“ पाकिस्तानची बाजू घेणे हा संजय राऊतांचा उद्योग” – नवनाथ बन

    31-May-2026
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटले की,“ऑपरेशन सिंदूर-२ च्या चर्चांना सुरुवात होताच राऊत अस्वस्थ झाले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर कारवाई करून देशाच्या माता-भगिनींच्या कुंकवाचा बदला घेतला, मात्र त्या कारवाईवरही संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा बचाव करणे आणि पाकिस्तानचे गुणगान करणे,बाजू घेणे हा त्यांचा कायमचा उद्योग झाला आहे.”
 
रविवार दि.३१ रोजी घेतलेल्या पत्रकार परीषदेत संजय राऊत यांच्या टीकेस उत्तर देताना नवनाथ बन (Navnath Ban) बोलत होते.
 
राऊत यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्याबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेवर टीका करताना नवनाथ बन म्हणाले की,“पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या काळात शेकडो भाजप, संघ आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, अनेकांची हत्या झाली. हिंदूंवर अत्याचार झाले, मात्र त्यावेळी संजय राऊत यांनी कधीही आवाज उठवला नाही.आज मात्र राऊत अभिषेक बॅनर्जींसाठी सहानुभूती व्यक्त करत आहेत. अशा घटनांचे समर्थन भाजप करत नसला तरी दादागिरीविरोधात जनतेने दिलेला संदेश महत्त्वाचा आहे.”
 
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की, “जर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना राजकीय श्रद्धांजली वाहिली जात असेल, तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेनेच राजकीय श्रद्धांजली वाहिली आहे. जनतेने त्यांच्या पक्षाची राजकीय कबर खोदण्याचे काम केले. प्राजक्त तनपुरे हे जनतेतून निवडून येणारे नेते आहेत तर राऊत हे मागच्या दाराने सत्तेत आलेले आहेत.”
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे सांगताना बन म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे सामान्य नागरिकांप्रमाणे विमानसेवा आणि रेल्वेचा वापर करतात, तर अमृता फडणवीस यांनी सायकलने प्रवास करून संदेश दिला.राऊत यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची तयारी दाखवावी.”
 
“रोहित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत अचानक दाखवलेले प्रेम म्हणजे निव्वळ राजकीय ढोंग आहे.महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना एक साधा प्रश्न विचारत आहेत तुमचे आजोबा शरद पवार तब्बल १० वर्षे देशाचे कृषिमंत्री होते, त्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती वेळा हमीभाव मिळाला?शरद पवार कृषिमंत्री असताना कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांना रस्त्यावर कांदा फेकावा लागला, अनेक ठिकाणी १ ते २ रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली. आज कांद्याच्या प्रश्नावर सरकारनं उपाययोजना केल्या १५ रुपये भाव दिला तुमच्या सारखी नौटंकी केली नाही.” (Navnath Ban)