Cooper Hospital, Mumbai : कूपर रुग्णालयात सर्व ठिकाणी कचराच कचरा
-संपामुळे जैववैद्यकीय कचऱ्याचा साठा वाढला
04-May-2026
Total Views |
मुंबई : (Cooper Hospital, Mumbai) विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या संप व मनुष्यबळाच्या तुटवड्यामुळे कचरा उचलण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. रुग्णालय परिसरात कचऱ्याच्या डब्यांमधून कचरा ओसंडून वाहत असून, सर्वत्र धूळ आणि झुरळांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. विशेषतः जैववैद्यकीय कचरा साचत असल्याने रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.(Cooper Hospital, Mumbai)
या पार्श्वभूमीवर, जैववैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. नियमांचे पालन न झाल्यास रुग्णालय बंद करण्याची कारवाई का करू नये, असा सवाल त्या नोटीसमध्ये उपस्थित करण्यात आला होता.(Cooper Hospital, Mumbai)
दरम्यान, कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी सांगितले की, “कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत वारंवार चर्चा झाली आहे. अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्याशीही बैठक झाली आहे. मात्र, कंत्राटदार संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देत नसल्याने ही समस्या वारंवार निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून आता रुग्णालयाच्या स्वच्छतेचे कंत्राट दुसऱ्या कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता आहे. सध्या स्वच्छतेसाठी इतर कंत्राटी कामगारांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.”(Cooper Hospital, Mumbai)
रुग्णालयातील वाढती अस्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनातील त्रुटी लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.(Cooper Hospital, Mumbai)