१२ वर्षांचे एक तप झाले. इथून पुढे १२ वर्षांची दुसरी तपश्चर्या सुरू झालेली आहे. ही तपश्चर्या जातिभेदमुक्त आणि अस्पृश्यतामुक्त समाज उभी करण्याची आहे. तलवारीच्या धारेमुळे ज्यांना परधर्मात जावे लागले, त्या आपल्या बंधू-भगिनींना पुन्हा आपल्या स्वधर्मात आणण्याची ही तपश्चर्या करावी लागेल.
भारतात लोकशाही मार्गाने २०१४ साली सत्ताबदल झाला. हा सत्ताबदल एकप्रकारची ‘वैचारिक क्रांती’ होती. न्यूयॉर्कमधून प्रकाशित होणार्या ‘गार्डियन’ वृत्तपत्राने त्यावर संपादकीय लिहिले. त्याचा भावानुवाद असा आहे, "१८ मे २०१४ हा आजचा दिवस इतिहासात या प्रकारे नोंदविला जाईल की, ब्रिटिशांची भारतातील सत्ता अंतिमत: संपली. निवडणुकीतील नरेंद्र मोदी यांचा विजय हा एका दीर्घ राजवटीचा शेवट आहे. या राजवटीत ब्रिटिशांनी घालून दिलेली सत्तेची रचना फारशी बदलली नाही.” आश्चर्य याचे वाटते की, मूलगामी झालेल्या बदलाचा अचूक वेध भारतापासून हजारो मैल दूर असलेला एक संपादक घेतो आणि आमच्याकडचे ‘माफीवीर संपादक’ सत्ताबदल झाल्याबद्दल ऊर बडविण्याचे लेखन करतात. ही बौद्धिक दिवाळखोरी लवकरात लवकर संपावी, अशी आपण अपेक्षा करूया!
२०१४ साली झालेल्या सत्ताबदलाचे परिणाम किती खोलवरचे आहेत, याचा जर गंभीरपणे अभ्यास करायचा असेल; तर बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या सत्तापरिवर्तनाचा अभ्यास करायला हवा. बंगालमध्ये हिंदू राजकीयदृष्ट्या संघटित होऊन सत्तापरिवर्तन करण्यासाठी ‘मतदानकर्ता’ झाला. हिंदू जमातींविषयी असे म्हटले जाते की, हिंदू संघटित होणे अशय आहे. तो सदैव जाती-पंथात विभागलेला राहील. बंगालच्या हिंदू जनतेने हे खोटे ठरविले. बंगालच्या हिंदू जनतेला ‘हिंदू’ म्हणून मतदान करण्याची प्रेरणा का निर्माण झाली? या प्रेरणेला कारणं आहेत, नरेंद्र मोदी, अमित शाह, त्यांचे सहकारी आणि हिंदुत्वाची सनातन विचारधारा!
२०१४च्या सत्तापरिवर्तनाला १२ वर्षे पूर्ण झाली. म्हणजे एक तप पूर्ण झाले. ‘१२ वर्षांची तपश्चर्या’ असा आपला वाय-प्रयोग असतो. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांनी १२ वर्षांची तपश्चर्या ‘राष्ट्रधर्म’ जागविण्यासाठी केली आणि बंगालमध्ये त्याला फळ आले. ही १२ वर्षांची तपश्चर्या दुष्टशक्तींनी किंवा असुरीशक्तींनी जो धर्म दाबून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्या धर्माच्या पुनरुत्थानाची तपश्चर्या आहे. आपला प्राचीन सनातन विचार धर्माच्या संदर्भात काही मूलभूत सिद्धांत सांगतो. त्यातील पहिला सिद्धांत- ‘जिथे धर्म, तिथे जय.’ दुसरा सिद्धांत- ‘धर्म म्हणजे सत्य आणि न्याय.’ तिसरा सिद्धांत- ‘धर्म पोथी-पुराणात बंद करून चालत नाही. जीवनात सत्य आणि न्यायाने वागावे लागते.’ चौथा सिद्धांत- ‘धर्म म्हणजे सर्व प्रकारची भौतिक प्रगती. प्रत्येकाच्या गरजा पूर्ण होतील, अशा समाजरचना. संपत्तीचे न्यायोचित वाटप’ आणि पाचवा सिद्धांत हे सांगतो की, ‘केवळ भौतिकतेत अडकून न पडता चराचर सृष्टीच्या मांगल्याची इच्छा करणे, तसे वागणे, ज्ञानदेवांच्या शब्दांत ‘जो जे वांछील तो ते लाहो’ या भावनेत जगणे.’
धर्माची भौतिक अभिव्यक्ती नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाने अनेक योजना करून केली. उदा.
१) आयुष्यमान भारत योजना, २) जीवनज्योती आणि सुरक्षा विमा योजना, ३) उज्ज्वला योजना,
४) लखपतीदीदी योजना ५) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ६) पंतप्रधान जन-धन योजना ७) पंतप्रधान आवास योजना ८) पीएम सूर्यघर - मोफत वीज योजना ९) पीएम विश्वकर्मा योजना १०) पीएम मुद्रा योजना इत्यादी.
