एका अज्ञात चित्रकार जोडप्याचा शोध...

    31-May-2026
Total Views |
Forgotten Artist Couple Rediscovered
 
इतिहासाच्या पानांतून हरवलेल्या कर्तृत्ववान कलाकारांचा शोध घेऊन भारतीय कलेचा वारसा समृद्ध करणे, ही काळाची गरज. याच पार्श्वभूमीवर कला इतिहासतज्ज्ञ संदीप दहिसरकर यांनी ‘बॉम्बे स्कूल’ परंपरेतील विस्मरणात गेलेले भारतातील सर्वांत जुने चित्रकार पती-पत्नी व्ही. बी. पाठारे आणि प्रेमा पाठारे यांच्या कलाप्रवासावर प्रकाश टाकला आहे. आज, दि. ३१ मे रोजी या विशेष पुस्तकाचे प्रकाशन ‘एनजीएमए’मध्ये संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने पाठारे दाम्पत्याच्या समृद्ध कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख.
 
असे म्हणतात की, इतिहास फक्त विजेत्यांचा, राजे-महाराजांचा, प्रसिद्ध व्यक्तींचा लिहिला गेला. प्राचीन भारतीय इतिहासात ‘हर्षचरित’, ‘बुद्धचरित’ अशी फार थोडी उदाहरणे माहीत आहेत. पूर्वीचे लेखक पारंपरिक पद्धतीने पोथीस्वरूपात, काव्यात्मक इतिहास लिहीत. मात्र, प्राचीन आणि मध्ययुगात भारतीय कलाकारांची स्वतंत्र चरित्रे काही लिहिली गेली नाहीत. कलाकारांचे चरित्र लिहिण्याचा प्रघात पाश्चिमात्य संस्कृतीमुळे सुरू झाला आणि याला ‘आर्ट स्कूल’चे पोषक वातावरण आणि तत्कालीन इंग्रजी धाटणीचे राहणीमान कारणीभूत ठरले.
 
राव बहादूर म. वि. धुरंधरांनी (१८६७-१९४४) लिहिलेले त्यांचे ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ हे आत्मचरित्र आर्ट स्कूलभोवती विणलेले एक सुंदर उदाहरण आहे. त्यांनीच पुढे ‘वसुंधरा’ मासिकाच्या अंकात त्यांच्या सहअध्यायी आणि विद्यार्थ्यांवर चरित्रात्मक लेख लिहिले. पण, स्वतःविषयी लिहिणारे कलाकार आणि हे कलाकार जिवंत असताना त्यांच्याविषयी लिहिणारे कितीसे लेखक आपल्याला माहीत आहेत?
 
‘बॉम्बे स्कूल’ कलापरंपरेत असंख्य मराठी कलाकार तयार झाले. इतके की, त्यांच्यावर दृश्यकलेचा खंड निर्माण करावा लागला. स्वातंत्र्यापश्चात बाबुराव सडवेलकर आणि सध्याच्या काळात त्यांचेच आवडते तरुण प्राध्यापक सुहास बहुळकर यांनी दस्तऐवजीकरणाचे महत्त्व जाणून लिखाण केले. ‘बॉम्बे स्कूल’ परंपरेत तयार झालेल्या या दोन कलाकारांच्या लेखनाला विशेष महत्त्व आहे. पण, अनेकदा काळाच्या मर्यादा आणि अधिक माहितीचा अभाव कुठेना कुठेतरी जाणवतो. हा अभाव कायमचा दूर करणे आता गरजेचे झालेले आहे. ते कशाला हवे? कला-बाजारात वाढत्या किमतींमुळे ठरावीक कलाकृतींची वाढती मागणी व त्यामुळे होणार्‍या चोर्‍या आणि कलाकृतीच्या नकलांवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी!
 
