काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्|
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा॥
अर्थात, विद्वान लोकांचा वेळ हा काव्य आणि शास्त्रांच्या चर्चेत जातो; तर मूर्खांचा वेळ वाईट सवयी, झोप किंवा भांडणतंट्यात जातो. माणसाच्या जीवनातील काव्याचे अनन्यसाधारण महत्त्व, यांतूनच अधोरेखित होते. लहानपणी बडबडगीतांमुळे आपल्याला भाषेचा परिचय होतो. कवितेच्या विश्वामध्ये रमताना भावनांच्या, अनुभूतीच्या विविध छटा हळूवारपणे उलगडतात आणि माणूस संवेदनशील होतो. चांगली कविता लिहिणारे जसे शब्दसुरांच्या शोधात असतात, तसेच कवितेचा शोध घेणाऱ्या माणसांचासुद्धा एक वेगळाच प्रवास सुरु असतो. अशाच एका शोधामुळे वाङ्मयीन जगात सुखाची लाट पसरली आहे.
इटलीची राजधानी रोममधील ‘नॅशनल सेंट्रल लायब्ररी’मध्ये, एका जुन्या हस्तलिखिताचा अभ्यास करताना एक कविता सापडली. ‘ट्रिनिटी कॉलेज डब्लिन’च्या डॉ. एलिझाबेथ मॅग्नांटी आणि डॉ. मार्क फॉल्कनर या दोन संशोधकांना, या कवितेचा शोध लागला. ही कविता सुमारे १ हजार, ३०० वर्षांपूर्वी (सातव्या शतकात) लिहिली गेली असून, ही कविता कॅडमन नावाच्या एका व्यक्तीने रचली होती. तो इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायरमधील व्हिटबी येथील, एक गुराखी होता. म्हणूनच त्याच्या रचनेला ‘कॅडमन्स हाईन’ असे म्हटले गेले.
ओल्ड इंग्लिश अर्थात अँग्लो-सॅक्सन प्रकरातील इंग्रजी भाषेमध्ये, या कवितेची रचना करण्यात आली आहे. आजच्या काळात त्या भाषेतील केवळ ३० लाख शब्दच असल्याचे बोलले जाते. त्यांपैकी बहुतेक दहाव्या आणि अकराव्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. असे म्हटले जाते की, कॅडमन हा अशिक्षित होता. त्याला लिहिता-वाचता येत नव्हते. पण, एका रात्री पडलेल्या दैवी स्वप्नातून, त्याला ही कविता स्फुरली. ही कविता देवाची स्तुती करणारी, नऊ ओळींची रचना आहे. जगात या कवितेच्या, केवळ दोनच प्रती (केंब्रिज आणि रशियात) उपलब्ध होत्या. रोममध्ये सापडलेली ही तिसरी जुनी प्रत आहे. आधीच्या प्रतींमध्ये ही कविता, लॅटीन मजकुराच्या खाली तळटीप म्हणून लिहिलेली होती. मात्र, रोममध्ये सापडलेल्या या नवीन प्रतीमध्ये, ती मुख्य मजकुराचा भाग आहे. यावरून इंग्रजी काव्याला त्याकाळी किती महत्त्व होते, याची प्रचिती येते.
सदर कविता ‘व्हेनेरेबल बीड’ या प्रसिद्ध ख्रिश्चन विद्वानाने लिहिलेल्या ‘Ecclesiastical History of the English People’ या ग्रंथाच्या हस्तलिखितात सापडली. बीड हे इंग्लंडच्या इतिहासातील सर्वांत मोठे विद्वान. डॉ. मार्क फॉल्कनर यांच्या मते, हा शोध आपल्याला इंग्रजी भाषेच्या सुरुवातीच्या काळाशी जोडतो.
प्रामुख्याने भाषेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा शोध म्हणजे, महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. संस्कृतीच्या अंतरंगात शिरताना, मौखिक परंपरेसोबतच, लिखित दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचे असेच.आपली मुळं शोधणाऱ्या पिढ्यांच्या वाटेला हे संचित आल्यास, सर्जनशील नवनिर्मितीच्या प्रवासात याचा उपयोग होतो. एका सामान्य माणसाने रचलेली ही कलाकृती इतकी वर्षे टिकून राहणं आणि काळाच्या ओघात ती लोकांसमोर येणे, ही एक विलक्षण बाब.
सध्याच्या घडीला आपल्या जगावर युद्धाचं, आर्थिक मंदीचं सावट आहे. जगाच्या एका कोपऱ्यात भुकेने व्याकूळ होऊन मरणयातना भोगणारी माणसं, तर दुसऱ्या बाजूला युद्धाच्या तडाख्यात डोक्यावर छप्पर नसलेली माणसं. माणसाच्या सहिष्णुतेचा, संयमाचा अंत बघणारा हा काळ. मात्र या काळातसुद्धा माणसाला त्याच्या अंतरीचा दीप प्रज्वलित करावाच लागतो. एक नितळ आणि निर्मळ भविष्याची निर्मितीसाठी त्याला आधार असतो, तो कलेचा. काही दिवसांपूर्वी इराणी संगीतकार, हमिदरेझा अफारिदेह याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. युद्धात त्याची संगीत शाळा उद्ध्वस्त झाली. त्या उद्ध्वस्त शाळेच्या ढिगाऱ्यावर बसूनच एक दिवस त्याने, ‘कमानचे’ (पारंपरिक पर्शियन वाद्य) वाजवले. बॉम्बगोळ्यांचा आवाज माणसाचं जीवन संपवणारा ठरतो, लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करतो. मात्र, दुसऱ्या बाजूला संगीताचा आवाज माणसाच्या मनामध्ये आशा निर्माण करतो. काव्य, संगीत, नृत्य; कला कुठलीही असो, माणसाच्या जीवनाला अर्थ देणाऱ्या या गोष्टींना जपण्याची वेळ आली आहे, हे नक्की!