दख्खन प्रांतात सातत्याने बदलणार्या भू-राजकीय परिस्थितीचा प्रभाव ठाणे शहरावर, तिथल्या लोकसंस्कृतीवरसुद्धा पडला. पोर्तुगीजांची जुलमी राजवट या नगराने अनुभवली; तर दुसर्या बाजूला इंग्रजांच्या राजवटीविरोधातही ठाणेकर पेटून उठला. सत्तांतराच्या आणि संस्कृतीमधील परिवर्तनाच्या असंख्य लाटा झेलणार्या ठाणे शहराच्या इतिहासाचा मागोवा घेणारा हा उत्तरार्धाचा लेख...
पोर्तुगीजांनी १५३५ मध्ये ठाण्यावर पूर्णपणे कब्जा मिळवला. आजचे ठाणे शहर ज्या भागात वसलेले आहे, तिथपासून ते थेट घोडबंदर किल्ल्यापर्यंतचा संपूर्ण परिसर पोर्तुगीजांच्या अमलाखाली होता. ‘घोडबंदर’ या नावाचा इतिहासही अत्यंत रंजक आणि पोर्तुगीजांच्या आधीच्या काळाशी जोडलेला आहे. प्राचीन काळापासूनच घोडबंदर हे एक आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. या बंदरावरून इराण आणि एडन येथून उत्तम जातीचे अरबी घोडे जहाजांमधून भारतात आणले जात. हे घोडे याच बंदरावर उतरवले जात आणि तिथून ते खरेदी-विक्रीसाठी भारतभर वेगवेगळ्या राजांच्या पदरात पाठवले जात. घोड्यांची आयात-निर्यात करणारे प्रमुख बंदर असल्यामुळेच या परिसराला ‘घोडबंदर’ हे नाव मिळाले. पोर्तुगीजांनी या बंदराचे धोरणात्मक महत्त्व ओळखून तिथे सुरुवातीला एक लष्करी चौकी आणि नंतर मोठा किल्ला उभारला.
पोर्तुगीज हे केवळ व्यापारी किंवा राजे म्हणून भारतात आले नव्हते, तर ‘धर्मप्रसार’ हे त्यांचे मुख्य आणि अत्यंत आक्रमक उद्दिष्ट होते. आपल्या सत्तेचा आणि लष्करी बळाचा गैरवापर करून त्यांनी ठाण्यातील स्थानिक जनतेला जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. ठाण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक रचनेला त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. यासंदर्भात ‘ठाणे सिल्क’ (रेशीम उद्योग) आणि तिथल्या विणकरांचा इतिहास अत्यंत महत्त्वाचा. ठाण्यातील ‘खत्रीवाडा’ भागात राहणारे बहुतांश कुशल विणकर हे इस्लामधर्मीय होते. पोर्तुगीजांनी जेव्हा त्यांच्यावर जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला आणि अनन्वित छळ सुरू केला, तेव्हा या स्वाभिमानी विणकरांनी धर्मांतर करण्याऐवजी आपले घरदार सोडण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दोन दिवसांत या सर्व विणकरांनी ठाणे शहर सोडले आणि ते शेजारच्या भिवंडी परिसरामध्ये स्थलांतरित झाले. आज भिवंडी जे कापड उद्योग आणि ‘हॅण्डलूम इंडस्ट्री’ (हातमाग व यंत्रमाग उद्योग)चे संपूर्ण भारतात मोठे केंद्र बनले आहे, त्याची खरी सुरुवात ठाण्यातून पळून आलेल्या याच विणकरांमुळे झाली होती.
विणकरांप्रमाणेच ठाण्यातील काही पारशी कुटुंबेही पोर्तुगीजांच्या भीतीपोटी आणि अत्याचाराला कंटाळून ठाणे सोडून निघून गेली. परंतु, जे स्थानिक लोक मागे राहिले, त्यातील जवळजवळ ६० टक्के मूळ रहिवाशांना पोर्तुगीजांनी तलवारीच्या आणि अत्याचाराच्या बळावर ख्रिश्चन धर्मात रूपांतरित केले. धर्मप्रसाराचे प्रतीक म्हणून त्यांनी ठाणे परिसरात १२ ते १५ भव्य चर्चेस उभारली. पोर्तुगीजांचे धोरण केवळ स्थानिकांचे शोषण करणे आणि त्यांना गुलामासारखे राबवणे, हेच होते. जेव्हा १७३०च्या सुमारास त्यांनी ठाण्याच्या मुख्य किल्ल्याचे बांधकाम सुरू केले, तेव्हा त्यांनी ठाणे आणि आसपासच्या गावातील गरीब लोकांना ‘वेठबिगार’ (विनामोबदला मजूर) म्हणून पकडून आणले. या कामगारांचे किल्ल्याच्या बांधकामादरम्यान अमानुष हाल करण्यात आले, अनेकांना प्राणाला मुकावे लागले.
