
समुद्र किनाऱ्यावर हिंडायला, समुद्रात, वाळूत पळत गुडघ्याभर पाण्यात आई-बाबांबरोबर शिवाशिवीचा खेळ खेळणे, समुद्राचं पाणी येऊन ढासळू नयेत अशा ठिकाणी बांधलेले वाळूचे किल्ले, वाळूवर काडीने चित्रे काढणे असे एक ना अनेक वाळूतील खेळ अनेकांनी आजवर अनुभवले असतील. वाळूत असे खेळताना मुलांचा भावनाविष्कार बहरतोच, शिवाय मोठी माणसंही काही वेळापुरती लहान होत, तणावमुक्त वेळ व्यतीत करतात. सुटीत पर्यटनाला समुद्रकिनारी गेल्यावर, वाळूत खेळायचा मोह कोणाला बरं होत नाही! वाळूतले हे खेळ केवळ मनोरंजकच नसून, एक प्रकारची ‘थेरपी’ म्हणूनही काम करतात. वाळूमध्ये पळणे, उड्या मारणे यांमुळे स्नायूंना व्यायाम मिळतो, जो धावणे, लांब उडी यांसारख्या खेळांसाठी लाभकारी सिद्ध होतो. वाळूत खेळल्याने मुलांच्या स्पर्शसंवेदनेचाही विकास होतोच, शिवाय त्यांना निसर्गाशीही जवळीक साधता येते. त्याचबरोबर, वाळू मऊ असल्यामुळे मुलांना पडून दुखापत होण्याची शक्यताही कमीच असते.
“वाळूत खेळायला आता तू काय लहान राहिला आहेस का?” आजकाल हा प्रश्न कोणाच्या मनातही येत नसावा. उलटपक्षी, आता तर वाळूत खेळण्याच्या कलेला आणि क्रीडेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून, काहीजण तर त्याच क्षेत्रात आपलं करिअरही घडवत आपले आणि आपल्या देशाचे नाव मोठे करत आहेत. या कलेतील एक उदाहरण म्हणजे सुदर्शन पटनायक. तर, क्रीडेतील एक नाव म्हणजे भारतीय महिला बीच कबड्डी. या दोन्ही उदाहरणांबाबत आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
मौसमी चटर्जीच्या ’अनुराग’ नावाच्या चित्रपटातील ‘सुन री पवन’, ‘पवन पुरवैया’ या गाण्याचे चित्रीकरण समुद्र किनारी झाले होते. त्या गाण्यात एक मुलगा वाळूवर फुटबॉल खेळताना दाखवला असून, मौसमी चटर्जी वाळूची घरं बांधताना दाखवली आहे. मौसमी चटर्जी यांनी बांधलेले वाळूचे घर बघताना ही वाळूची कला किती छान असेल, हे १९७२ साली प्रत्येकालाच वाटले असेल. त्या चित्रपटातली ती वाळूकला बघितल्यावर, अलीकडे प्रसिद्ध झालेल्या सुदर्शन पटनायकच्या कलेचे कौतुक केल्याशिवाय आपल्याला राहावत नाही. सुदर्शन पटनायक हा ओडिशातील पुरी येथील वाळू कलाकार. त्याचा जन्म दि. १५ एप्रिल १९७७ रोजी झाला. भारत सरकारने २०१४ मध्ये त्याला, समुद्रकिनाऱ्यावरील वाळूकलेसाठी भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले. जगन्नाथपुरीला राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय, धार्मिक कुटुंबातील सुदर्शनला काही घरगुती कारणांमुळे प्राथमिक शिक्षणापुढे शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर, वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्याने पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर विविध वालुकामूत घडवण्यास सुरुवात केली. काही क्षणांच्या असलेल्या या सुंदर कलेतून, त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘सर्वोत्कृष्ट वाळूशिल्पकार’ हा किताबही, २००८ मध्ये त्याला मिळाला. कलेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्याने, वाळूशिल्पात त्याचा दबदबा निर्माण झाला. रशियाच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याने साकारलेल्या कलाकृतीला तर ‘पिपल्स चॉईस’ हा पुरस्कारही मिळाला. पुढे त्याला प्रचंड प्रसिद्धी तर मिळालीच, तसेच त्याला विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले. ओडिया, बंगाली, हिंदी, इंग्रजी अशा भाषांवरही, सुदर्शन याने प्रभुत्व मिळवले असून, ‘सॅण्ड इंडिया डॉट कॉम’च्या माध्यमातून जगभरातील कलाकारांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत तो वाळूशिल्पाचे प्रशिक्षण देत असतो. त्यासारखे महाराष्ट्रातील अनेक वाळूशिल्पकारही, वाळूच्या माध्यमातून उत्कृष्ट कलाकृती साकारून सामाजिक संदेश देताना आढळतात. सिंधुदुर्गचे रविराज चिपकर (आरवली समुद्रकिनारा) हेदेखील प्रसिद्ध कलाकार असून, त्यांनी प्रभू श्रीराम आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा यांसारखी अनेक भव्य शिल्पे साकारली आहेत. मुंबई-ठाणे परिसरात, नारायण साहू आणि नेहा उमाक हेदेखील लोकप्रिय वाळूकलाकार आहेत.
