गुंतवणूक क्षेत्रातील चलनी नाणे

    04-May-2026   
Total Views |
Investment Advisor Geeta Joshi
 
कमावलेला पैसा वाढवण्यासाठीचे योग्य मार्गदर्शन करत, लोकांनी आयुष्यभर पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या गीता जोशी यांच्याविषयी...
 
आयुष्याच्या उत्तरार्धात असे लक्षात येते की, पैसा तर कमावला, पण त्याचे योग्य ते नियोजन केले नाही. त्यामुळे उतार वयात गाठीशी म्हणावा इतका पैसा नव्हता, आणि तो हवा यासाठी कमावत्या वयात पैसा योग्य पद्धतीने गुंतवायला हवा होता. उतरत्या वयात असा पश्चाताप करून घेण्यापेक्षा, एखादा उत्तम गुंतवणूक सल्लागार शोधून त्याच्यामार्फत पैशांचे नियोजन करायला हवे. ‌‘जोडोनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी‌’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार, धन जोडण्याची कला शिकविणाऱ्या सल्लागार म्हणजे गीता जोशी.
 
गीता यांचे शालेय शिक्षण गुरुनानक इंग्लिश हायस्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण बिर्ला महाविद्यालयामध्ये झाले. त्यांनी ‌‘बी.कॉम.‌’, ‌‘एम.कॉम.‌’ पूर्ण केले. दरम्यान, त्यांचा मानलेला भाऊ संजीव कुळकर्णी यांच्या आग्रहाखातर गीता यांनी ‌‘एल.आय.सी.‌’ची एजन्सीही घेतली. त्यानंतर २००४ मध्ये गीता यांनी ‌‘एम.बी.ए.‌’ला प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी गुंतवणूक सल्लागार म्हणूनच व्यवसाय करण्याचे निश्चित केले.
 
२००६ मध्ये ‌‘ए.एम.एफ.आय.‌’ची परीक्षा दिली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, लगेचच त्यांनी गुंतवणूक सल्लागर म्हणून व्यवसायाला सुरूवात केली. दरम्यान २००७ मध्ये गीता यांनी ‌‘एल.एल.बी.‌’चे शिक्षण घेण्याचा निर्णय घेताला. पुढे गीता यांनी ‌‘सी.एफ.पी.‌’ची परीक्षा देत, गुंतवणुक सल्लागारासाठी महत्त्वाचा असलेला हा अभ्यासक्रमही पूर्ण केला. तो अभ्यास करतानाच गुंतवणूक मार्गदर्शन किती आवश्यक आहे, याची त्यांना जाणीव झाली.
 
देशात आजवर अनेक लोक पारंपरिक गुंतवणूक पद्धतीनुसार लोक पोस्ट, एफडी, सोने, जमीन, विमा यांमध्ये गुंतवणूक करीत असत. ही मानसिकता बदलण्याचा वसा घेण्याचे गीता यांनी ठरवले. बँक व्यवहार, वीजबिल भरणा, पाणीपट्टी भरणा अशी अनेक कामे त्यांच्या वडिलांकडून त्या शिकल्या. वडील बँकेत कामाला असल्याने, त्यांनी गीता यांना शाळेत असतानाच बँकेचे व्यवहार करण्यास शिकवले.
 
गीता यांनी करिअरच्या सुरुवातीला काही काळ, ‌‘ह्युमन रिसोर्स‌’मध्येही नोकरी केली. नोकरीत असताना अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. पण, मुळातच नोकरीचा पिंड नसल्याने त्यांनी नोकरी सोडून, स्वतःची गुंतवणूक ‌‘कन्सल्टन्सी फर्म‌’ सुरू केली. त्याअंतर्गत ग्राहकांना सर्व आर्थिक सेवा एकाच छताखाली प्राप्त व्हाव्यात, यासाठी त्यांनी म्युच्युअल फंड, जीवनविमा, आरोग्यविमा, कॉर्पोरेट एफडी, बॉण्ड्‌‍स, गाडीचा विमा, अपघात विमा, क्रिटिकल इलनेस पॉलिसी अशा सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा देण्यास सुरुवात केली.
 
