भारताच्या पश्चिम किनाऱ्याला लागून असणाऱ्या घनदाट जंगलांमध्ये किंवा देवरायांमध्ये आढळणारी एक महाकाय वेल म्हणजे गारंबी. याच महावेलीची माहिती देणारा हा लेख...
उन्हाळ्याच्या दिवसात कोकणातल्या एका देवराईत सहजच जाणे झाले. उंच उंच झाडांच्या मांदियाळीत प्रवासाचा थकवा निघून गेल्यावर सभोवतालचे वातावरण डोळ्यांत साठवताना एक अजब अशी शेंग साधारण १५-२० फूट अंतरावरून एका झाडाला टांगलेली दिसली. कुतुहलाने झाडाजवळ जाऊन पाहिले, तर काहीतरी निराळेच चित्र समोर दिसत होते. महाकाय आंब्याच्या झाडाला अजस्र वेलीने अगदी जमेल तेवढे गुंडाळलेले होते. ही अजस्र लता होती गारंबीची. ‘गारंबी’ म्हणजेच 'entadarheedii' कोकणात बऱ्याच जंगलांत सापडणारी ही औषधी बी. ’Entada' हा शब्द पोर्तुगीज भाषेतील ’dentado' या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘दातांसारखा’ असा होतो. हा शब्द काही प्रजातींच्या खोड आणि पानांवरील उंचवट्यांना दर्शवतो. या प्रजातीचे नाव वनस्पतिशास्त्रज्ञ आणि निसर्ग अभ्यासक ’Hendrik Adriaan van Rheede' यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. त्यांनी भारतातील मलबार प्रदेशातील वनस्पतींचा अभ्यास करून HortusMalabaricus या प्राचीन ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित केला. मूलतः दक्षिण आफ्रिकेत आढळणारी ही वनस्पती भारतात पश्चिम घाट ते अगदी अंदमान बेटावरसुद्धा आढळते. या वनस्पतीच्या महाकाय लता अख्खे जंगल आपल्या कवेत घेतात. याच वेलींवरती साधारण डिसेंबर ते जानेवारी महिन्यात पिवळ्या रंगाचे सुगंधी तुरे फुलाफुलांतून बहरून येतात. सुगंधी फुलांच्या या तुऱ्यांतून फुलपाखरांची आणि भुंग्यांची विमाने झेपावू लागतात. या फुलपाखरांमध्ये फिकट चतुःनिलरेखा (Dakhan Pale Four-Line bluek), चतुःनिलरेखा (Continental Large Four-Lineblue) यांचाही सहभाग असतो.
या फुलपाखरांचा हा आश्रयवृक्ष. या वनस्पतीचे आकर्षण म्हणजे, तिची लांब शेंग. साधारण फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण वेलींवर हिरव्या रंगाच्या जाडसर शेंगा लगडलेल्या दिसतात. या शेगांच्या आत गडद तपकिरी रंगाच्या सुमारे आठ ते दहा बिया बंद झालेल्या दिसतात. चिंचेच्या बियांसारखीच ठेवण या बियांमध्ये झालेली दिसते; मात्र आकार मोठा असतो. पूर्वीच्या काळी बऱ्याच वेळा लहान मुलं खेळण्यासाठी या बियांचा वापर करायचे. कित्येकदा दगडाला घासून त्याचा चटका देऊन एखाद्याला पळवायचे कामसुद्धा प्रत्येकाच्या हातून घडले असेल. आता मात्र क्वचितच ही बी पाहायला मिळते. म्हणूनच की काय, पश्चिम घाटात ही वनस्पती धोक्यात आली आहे. बहुतांशी नद्यांच्या किनाऱ्यांवर वनस्पतीचा आढळ असल्यामुळे पाण्यात पडल्यावर बऱ्याच दिवसांनी बी अंकुरते.
यासाठी बियांचे जाडसर आवरणदेखील कारणीभूत आहे. आफ्रिकेत या बिया दैवी समजल्या जातात. पूर्वजांशी स्वप्नात बोलण्यासाठी या वनस्पतीच्या शेंगेचा उपयोग केला जातो! एक संपर्काचे माध्यम म्हणून दक्षिण आफ्रिकेत या वनस्पतीला पवित्र समजले जाते. भारतात मात्र याविरुद्ध परिस्थिती पाहायला मिळते. औषधी गुणांनी समृद्ध असणाऱ्या या बिया बाजारामध्ये हिमालयीन औषधी म्हणून विकल्या जातात. नुकतीच एका भोंदूबाबाकडून या बियांची लाखोंमध्ये विक्री झालेली बघायला मिळाली.
याखेरीज या वनस्पतीचे पारंपरिक औषधी उपयोग खूप महत्त्व आहे. सॅपोनिन्स, फ्लॅव्होनॉइड्स आणि इतर जैवसक्रिय घटक अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यामध्ये ॲण्टीऑक्सिडंट, ॲण्टीमायक्रोबियल आणि ॲण्टीट्यूमर गुणधर्म दिसून येतात. पोटदुखी, अतिसार आणि त्वचारोगांवर उपचार करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. भारतातील काही भागांमध्ये या बियांची भाजीदेखील केली जाते. कोकणात काही ठिकाणी ‘गायदडी’ म्हणून या वनस्पतीच्या नावाचा अपभ्रंश झालेला दिसतो. अजूनही आदिवासी लोक शरीरावर उठणाऱ्या गाठींसाठी या वनस्पतींच्या बियांचा वापर करताना दिसतात. आरोग्याचे महत्त्व जाणून, आजही आदिवासी स्त्रिया या गारंबीच्या बियांचा हार गळ्यात घालतात. या बियांची बाजारातली मागणीसुद्धा खूप जास्त आहे. साधारण ३५०-४०० रुपयांना आठ ते दहा बिया विकल्या जातात. जंगलतोड, धरण बांधकाम आणि अति शोषणामुळे या वनस्पतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तिचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक समुदायांच्या सहभागातून आणि नैसर्गिक अधिवासात पुनर्लागवड करून या वनस्पतीचे संरक्षण करता येईल. दापोलीतल्या कुडावळे गावच्या देवराईला, खानु गावच्या देवराहटीला आणि प्रचितगडाच्या पायथ्याशी असणारे संपूर्ण जंगल आपलेसे करणारी ही वनस्पती वाचवणे गरजेचे आहे.
परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापकपदावर कार्यरत आहेत.)
7447376997