मानवाने आकाशाकडे पाहताच, एक स्वप्न सतत त्याच्या मनात घोळत राहिले. आपल्यासारखी ‘दुसरी पृथ्वी’ कुठेतरी अस्तित्वात असेल का? विश्वाच्या अथांग विस्तारात ‘पृथ्वी’ ही एकमेव जीवनधारण करणारी जागा आहे की अशा असंख्य पृथ्वीसदृश्य जागांचा पसारा तार्यांभोवती पसरलेला आहे? हा प्रश्न आधुनिक खगोलशास्त्राच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या काही दशकांत विज्ञानाने इतकी झपाट्याने प्रगती केली की आता हा प्रश्न केवळ कल्पनाविलास राहिलेला नाही. उलट, ‘दुसरी पृथ्वी’ शोधण्याची शर्यत ही जगातील सर्वांत मोठ्या वैज्ञानिक मोहिमांपैकी एक झाली आहे.
एकेकाळी आपल्या सौरमालेबाहेरील ग्रहांच्या अस्तित्वाबाबतच खात्री नव्हती. पण १९९०च्या दशकात पहिल्या बाह्यग्रहाचा शोध लागल्यानंतर खगोलशास्त्रात नवे पर्व सुरू झाले. आजपर्यंत पाच हजारांहून अधिक बाह्यग्रहांचा शोध लागला आहे. यांपैकी अनेक ग्रह आकाराने पृथ्वीसारखे आहेत, तर काही ग्रह त्यांच्या तार्याभोवती अशा अंतरावर फिरतात की तेथे द्रवरूप पाणी अस्तित्वात राहू शकते. हेच ग्रह पृथ्वीसदृश्य मानले जातात.
या शोधामागील मुख्य कल्पना म्हणजे निवासयोग्य क्षेत्र. तार्याभोवतीचा असा पट्टा, जिथे तापमान ना फार जास्त ना फार कमी असते आणि ग्रहाच्या पृष्ठभागावर द्रवरूप पाणी टिकू शकते, त्यालाच निवासयोग्य क्षेत्र म्हणतात. पृथ्वी आपल्या सूर्याच्या अशाच एका आदर्श पट्ट्यात स्थित आहे. जर पृथ्वी सूर्याजवळ असती तर महासागरांची वाफ झाली असती. जर पृथ्वी अधिक दूर असती तर संपूर्ण ग्रहच गोठून गेला असता. त्यामुळे ‘जीवनासाठी योग्य अंतर’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो.
मात्र केवळ योग्य अंतरच पुरेसे नसते. ग्रहाचे वस्तुमान, वातावरण, चुंबकीय क्षेत्र, फिरण्याचा वेग आणि त्या तार्याचे स्वरूप हे सर्व घटकही जीवनाच्या शक्यतेवर परिणाम करतात. उदाहरणार्थ, मंगळ हा ग्रह काही प्रमाणात निवासयोग्य क्षेत्रात असूनही वातावरण विरळ असल्यामुळे तेथे द्रवरूप पाणी टिकत नाही. दुसरीकडे शुक्र हा आकाराने पृथ्वीसारखाच असला, तरी तीव्र हरितगृह परिणामामुळे तेथील तापमान सुमारे ४६० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. त्यामुळे ‘दुसरी पृथ्वी’ शोधणे म्हणजे फक्त पृथ्वीएवढा ग्रह शोधणे नव्हे, तर पृथ्वीसारखी संतुलित परिस्थिती शोधणे होय.
या शोधामध्ये ‘केप्लर अंतराळ दुर्बिणी’ने क्रांतिकारक भूमिका बजावली आहे. या दुर्बिणीने हजारो तार्यांवर सतत लक्ष ठेवून त्यांच्या प्रकाशात झालेली सूक्ष्म घटही मोजली आहे. ग्रह तार्यासमोरून जाताना तार्याचा प्रकाश किंचित कमी होतो. यावरून ग्रहाचे अस्तित्व ओळखले जाते. याच पद्धतीमुळे असंख्य नवीन ग्रह सापडले. त्यानंतर ‘ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट’ मोहिमेने पृथ्वीच्या तुलनेने जवळच्या तार्यांभोवती फिरणार्या ग्रहांचा शोध सुरू केला.
आज या शर्यतीत सर्वाधिक आशा निर्माण केली आहे ‘जेम्स वेब अंतराळ दुर्बिणी’ने. ही दुर्बिण ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करू शकते. ग्रहाच्या वातावरणातून तार्याचा प्रकाश जाताना काही विशिष्ट तरंगलांबी शोषल्या जातात. त्यावरून वातावरणात कोणते वायू आहेत याचा अंदाज लावता येतो. उदाहरणार्थ ऑक्सिजन, मिथेन किंवा पाण्याची वाफ यांसारखे वायू जीवनाच्या शक्यतेचे संकेत मानले जातात.
अलीकडच्या काळात ‘ट्रॅपिस्ट-१’ प्रणाली या तार्याभोवती फिरणार्या ग्रहांनी विशेष लक्ष वेधले आहे. या प्रणालीमध्ये पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रह आहेत आणि त्यांपैकी काही निवासयोग्य क्षेत्रात आहेत. हे ग्रह पृथ्वीपासून सुमारे ४० प्रकाशवर्षे दूर आहेत. वैज्ञानिकांच्या मते या ग्रहांवर महासागर किंवा वातावरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे ‘प्रॉक्सिमा सेंटॉरी बी’ ग्रह आपल्या सर्वांत जवळच्या तार्याभोवती फिरत असून तोही निवासयोग्य क्षेत्रात असण्याची शक्यता आहे.