‌‘पर्सनल फायनान्स फायनान्शिअल प्लानिंग‌’ अर्थात एखाद्या व्यक्तीचे वय, आयुष्यातील आर्थिक उद्दिष्टे, मासिक उत्पन्न, भविष्यातील आर्थिक निकड या सर्वच गोष्टींचा साकल्याने विचार करून, त्याला योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. ही गुंतवणूक करताना, दीर्घ मुदत किंवा मध्यम मुदत या घटकांनुसारच गुंतवणूक करण्याचा सल्ला गीता देतात.
आपल्या देशातील कायद्यानुसार करनियोजन आणि त्यासंबंधित कागदपत्रे तयार करण्याबाबतचे मार्गदर्शनही, गीता यांच्याकडून केले जाते. बरेच वेळा आपल्याकडे अत्यंत क्षुल्लक मानल्या जाणाऱ्या इच्छापत्राविषयीही त्या जनमानसांत प्रचार व प्रसार करतात. इच्छापत्र बनवल्यामुळे पुढे होणाऱ्या कोणत्या अप्रिय घटना टाळता येतात, याचा सल्लाही त्या देतात. गुंतवणूक सेवा देणे हा व्यवसायाचा भाग असला, तरी समाजामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे हा समाधानाचा भाग असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
 
गुंतवणूक मार्गदर्शक म्हणून अनेक कार्यशाळाही त्यांनी महिला, पगारदार, व्यावसायिक, विद्याथ यांच्यासाठी आजवर आयोजित केल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना म्युचुअल फंड, टॅक्स प्लानिंग यांचेही ज्ञान त्या देतात. ‌‘कॉमर्स‌’ या विषयावर मुंबई आणि मुंबईबाहेरही यांची अनेक व्याख्याने झाली असून, त्या उत्तम ‌‘कॉर्पोरेट ट्रेनर‌’ही आहेत. ‌‘फायनान्शिअल एम्पॉवरमेंट इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट‌’ या विषयावर अनेक ‌‘कॉर्पोरेट‌’ कार्यशाळाही त्यांनी आजवर घेतल्या आहेत. ‌‘सिनज लाईफस्टाईल प्रा. लि.‌’, ‌‘थोक्स इंडिया‌’, ‌‘फुललाईफ हेल्थकेअर प्रा. लि.‌’, ‌‘ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव‌’, ‌‘सर्जक कंटेनर लाईन‌’ यांसारख्या अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना, त्यांनी आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी विविध व्याख्याने घेतली. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ गीता, आर्थिक साक्षरतेच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहेत. ‌‘ॲडव्हान्स मार्केटिंग‌’, ‌‘फायनान्शिअल प्लानिंग‌’, ‌‘करिअर आफ्टर कॉमर्स‌’ या पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. तसेच, विविध दिवाळी अंकांतूनही त्यांनी गुंतवणूक सल्लाविषयक लेखन केले आहे. ‌‘इन्स्टाग्राम‌’, ‌‘युट्यूब‌’, ‌‘फेसबुक‌’ यांच्या माध्यमातूनही त्या, गुंतवणूकविषयक टिप्स आणि विविध क्लृप्त्या लोकांपर्यंत पोहोचवत असतात. आपल्या या क्षेत्रातील यशाचे श्रेय त्या गुरू उषा आंबेकर आणि सर्व गुंतवणूकदारांनाच देतात.
 
व्यवसायाबरोबरच त्या ‌‘अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान‌’सोबत, शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्येही सक्रिय आहेत.
लोकांची लग्ने, शिक्षण, वैद्यकीय गरज, निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन अशी वेगवेगळ्या टप्प्यांवरची स्वप्ने साकारण्यात त्या मदत करतात. सुयोग्य सल्ला, उत्तम सेवा या गुणांमुळेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांचा ग्राहकवर्ग आज समाधानी आहे. गीता यथायोग्य उत्पन्न आणि नफा मिळवून देण्यासाठी झटत असल्याने, या क्षेत्रामधील त्या एक ‌‘चलनी नाणं‌’ आहेत असं म्हटलं, तर ते वावगं ठरू नये!