खाद्यफळाच्या उपलब्धतेवर धनेश पक्ष्यांची वीण अवलंबून असते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धनेशाचे प्रिय खाद्यफळ म्हणजे ‘चारबोरं’ अर्थात चारोळी! याच राजापूरच्या चारोळीचे आणि धनेशाचे नाते उलगडणारा हा लेख...
रत्नागिरी जिल्ह्यातील सड्यांवर फिरताना अनेकदा निसर्ग आपल्याला अनपेक्षित भेटी देतो. काही भेटी डोळ्यांना दिसतात, काही कानांना ऐकू येतात, तर काही मनात कायमच्या घर करून राहतात. चारबोरं ही अशीच एक भेट, जिची ओळख आधी फक्त नावापुरती होती, पण प्रत्यक्ष अनुभवाने तिचे महत्त्व अधिक गडद झाले. चारबोरं हा शब्द प्रथम नवेदर आणि राजापूर परिसरात ऐकला. मलबारी धनेशाच्या (Malabar pied Hornbill) ढोलीखाली सापडणाऱ्या कठीण कवचाच्या बियांची ओळख करून देताना, समीर कुंटे आणि धनंजय मराठे यांनी हा शब्द उच्चारला. तेव्हा कुतूहल वाटले, पण त्या बिया आपल्या सड्यावर मिळतात, याची कल्पनाही नव्हती. ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या धनेश प्रजाती संवर्धन कार्यक्रमात आम्ही धनेश प्रजातींच्या ढोल्या असणाऱ्या झाडांचे निरीक्षण आणि संवर्धन करत आहोत. मादी ढोलीत गेल्यानंतर नर तिच्यासाठी संपूर्ण विणीच्या हंगामात वेगवेगळी फळे आपल्या गळ्याखाली असणाऱ्या ‘गुलार पाऊच’मध्ये भरून आणतो आणि एकेक फळ काढून तिला भरवतो. यातील कठीण कवचाच्या बिया मादी त्याचा गर खाऊन ढोलीखाली टाकून देते. या बिया गोळा करून त्यापासून रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करण्याचे काम आम्ही करत आहोत. अशाच राजापूरमध्ये मिळालेल्या बिया रुजवल्या, त्यातून रोप वाढले आणि एके दिवशी लक्षात आले की, अरे, हीच ती चारोळी! हा साक्षात्कार जसा अचानक होता, तसाच तो आनंददायीदेखील होता.
चारबोरांच्या गोष्टी मात्र आधीपासून ऐकलेल्या होत्या. रानात फिरताना जांभळे, करवंद, तोरणं, अळू यांच्यासोबत मिटक्या मारत खाल्लेल्या या बोरांचा उल्लेख मित्रांच्या गप्पांमध्ये वारंवार यायचा. त्यामुळे यंदा पावसाळ्यापासूनच एक ठरवले होते की, यावेळी सड्यावर जाऊन चारबोरं प्रत्यक्ष चाखायचीच. तो योग यंदा आला. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील देवीहसोळच्या पुढे जाताना रस्त्याच्या कडेला उंच कड्यावर चारोळीचे झाड दिसले. मग सुरू झाली आमची धडपड काठ्या, प्रूनर आणि विविध युक्त्या वापरत आम्ही एक फळ खाली पाडले. ते पडताच आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. पहिल्याच घासात जाणवलेली चव ही किंचित आंबट, किंचित गोड होती. त्यानंतर मात्र सड्यावरची प्रत्येक झाडे शोधत आम्ही फिरत राहिलो. एक छोटा अनुभव, पण मनात कायमचा कोरला गेलेला.
चारोळीचा वृक्ष शास्त्रीय भाषेत Buchanania lanzan या नावाने ओळखला जातो आणि तो नाकार्डिएसी (Anacardiaceae) कुळातील आहे. याच कुळात आंबा आणि काजू यांचाही समावेश होतो. भारतासह म्यानमार, कंबोडिया, चीन आणि थायलंड या देशांत हा वृक्ष आढळतो. उष्ण आणि कोरड्या हवामानात हा मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष उत्तम वाढतो. भारतात तो विशेषतः रुक्ष आणि विरळ वनांमध्ये दिसून येतो. पाणथळ प्रदेश मात्र त्याला मानवत नाही. चारोळीच्या बियांना (चारोळ्या) विशेष पौष्टिक
मूल्य आहे. त्यामध्ये सुमारे ६१ टक्के तेल, १२ टक्के स्टार्च, ३१ टक्के प्रथिने आणि पाच टक्के शर्करा आढळते. म्हणूनच विविध मेवा-मिठाईत चारोळ्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे चव अधिक समृद्ध होते. फळांचा उपयोग त्वचारोगांवरही केला जातो. काही आदिवासी भागांत फळांच्या गराची भुकटी करून चेहऱ्यावर लेप लावण्याची प्रथा आहे. झाडाच्या सालीतून निघणारा डिंक बद्धकोष्ठता निर्माण करणारा असल्याने अतिसारावर उपयोगी ठरतो. उजाड टेकड्यांवर लागवडीसाठी हा वृक्ष विशेष उपयुक्त मानला जातो.