मात्र ‘दुसरी पृथ्वी’ शोधणे हे काम अत्यंत कठीण आहे. ग्रह स्वतः प्रकाश उत्सर्जित करत नाहीत, त्यामुळे तार्याच्या प्रखर प्रकाशात ते जवळजवळ अदृश्य होतात. पृथ्वीचा विचार केला तर दूरवरून पाहताना सूर्याच्या तुलनेत पृथ्वीचा प्रकाश अब्जपट कमी असेल. त्यामुळे पृथ्वीसारखा ग्रह शोधण्यासाठी अत्यंत संवेदनशील उपकरणांची आवश्यकता असते.
‘दुसरी पृथ्वी’ शोधण्यामध्ये आणखी एक मोठे आव्हान म्हणजे ग्रहांच्या वातावरणातील बदल समजून घेणे. पृथ्वीवरील जीवन अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांतीतून निर्माण झाले. या काळात पृथ्वीचे वातावरणही सतत बदलत गेले. सुरुवातीला पृथ्वीवर आजसारखा ऑक्सिजन नव्हता; वातावरण मुख्यतः मिथेन, कार्बन डायऑक्साइड आणि इतर वायूंनी भरलेले होते. सूक्ष्मजीवांच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमुळे हळूहळू ऑक्सिजन वाढीस लागला आणि त्यातूनच जटिल जीवनाचा विकास झाला.
त्यामुळे वैज्ञानिक आता एखाद्या ग्रहावर सध्याच्या पृथ्वीसारखे वातावरण शोधण्यापेक्षा जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे संकेत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ग्रहांवर मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड एकत्र आढळल्यास तेथे जैविक प्रक्रिया सुरू असण्याची शक्यता तपासली जाते. काही संशोधक असेही मानतात की परग्रहावरील जीवन पृथ्वीवरील जीवनापेक्षा पूर्णतः वेगळे असू शकते. त्यामुळे ‘जीवन’ या संकल्पनेची व्याख्याच भविष्यात बदलू शकते.
यामुळे आधुनिक दुर्बिणी ग्रहांच्या वातावरणातील सूक्ष्म रासायनिक असंतुलन, ढगांचे स्वरूप आणि उष्णतेचे वितरण यांचाही अभ्यास करत आहेत. भविष्यात यातूनच एखाद्या ग्रहावर जैविक हालचालींचे अप्रत्यक्ष संकेत मिळू शकतात. याशिवाय, पृथ्वीसारखा ग्रह सापडला तरी तेथे जीवन आहे की नाही हे सिद्ध करणे अवघडच आहे.
‘दुसरी पृथ्वी’ शोधण्याच्या या शर्यतीमागे केवळ वैज्ञानिक कुतूहल नाही, तर मानवजातीच्या भविष्याचाही प्रश्न दडलेला आहे. पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या, हवामानबदल, संसाधनांची कमतरता आणि पर्यावरणीय संकटे पाहता भविष्यात मानवाला दुसऱ्या ग्रहांवर वसाहती उभारण्याची गरज भासू शकते.
सध्याच्या रॉकेट तंत्रज्ञानाने जवळच्या तार्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हजारो वर्षे लागू शकतात. त्यामुळे प्रकाशाच्या वेगाच्या जवळ जाणाऱ्या नवीन ‘प्रणोदन’ तंत्रांचा अभ्यास सुरू आहे. काही संकल्पनांमध्ये लेझर किरणांच्या साहाय्याने सूक्ष्म अंतराळयानांना प्रचंड वेग देण्याचा विचार मांडला गेला आहे. अशा यानांना भविष्यात जवळच्या बाह्यग्रहांपर्यंत पाठवणे शक्य होऊ शकते.
याशिवाय, मानव प्रत्यक्ष तेथे पोहोचण्यापूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित याने त्या ग्रहांचे वातावरण, तापमान आणि भूभाग यांचा अभ्यास करू शकतील. यामुळे भविष्यात ‘अंतराळ वसाहतीं’ची संकल्पना अधिकच वास्तववादी होत आहे.
सोबतच अनेक नैतिक प्रश्नही निर्माण होतात. जर एखाद्या ग्रहावर सूक्ष्म जीवन अस्तित्वात असेल, तर मानवाने तेथे हस्तक्षेप करावा का? पृथ्वीबाहेरील परिसंस्था नष्ट होणार नाहीत याची जबाबदारी कोणाची? त्यामुळे ही शर्यत केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाची नसून मानवाच्या अस्तित्वाचा पुनर्विचार करणारी प्रक्रिया आहे.
वास्तव अजूनही खूप दूर आहे. आपल्या सर्वांत जवळचा संभाव्य पृथ्वीसदृश्य ग्रहदेखील अनेक प्रकाशवर्षे दूर आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाने तेथे पोहोचण्यासाठी हजारो वर्षे लागू शकतात. त्यामुळे ‘दुसरी पृथ्वी’ सापडली तरी तिथे प्रत्यक्ष जाणे ही वेगळीच समस्या आहे.
पण विज्ञानाचा इतिहास पाहता अशक्य वाटणाऱ्या गोष्टी भविष्यात शक्य झालेल्या आहेत. यातूनच पृथ्वी किती दुर्मीळ आणि मौल्यवान आहे याची जाणीव होते.
‘दुसरी पृथ्वी’ शोधण्याची शर्यत ही केवळ अवकाश संशोधनाची स्पर्धा नाही; ती मानवाच्या अस्तित्वाशी, कुतूहलाशी आणि भविष्याशी जोडलेली एक महान वैज्ञानिक मोहीम आहे. कदाचित पुढील काही दशकांत आपण एखाद्या ग्रहावर जीवनाचे स्पष्ट संकेत शोधू. कदाचित एक दिवस मानव दुसऱ्या तार्याच्या ग्रहावर पाऊल ठेवेल.
- सुजाता बाबर