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चित्रकार धुरंधरांच्या माझ्या नव्या ग्रंथानंतर मुंबईतील चित्रकार जोडपे- विनायक बाळकृष्ण पाठारे आणि प्रेमा पाठारे यांचा ‘आर्ट कॅटलॉग’ ‘बॉम्बे स्कूल’च्या इतिहासात नव्याने भर पाडण्याचा प्रयत्न करतो.
 
कोण आहेत हे पाठारे चित्रकार? या सहा महिन्यांच्या संशोधनादरम्यान मला असे लक्षात आले की, हे भारतातील सर्वांत जुने चित्रकार पती-पत्नी आहेत व्ही. बी. पाठारे (१९१०-२००५) हे चित्रकार सावळाराम हळदणकर (१८८२-१९६८) यांचे शिष्य आणि व्यक्तिचित्रे काढत, तर प्रेमा पाठारे (१९१८-१९९७) या ‘हळदणकर इन्स्टिट्यूट’, तसेच जे. जे. कलाशाळेत १९४० साली शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्या व निसर्गचित्रांसाठी प्रसिद्ध झाल्या. प्रेमाताईंनी १९४१ साली पाठारे यांच्याशी आपले शिक्षण पूर्ण करूनच विवाह केला. २०२६ साली त्यांच्या लग्नाच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त हे पुस्तक दि. ३१ मे रोजी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई येथे प्रसिद्ध होत आहे.
 
या कॅटलॉगमध्ये व्ही. बी. पाठारे आणि त्यांच्या पत्नीचा जीवनप्रवास आणि त्यांच्याशी संबंधित मेडल, प्रशस्तिपत्रे, जुनी छायाचित्रे व मौल्यवान पत्रव्यवहार प्रसिद्ध होत आहे. याद्वारे त्यांच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरची जीवनशैली व त्यांना मिळालेल्या राजाश्रयाबरोबर लोकाश्रयाचा मागोवा घेता येतो. चित्रकार व्ही. बी. पाठारे हे प्रसिद्ध ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे एकेकाळी अध्यक्षदेखील होते. चित्रकार धुरंधरांचे शिष्य चित्रकार हळदणकर, त्यांचे शिष्य पाठारे आणि पाठारे यांचे शिष्य ए. एस. तेंडुलकर, असा कलेचा वारसा वाचताना जाणवतो. चित्रकार पाठारे यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड, सर फिरोजशाह मेहता, नामदार गोखले, सरदार यादवराव घोरपडे, डॉ. रख्माबाई राऊत, डॉ. भाऊ दाजी लाड, सर सी. व्ही. रमन, जस्टीस तेलंग, जस्टीस के. टी. देसाई, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फ्रामजी अलपायवाला, भाऊसाहेब वर्तक, जनरल बेवूर, कर्नल बुर्ली इत्यादी महान व्यक्तिमत्त्वांची चित्रे रेखाटली आहेत.
 
महाराष्ट्र शासनासाठी महात्मा जोतिबा फुले यांचे १९८५ साली अधिकृत व्यक्तिचित्र बनवणारे पाठारे यांनी वयाच्या २५व्या वर्षी १९३४ साली मुंबई ते पेशावर असा एकल सायकलप्रवास केला. या धाडसी प्रवासात त्यांनी अनेक निसर्गचित्रे बनवली व ती विकून जमलेल्या पैशांतून स्वतःच्या परदेशातील उच्चशिक्षणाची सोयदेखील केली. अशा प्रकारच्या गोष्टी निश्चितपणे नव्या पिढीसमोर आदर्श ठरतात आणि सतत काही नवीन करण्यासाठी प्रेरणा देतात. या पुस्तकात व्यक्तिचित्रण व निसर्गचित्रणाविषयीसुद्धा लेखन केले आहे. सदर पुस्तकास चित्रकार बहुळकर यांची प्रस्तावना लाभली असून, पुस्तक ‘पॉप्युलर प्रकाशन’ यांनी छापले आहे.
 
 - संदिप दहिसरकर