संघनिष्ठ जीवनाचा प्रभावी प्रवास; राष्ट्रसेवेचा अखंड ध्यास!

    04-May-2026
Total Views |

Digambar Bhadsaavale
 
इतिहास घडवणाऱ्या मोठ्या व्यक्तींच्या मागे अनेक असे कर्तृत्ववान, पण अल्पपरिचित कार्यकर्ते असतात, ज्यांच्या निष्ठा आणि त्यागावरच मोठ्या चळवळी उभ्या राहतात. समाजकार्य, संघनिष्ठा आणि राष्ट्रसेवेचा ध्यास घेऊन आयुष्य जगणाऱ्या कै. दिगंबर भडसावळे यांचे जीवन हे अशाच एका समर्पित कार्यकर्त्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
 
नेरळ येथील भडसावळे कुटुंबात ११ मार्च १९२० रोजी जन्मलेले कै. दिगंबर भडसावळे हे केवळ एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व नव्हते, तर राष्ट्रभक्ती, संघनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेले व्यक्तिमत्त्व होते. दिगंबररावांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठेवला. त्यांचे शालेय शिक्षण कल्याण येथे झाले, तर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. मात्र घरगुती अडचणींमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर पुण्यातच नोकरी व छोटे-मोठे व्यवसाय करत त्यांनी जीवनाची घडी बसवली. १९४४ साली त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर त्यांनी नेरळ येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पुढे १९५२ नंतर त्यांनी कंत्राटदार म्हणून व्यवसाय सुरू केला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत एक नामांकित सरकारी कंत्राटदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
 
१९२५ साली डॉ. हेडगेवार यांनी संघस्थापना केल्यावर त्यांच्या विचाराने भारावून दिगंबररावांनी संघ स्वयंसेवक म्हणून व्रत स्वीकारले. त्यांनी संघाचे तृतीय वर्ष पूर्ण केले आणि संघकार्याला स्वतःला अर्पण केले. पुण्यातील त्यांच्या वास्तव्यात त्यांचा कसबा संघस्थानाशी घनिष्ठ संबंध आला. येथेच त्यांचा परिचय रामभाऊ म्हाळगी, सुधीर फडके यांच्यासारख्या व्यक्तींशी झाला. बापूराव धारप (मूळ नेरळ) हे पुणे येथे वास्तव्यास गेले होते. त्यांच्याकडे जाणे-येणे होत असल्याने तेथेच शेजारी बाबाराव भिडे व देवकुळे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आले.
 
१९५० नंतर संघाने महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची फळी उभी केली. या कार्यात सहभागी होत दिगंबर भडसावळे कोल्हापूर येथे प्रचारक म्हणून गेले. त्याच ठिकाणी भालजी पेंढारकर यांचा त्यांना आशिर्वाद लाभला. कोल्हापूर, जयसिंगपूर आणि इचलकरंजी या भागांत त्यांनी संघकार्याचा विस्तार केला आणि स्थानिकांशी स्नेहबंध दृढ केले. १९४८ मध्ये संघबंदीच्या काळात आणि महात्मा गांधी हत्येच्या काळात त्यांना दोन वेळा अटक झाली. तरीही त्यांनी आपल्या विचारांपासून माघार घेतली नाही. भारतीय जनसंघाच्या स्थापनेनंतर दिगंबररावांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला. कर्जत तालुक्यात जनसंघाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. १९७७ साली जनता पार्टी स्थापन होईपर्यंत ते या कार्यात अग्रभागी राहिले.
 
दिगंबररावांचे व्यक्तिमत्त्व शांत, संयमी आणि जिव्हाळ्याचे होते. त्यांच्या घरी अनेक दिग्गज व्यक्तींचे वास्तव्य होत असे. जगन्नाथराव जोशी, नानाजी देशमुख, राम जेठमलानी यांसारख्या अनेक नामवंत व्यक्तींशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. या सर्वांच्या सहवासामुळे त्यांच्या घराचे वातावरण सतत प्रेरणादायी आणि बौद्धिकदृष्ट्या समृद्ध असे. घरातील साधेपणा, आदरातिथ्य आणि स्नेह यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलेपणाची जाणीव होत असे.
 
दिगंबररावांच्या पत्नी या नारायण उर्फ नाना देवधेकर यांच्या कन्या होत्या, ज्यांचा संबंध स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांच्याशी परिचयाच्या रूपात होता. त्यामुळे दिगंबररावांच्या कुटुंबात राष्ट्रभक्तीचे संस्कार खोलवर रुजले होते. दिगंबर भडसावळे यांचे आयुष्य हे प्रसिद्धीपासून दूर राहूनही प्रभावी कार्य करणाऱ्या व्यक्तीचे उदाहरण आहे. त्यांनी संघकार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय योगदान यांचा समतोल साधत आपले आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्या आयुष्यात आलेल्या असंख्य महान व्यक्तींच्या सहवासाने आणि त्यांच्या स्वतःच्या कार्याने एक समृद्ध, प्रेरणादायी वारसा निर्माण केला. त्यांचे जीवन हे आजच्या पिढीसाठी कर्तव्य, निष्ठा आणि साधेपणाचा आदर्श ठरते.