या संपूर्ण अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते; धनेश आणि सडा यांचे नाते केवळ अधिवासाचे नाही, तर संवर्धनाचे आहे. धनेशासारखे पक्षी बिया दूरवर पसरवतात आणि अशा अनेक वृक्षांच्या पुनर्जन्माला कारणीभूत ठरतात. चारबोरं ही त्याचीच एक जिवंत साक्ष. याखेरीज वड, पिंपळ, उंबर, चांद्फळ, काजरा, जंगली बदाम, सूर माड अशा अनेक प्रजातींचा प्रसार या पक्ष्यांच्या माध्यमातून होतो. धनेशाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा दूरवर होणारा प्रवास. विणीच्या हंगामात खाद्य गोळा करण्यासाठी नर धनेश साधारणपणे चार ते पाच किमीचा प्रवास करत असल्याचे डॉ. रोहित नानिवडेकर यांनी केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे, तर इतर वेळी अगदी दहा ते बारा किमीपेक्षा जास्त क्षेत्रात धनेश प्रजातींची खाद्यभ्रमंती चालत असल्याचे अभ्यास सांगतो. अनेक वृक्ष प्रजातींच्या कठीण कवचाच्या बिया निसर्गतः त्यांना मिळालेल्या संरक्षणामुळे रुजणे अवघड असते. परंतु, धनेश प्रजातींच्या पोटात होणाऱ्या आम्ल-रासायनिक प्रक्रियेमुळे या बियांची कवचे मऊ होऊन त्या सहजतेने रुजतात आणि मूळ वृक्षापासून दूरवर पसरतात. काही वृक्ष प्रजाती तर बीजप्रसारासाठी मुख्यतः धनेश प्रजातींवर पूर्णपणे अवलंबून असल्याचे आढळते. यामुळेच धनेशांना मिळालेली ‘जंगलाचे शेतकरी’ ही बिरुदावली सार्थ ठरते. धनेश पक्ष्यांच्या एका दिवसाच्या गोळा केलेल्या विष्ठेत साधारणता वड, पिंपळ अशा देववृक्षांच्या हजारोंच्या संख्येने बिया आढळतात. म्हणजेच सरासरी ५० वर्षे जगणाऱ्या एका महाधनेशाकडून वर्षाला साधारणपणे ३ लाख, ६५ हजार, तर पूर्ण आयुष्यात अंदाजे १.८ कोटी बियांचा प्रसार होत असतो. मानवी प्रयत्न कितीही केले, तरी एवढ्या वृक्ष प्रजातींचा प्रसार हा केवळ अशक्यप्राय आहे. यामुळेच वृक्षतोड, अधिवास नष्ट होणे, वातावरण बदल अशा केवळ मानवनिर्मित धोक्यांमुळे संकटग्रस्त झालेला एक एक धनेश वाचवणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे. आज जेव्हा आपण जंगल, सडे आणि कोकणातील जैवविविधतेबद्दल बोलतो, तेव्हा अशा या छोट्या अनुभवांमधून मोठी जाणीव निर्माण होत असते. गरज आहे, ती निसर्ग आपल्याला देत असलेल्या प्रत्येक भेटीची कदर करण्याची. धनेश आणि सड्याने दिलेली ही चारबोरांची भेट नक्कीच मनात कायमची साठवून ठेवावी अशीच.
चारोळीविषयी...
चारोळीला कोकणात ‘चारबोरं’ म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये याला ‘प्रियाल’ आणि हिंदीत ‘चिरोंजी’ म्हणतात. हे भारतीय उपखंडातील कोरड्या पानझडी जंगलातील एक महत्त्वाचे झाड आहे. याच्या बियांचा उपयोग प्रामुख्याने भारतीय मिठाई आणि पारंपरिक औषधांमध्ये केला जातो. हे मध्यम आकाराचे पानझडी झाड असून याची उंची साधारण १५-२० मीटरपर्यंत असते. याची साल जाड, गडद करडी आणि मगरीच्या कातडीसारखी खडबडीत असते. उन्हाळ्यात (एप्रिल-मे) याला काळ्या रंगाची छोटी फळे येतात. फळाच्या आत एकच कठीण बी असते, ज्याला आपण चारोळी म्हणतो. याची चव बदामासारखी असते. आयुर्वेदात चारोळीचे अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. याच्या बियांची पावडर गॅस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेवर गुणकारी मानली जाते. चारोळीची पावडर किंवा तेल त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि पुरळ किंवा खाज कमी करण्यासाठी वापरले जाते. हे उत्तम पौष्टिक आणि कामोत्तेजक (aphrodisiac) मानले जाते, जे शरीरातील कमजोरी दूर करण्यास मदत करते. सद, खोकला आणि दम्यासारख्या त्रासांत याच्या फळांचा उपयोग होतो.
मलबारी कवड्या धनेशाविषयी
‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संशोधकांना चारोळीच्या बिया या केवळ राजापूर तालुक्यातील मलबारी कवड्या धनेशाच्या घरट्याखाली पडलेल्या मिळाल्या. यानुसार प्रदेशानुरूप त्या भागात उपलब्ध असणाऱ्या झाडांच्या फळांचा धनेशाच्या खाद्यात समावेश असल्याचे लक्षात येते. शिवाय, राजापूर तालुक्यात ही झाडे सड्यांवर मोठ्या संख्येने असल्याने मलबारी कवड्या धनेशच त्याच्या बिया खात असल्याचे लक्षात येते. कारण, महाधनेश हा प्रामुख्याने जंगलातील झाडांच्या बियांवर अवलंबून असून त्याच्या ढोलीखाली चारोळीच्या बिया आढळून आलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील सह्याद्रीत आढळणाऱ्या मलबारी कवड्या धनेशाची वीण ही डिसेंबर ते मार्च या कालावधीत होते. याच पक्ष्याची वीण विदर्भात मार्च ते जून या महिन्यांमध्ये होते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार खाद्यफळाच्या उपलब्धतेवर धनेश पक्ष्यांची वीण अवलंबून असते.
प्रतीक मोरे
(लेखक रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक असून ‘आययूसीएन’च्या धनेश पक्षी गटाचे सदस्य आहेत.)
7798233243