याहून भयंकर गोष्ट म्हणजे, पोर्तुगीजांनी ठाण्याचा प्राचीन सांस्कृतिक इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ठाण्यातील जुने राजवाडे, प्राचीन हिंदू मंदिरे आणि सांस्कृतिक वास्तू तोडून, फोडून उद्ध्वस्त केल्या. त्या वास्तूंचे अवशेष त्यांनी जमिनीत गाडून टाकले किंवा काही मूर्ती तलावांमध्ये बुडवून दिल्या. यामुळेच पोर्तुगीजांची राजवट ही ठाण्याच्या इतिहासातील एक ‘काळी राजवट’ मानली जाते. पोर्तुगीजांच्या या जुलमी राजवटीतून साष्टी आणि ठाण्याला मुक्त करण्याचे श्रेय आंजूरच्या नाईक कुटुंबाला आणि पेशव्यांच्या शौर्याला जाते.
दि. २७ मार्च १७३७च्या पहाटे, ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा ‘भगवा जरीपटका’ अत्यंत अभिमानाने फडकवला गेला. ठाणे शहर पोर्तुगीजांच्या २०० वर्षांच्या जुलमी तावडीतून कायमचे मुक्त झाले. मराठ्यांचा पराक्रम इतका मोठा होता की, ठाण्यातील सर्वच्या सर्व पोर्तुगीज अधिकारी आणि नागरिक तिथून पळून गेले; एकही पोर्तुगीज माणूस ठाण्यात शिल्लक राहिला नाही. मराठ्यांच्या राजवटीनंतर १८१८च्या सुमारास ठाण्यावर ब्रिटिशांचे (इंग्रजांचे) नियंत्रण आले. ब्रिटिशांनी त्यांच्या प्रशासकीय आणि व्यापारी फायद्यासाठी अनेक सुधारणा करायला सुरुवात केली. ते मुंबईला एक आंतरराष्ट्रीय व्यापारी शहर आणि सुरक्षित बंदर म्हणून विकसित करत होते. मुंबईतून कापूस आणि इतर कच्चा माल इंग्लंडला जलदगतीने पाठवण्यासाठी आणि देशांतर्गत व्यापार वाढवण्यासाठी ब्रिटिशांना एका वेगवान वाहतूक व्यवस्थेची म्हणजेच रेल्वेची अत्यंत गरज होती. यातूनच त्यांनी मुंबई ते ठाणेदरम्यान भारतातलीच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वे सुरू करण्याचे निश्चित केले. दि. १६ एप्रिल १८५३ रोजी दुपारच्या सुमारास बोरीबंदर (आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-‘सीएसएमटी’) ते तना (ढरपपरह - तेव्हा इंग्रज ठाण्याचा उल्लेख ‘तना’ असा करत) यादरम्यान पहिली प्रवासी रेल्वे धावली. १४ डब्यांच्या या ऐतिहासिक रेल्वेने ठाण्याच्या नशिबाचे सोने केले.