वाळू जशी सुदर्शन पटनायकसारख्यांना प्रसिद्धी मिळवून देते, तशी ती क्रीडापटूंनाही करिअर घडवायला मदत करते. बीच कबड्डीचा खेळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध होत आहे. या खेळात ही भारतीय महिला नेहमीच्या कबड्डीसारख्याच पहिला क्रमांक पटकावताना दिसत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर, आशियातील दुसरी सर्वांत मोठी बहुक्रीडा स्पर्धा मानली जाणारी ’आशियाई बीच गेम्स’चे आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते. यात संपूर्ण जगातील अनेक खेळाडू सहभागी होतात. बीच कबड्डी ही मॅटवरच्या कबड्डीपेक्षा अधिक आव्हानात्मक आहे. कारण यामध्ये खेळाडूंना नैसर्गिक आव्हानांशी सामना करावा लागतो. तुमचे पाय वाळूत अंशतः रुतलेले असल्याने, हालचाल करणे खेळाडूंना काहीसे अवघड होते. त्यातच खेळाडू प्रत्यक्षपणे उन्हात खेळत असल्याने, खेळाडूंना त्यांच्या स्टॅमिनाही उत्तम राखावा लागतो.
समुद्रावर वारादेखील अचानकपणे कधीकधी वाहू लागतो. या वाऱ्याच्या वेगाचा काहीही मागमूसही नसतो. त्यामुळे, या सर्वच बाबी खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम करणाऱ्या ठरतात. परिणामी, बीच कबड्डी अधिकच आव्हानात्मक होते. बीच कबड्डीचे स्वरूप जरी लोकप्रिय कबड्डीसारखेच असले, तरी नियम आणि कायद्यांच्या बाबतीत ती थोडी वेगळी आहे. यामध्ये खेळाडू सरकणारी वाळू, रणरणता सूर्य आणि सागरी वाऱ्याचा सामना करत अधिक वेगवान आणि अधिक कठीण स्वरूपात खेळत असतात.
सन २०२४चे ‘आशियाई बीच गेम्स’ हे चीनमधील सान्या शहरात होणार होते; परंतु ‘कोविड-19’ महामारीमुळे ते पुढे ढकलण्यात आले. हे २०२४ मध्ये पुढे ढकलण्यात आलेले खेळ, आता एप्रिल २०२६ मध्ये दि. २२ एप्रिल ते दि. ३० एप्रिल रोजी दरम्यान खेळवण्यात आले या खेळांना ’सहाव्या आशियाई बीच गेम्स’ म्हणून ओळखले जाते. भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता. वाराणसी आणि पूर्वांचल क्षेत्राचे संजय सिंह ‘बबलू’ यांना, भारतीय दलाचे ‘चीफ-द-मिशन’ नियुक्त करण्यात आले होते.
नुकत्याच चीनमधील सान्या येथे पार पडलेल्या ‘२०२६ आशियाई बीच गेम्स’मध्ये, भारताच्या महिला कबड्डी संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले, तर पुरुष संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा ४७-३१ अशा फरकाने दणदणीत पराभव करत, आपले विजेतेपद यशस्वीरित्या राखले. या विजयासह भारतीय महिला खेळाडूंनी, त्यांची सलग सहा स्पर्धांमध्ये अपराजित राहण्याची आपली मालिकाही कायम ठेवली. रितूच्या नेतृत्वाखालील या सहा सदस्यीय संघाने, मध्यंतरापर्यंत २०-१८ अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रात मात्र त्यांनी निर्णायक वर्चस्व गाजवत, विजयाला गवसणी घातली. तत्पूव, उपांत्य फेरीत बांगलादेशचा ५०-३१ अशा मोठ्या फरकाने पराभव करून, भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती. या संघात रितूच्या जोडीने मनीषा कुमारी, सिमरन कांबोज, मनप्रीत कौर, निकिता आणि निकिता चौहान या खेळाडूंचाही समावेश होता.
आधीच्या साखळी सामन्यांत, भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला पराभूत केले होते. पुरुषांच्या अंतिम सामन्यात ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’कडून, ४४-३१ अशा पराभवानंतर भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. बृजेंद्र सिंग चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ, मध्यंतरापर्यंत २३-११ ने पिछाडीवर होता. त्यानंतर त्यांना सामन्यात पुनरागमन करता आले नाही. उपांत्य फेरीत पाकिस्तानवर ५०-२७ अशा दणदणीत विजयासह, पुरुष संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. या संघात जितेंद्र यादव, यथार्थ देशवाल, नीरज, जय भगवान आणि भानू प्रताप तोमर यांचाही समावेश होता.
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, चीनला गेलेल्या बीच कबड्डीच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांत, महाराष्ट्रातील एकाही कबड्डीपटूला घेण्यात आलं नव्हतं. पुरुष संघात तीन खेळाडू राजस्थानचे, एक हरियाणाचा, एक उत्तराखंडचा, तर एक उत्तर प्रदेशचा होता. मुलींच्या संघामध्ये तीन जणी हरियाणाच्या, एक हिमाचल प्रदेश, एक राजस्थान आणि एक पंजाबचा खेळाडू होता. भारताला कबड्डीत गुरुस्थानी मानणाऱ्या इराणला, भारतच पुरुष बीच कबड्डीत नमवू शकला नाही; पण मुलींनी सुवर्ण मिळवून दाखवलं. आपण हेदेखील लक्षात ठेवायला हवं आहे की, सध्या भारतीय कबड्डी महासंघाचं ठीक चाललेलं नसून, महासंघाचे आणि कोणते खेळाडू निवडले गेले पाहिजेत या विषयावर बरेच वाद चालू आहेत. या वादांमध्ये न्यायालयाला सतत हस्तक्षेप करावा लागत आहे. त्याची कारणे आपण पुन्हा कधीतरी जाणून घेऊ. तूर्तास महिला कबड्डीपटूंनी सुवर्ण व तर पुरुष खेळाडूंनी रौप्य मिळवल्याबद्दल, त्यांचे देशवासियांच्यावतीने अभिनंदन करु, त्यांना धन्यवाद देऊया . तसेच, महासंघात सुरु असलेले वाद लवकरात लवकर संपावेत, अशी आशा बाळगून हा वालुकामय लेखही थांबवूया.
श्रीपाद पेंडसे
9422031704