशभक्त व्यक्तीला आणि भाजपच्या कार्यकर्त्यासाठी खूप महत्वाचे आहेत. शेवटच्या ७२ तासांत दंगली घडवून विशिष्ट मतदारांना बाहेर पडू न देणे, अशा गोष्टी यावेळी थांबवण्यात केंद्र सरकारला यश आले. या यशामुळेच बंगालमध्ये एकही मृत्यू न होता मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक पार पडली. बंगालमध्ये तुष्टीकरणाचे नव्हे तर, विकासाचे राजकारण चालेल हे सिद्ध झाले. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार येत आहे. बंगालच्या विजयाने देशाचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. देशाच्या सुरक्षेपासून तर इतर सर्व मुद्दे आता आटोक्यात येतील. जवळपास २५ राज्यांमध्ये एनडीएचे मुख्यमंत्री असून त्यातील १७ राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. यामुळे आपण विकसित भारत २०४७ कडे गतीने जाणार आहोत. बंगालमध्ये विकासाची गती वाढेल आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत होईल."- राज्यसभा खा. विनोद तावडे (Sunetra Pawar Baramati)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....