रेल्वे सुरू होण्यापूर्वी ठाणे शहराची अवस्था एखाद्या ‘बेटासारखी’ (खीश्ररपव) होती. ठाण्याच्या तीन बाजूंना खाडी व समुद्र होता आणि एका बाजूला पारसिकचे डोंगर होते. परंतु, १८५३च्या या ‘रेल्वेक्रांती’मुळे ठाणे थेट मुंबईशी आणि पर्यायाने जगाशी जोडले गेले. रेल्वे १८५३ मध्ये ठाण्यापर्यंत आली आणि पुढच्याच वर्षी म्हणजेच, १८५४ मध्ये तिचा विस्तार कल्याणपर्यंत करण्यात आला. त्यानंतर ब्रिटिशांनी कर्जत-कसारा मार्गे बोरघाट आणि थळघाट फोडून रेल्वेचा मार्ग पुणे आणि नाशिकपर्यंत नेला. या संपूर्ण रेल्वे-विस्ताराचा केंद्रबिंदू ‘ठाणे’ असल्यामुळे शहरावर याचा प्रचंड मोठा सकारात्मक आर्थिक परिणाम झाला. ठाण्याचा इतिहास हा केवळ काही वर्षांचा नसून, तो घटनांनी आणि लोकसहभागाने समृद्ध आहे. १९३० ते १९४७ या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ठाणे हे आंदोलनांचे एक मोठे केंद्र होते. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या ‘मिठाच्या सत्याग्रहा’चे प्रमुख केंद्र घणसोली येथे होते. या सत्याग्रहासाठी विलेपार्ले येथील छावणीत अहिंसक आंदोलनाचे प्रशिक्षण घेऊन सत्याग्रही घणसोलीला जायचे. या चळवळीने शहरात स्वदेशी, स्वराज्य आणि राष्ट्रीय शिक्षणाची नवचेतना निर्माण केली. याच प्रेरणेतून देशभक्त हरिभाऊ घाणेकर आणि नानासाहेब दामले यांनी ‘समर्थ सेवक मंडळ’ ही संस्था व व्यायामशाळा सुरू केली. ठाण्यात परदेशी कापडाच्या होळ्या झाल्या आणि सशस्त्र क्रांतीत मारुती ठाणेकर यांनी ठाणे कोर्टात बॉम्बस्फोट करण्याचा व पारसिकचा बोगदा उडवण्याचा प्रयत्न केला. उपनगराध्यक्ष नानासाहेब दामले यांनी पालिकेवर ‘तिरंगा’ फडकवला, तर १४ वर्षांच्या कुमुद नासणे हिने मैत्रिणींसह कलेटर ऑफिसवर ‘युनियन जॅक’ काढून ‘तिरंगा’ फडकवण्याचे धाडस केले. दत्ताजी तामणे, पांडू नाखवा, यशवंतराव ठाणेकर, वसुधाबाई कोतवाल आणि गंगाबाई मुळे यांनी हा स्वातंत्र्याचा अग्निकुंड धगधगता ठेवला.
स्वातंत्र्याप्रमाणेच ‘संयुक्त महाराष्ट्र’ आंदोलनातही ठाणेकरांचा पुढाकार मोठा होता. १९५८च्या सुमारास ठाणे पालिकेच्या सर्व नगरसेवकांनी पक्षभेद विसरून राजीनामे दिले. दिल्लीला गेलेल्या मोर्चात एक माता आपल्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन सामील झाली होती. ठाण्याच्या तुरुंगात सावरकर, वासुदेव बळवंत फडके यांच्यासह आंदोलनातील एस. एम. जोशी, डांगे, आचार्य अत्रे यांनाही स्थानबद्ध करण्यात आले होते.
ठाण्याच्या हवेत साहित्याचाही सुवास दरवळतो. १८९३ मध्ये वि. ल. भावे यांनी स्थापन केलेल्या ‘मराठी ग्रंथसंग्रहालया’मुळे शहराला साहित्यिक केंद्र लाभले आणि १९६०चे पहिले ‘संयुक्त महाराष्ट्र साहित्य संमेलन’ येथेच पार पडले. या भूमीने जनकवी पी. सावळाराम, कवी अशोक बागवे, गीतकार प्रवीण दवणे यांच्यासारखे लेखक-कवी दिले.
हाच ८०० वर्षांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’ची संकल्पना राबवली जात आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयापासून सुरू होणार्या ‘वॉक’द्वारे कोपिनेश्वर मंदिर, पारशी अग्यारी, सेंट जॉन चर्च, टाऊन हॉल आणि कोर्ट अशा ऐतिहासिक वास्तूंची आम्ही ओळख करुन देतो. यामुळे शहराविषयी आपुलकी निर्माण होऊन वारसास्थळांचे जतन करण्याची भावना वाढीस लागते. सध्या ‘आर्किटेट असोसिएशन’ आणि महापालिकेच्या मदतीने या स्थळांवर माहिती देणारे ‘बारकोड’युक्त ‘हेरिटेज बोर्ड’ लावण्याचा प्रकल्प सुरू आहे. भविष्यात रस्ते रुंदीकरणात जुनी मंदिरे व स्थापत्य जपण्यासाठी प्रशासनावर दबाव आणणे आणि ठाण्यात सापडलेल्या १२व्या शतकातील ब्रह्मदेवाच्या मूर्तीसारख्या प्राचीन शिल्पांच्या जतनासाठी स्वतंत्र ‘वस्तू संग्रहालय’ (म्युझियम) उभारणे, ही आज ठाण्याची खरी गरज आहे.
- मकरंद जोशी