मुंबई : (GalaxyEye) भारत आता सॅटेलाईट निर्मिती आणि सीमा सुरक्षेसह अद्ययावत प्रणालींमध्ये जागतिक पातळीवर आपली ओळख अधिक ठळक करत आहे. भारताच्या अवकाश इतिहासात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, बंगळुरूस्थित स्टार्टअप गॅलॅक्सि आयने विकसित केलेला ‘मिशन दृष्टी’ हा जगातील पहिला ऑप्टोसार हा उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात झेपावला आहे. हा उपग्रह स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे वंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. हा केवळ एक उपग्रह नसून, भारताच्या खाजगी अवकाश क्षेत्राच्या क्षमतेचे प्रतीक मानला जात आहे. ‘दृष्टी’ या नावाप्रमाणेच हा उपग्रह कोणत्याही परिस्थितीत ढगाळ वातावरण, पावसाळा किंवा रात्रीच्या अंधारात पृथ्वीवरील दृश्य स्पष्टपणे टिपण्यास सक्षम आहे.(GalaxyEye)
मिशन दृष्टि येण्यापूर्वी जगात असा कोणताही उपग्रह नव्हता जो या दोन्ही तंत्रज्ञानांचा वापर एकाच प्लॅटफॉर्मवर करू शकतो. याचे कारण म्हणजे या सेन्सर्सना वेगवेगळ्या कोनातून काम करावे लागते आणि ते वेगवेगळ्या वेळेत प्रतिमा घेतात. याशिवाय, ऑप्टिकल इमेजर्स आणि SAR उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये कार्य करतात. गॅलॅक्सी आय स्पेस ही कंपनी २०२१ साली आयआयटी मद्रास येथे पाच अभियांत्रिकी पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सुरू केली होती. या टीमचे नेतृत्व एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी सुयश सिंग यांनी केले. ही कंपनी पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रतिमांवर लक्ष केंद्रित करते आणि मागील पाच वर्षांपासून मिशन दृष्टि विकसित करण्यावर काम करत आहे.(GalaxyEye)
या उपग्रहाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात एकाच वेळी मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा आणि सिंथेटिक अॅपर्चर रडार तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. हे संयोजन आजवर जगात कुठल्याही उपग्रहात एकत्र वापरले गेले नव्हते. साधारणतः ऑप्टिकल कॅमेरे स्पष्ट आणि रंगीत प्रतिमा देतात, पण ढगांमुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. दुसरीकडे, सार तंत्रज्ञान ढगांमधून आणि अंधारातूनही जमिनीवरील माहिती मिळवू शकते. ‘दृष्टी’मध्ये या दोन्हींचा संगम करून एक नवे मानक निर्माण करण्यात आले आहे. सुमारे १९० किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात प्रगत उपग्रहांपैकी एक मानला जातो. याची प्रतिमा स्पष्टता सुमारे १.५ मीटर इतकी आहे, जी भविष्यातील उपग्रहांमध्ये ०.५ ते ०.३ मीटरपर्यंत सुधारण्याचा कंपनीचा मानस आहे.(GalaxyEye)
‘दृष्टी’ हा एक स्वतंत्र प्रकल्प नसून, तो भविष्यातील उपग्रह समूहाचा पहिला टप्पा आहे. गॅलॅक्सी आय पुढील काही वर्षांत अशा नऊ उपग्रहांचा समूह उभारण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही भागावर सतत नजर ठेवणे शक्य होईल. या उपग्रहाचे महत्त्व केवळ तांत्रिक नव्हे तर धोरणात्मकदृष्ट्याही मोठे आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, शेती, पायाभूत सुविधा निरीक्षण आणि संरक्षण क्षेत्रात याचा मोठा उपयोग होऊ शकतो. विशेषतः युद्धस्थितीत किंवा संवेदनशील घटनांमध्ये परदेशी उपग्रहांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल.(GalaxyEye)
या भारतीय उपग्रहामुळे चीन आणि पाकिस्तानवर आता भारताची करडी नजर असणार आहे. उपग्रह म्हणजे आकाशातील “सतत जागा असलेला पहारेकरी” जो कोणत्याही हवामानात आणि कोणत्याही वेळी देशाच्या सीमांवर नजर ठेवतो. उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे ते दिवस-रात्र सीमारेषेवर लक्ष ठेवू शकतात. सीमेवर संशयास्पद हालचाली, वाहनांची हालचाल किंवा गटांची हालचाल उपग्रहांच्या मदतीने पटकन ओळखता येते. ऑप्टोसार तंत्रज्ञानामुळे स्पष्ट आणि सर्व परिस्थितीत कार्यक्षम निरीक्षण, सीमारेषेवरील बदल, हालचाली अधिक अचूकपणे ट्रॅक करता येतात. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोरणात्मक फायदा होतो. सुरक्षा यंत्रणांना तात्काळ माहिती मिळाल्यामुळे जलद निर्णय घेणे शक्य होते.(GalaxyEye)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.