भारत हा केवळ भौतिक सुखात सुख मानणारा देश नाही. भौतिक सुखाच्याही पलीकडे जाऊन सर्वत्र चैतन्याची अनुभूती करण्याची ओढ भारतीय मनाला असते. असे आदर्शव्रत जीवन जगणारे थोर पुरुष त्याच्या देवघरात जातात. प्रभू रामचंद्र त्यातील एक. रामाच्या जन्मस्थानावर आक्रमक लुटारू बाबराने मशीद बांधली. ‘जन्मभूमीमुक्ती’चा लढा साडेचारशे वर्षे चालला आणि नरेंद्र मोदींच्या काळात तो यशस्वी होऊन आज ‘श्रीराम जन्मभूमी’ स्थानावर जगातील एक भव्य मंदिर उभे आहे. करोडो हिंदू दर्शनासाठी तिथे जातात. आध्यात्मिक ऊर्जा घेऊन आपापल्या घरी परततात. पूर्वीच्या राजवटीने ही आध्यात्मिक ऊर्जा दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. असे सांगतात की, ज्या बोधीवृक्षाखाली भगवान बुद्धांना ‘संबोधी’ प्राप्त झाली, तो वृक्ष कापून त्याच्या मुळावर शिसे ओतण्यात आले. त्या शिशाला भेदून वृक्षाला पालवी फुटली. भारताचा धर्म असा आहे. स्वार्थासाठी किंवा विकृत विचारांच्या आहारी जाऊन त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर तो नष्ट करणार्यांचेच थडगे बांधतो. ‘श्रीराम जन्मभूमी’वरील राममंदिर याची साक्ष आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ वर्षांची अथक तपश्चर्या चालू आहे. त्याला क्षणाची विश्रांती नाही. तपश्चर्येत विश्रांती घेता येत नाही. विश्रांतीचा विचारही मनात येणे असंभव असते. ही राष्ट्रसाधना आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला लाभलेले नरेंद्र मोदी हे एकमेव असे पंतप्रधान आहेत, जे मंदिरात जातात. अत्यंत श्रद्धेने देवतेची पूजा करतात. साधुसंतांना नमस्कार करतात. नवरात्रीचा उपवास करतात. पण, कशाचेही अवडंबर करीत नाहीत. सगळा व्यवहार सहजपणे केलेला असतो. या लेखात अन्य पंतप्रधानांची नावे घेण्याची गरज नाही. परंतु, नरेंद्र मोदी यांच्या पूर्वी झालेला कोणता पंतप्रधान अयोध्येत गेला, सोमनाथला गेला, मथुरेला गेला, केदरनाथला गेला, हे सगळे पंतप्रधान नाताळ सणात कुठे असतात? ईदला कुठे असतात? वाचकांना याची उत्तरे माहीत आहेत.
उत्तरपारा येथील भाषणात योगी अरविंद म्हणाले, "सनातन धर्म आणि राष्ट्रवाद या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. धर्माच्या उत्थानात राष्ट्राचे उत्थान असते आणि राष्ट्राच्या उत्थानात धर्माची थोरवी असते. २०१४ साली झालेले परिवर्तन हे सत्तापरिवर्तन जरूर आहे आणि सत्तापरिवर्तन झाल्यामुळे विकासाची रोखून धरलेली गंगा वेगाने वाहायला लागली, हेदेखील खरे आहे. परंतु, हे परिवर्तन तेवढ्यापुरते सीमित नाही. या परिवर्तनाचा भारतातील राजकीय सृष्टीला एक शाश्वत संदेश आहे. तो संदेश असा की, भारताच्या सनातन आत्मवृत्तीला दाबून इथून पुढे कोणालाही राजकीय यश मिळणार नाही. मुसलमानांच्या मतांसाठी ‘माझ्या हृदयात काबा आणि डोळ्यात मदिना’ असली गीते तुम्हाला कबरीत घेऊन जातील. हिंदू समाजाच्या राजकीय-जागृतीचा हा कालखंड आहे. ही राजकीय-जागृती दिवसेंदिवस वाढवत न्यावी लागेल. सत्तास्थानी बसलेल्यांचे याबाबतीतील कर्तव्य फार मोठे आहे. त्याचबरोबर सामान्य कार्यकर्त्यांचे कर्तव्यही तेवढेच मोठे आहे.
१२ वर्षांचे एक तप झाले. इथून पुढे १२ वर्षांची दुसरी तपश्चर्या सुरू झालेली आहे. ही तपश्चर्या जातिभेदमुक्त आणि अस्पृश्यतामुक्त समाज उभी करण्याची आहे. तलवारीच्या धारेमुळे ज्यांना परधर्मात जावे लागले, त्या आपल्या बंधू-भगिनींना पुन्हा आपल्या स्वधर्मात आणण्याची ही तपश्चर्या करावी लागेल. तपश्चर्या अवघड कामासाठीच करायची असते. सामान्य लाभासाठी कोणी तपश्चर्या करीत नाही. आपल्या सनातन परंपरेतील मनुष्यधन जे परकीय धर्मात गेलेले आहे, त्यांना पुन्हा स्वधर्मात आणण्याची तपश्चर्या सर्वांना करावी लागेल. ही तपश्चर्या राज्यसत्ता, राष्ट्रीय विचारांच्या लोकांच्या हातीच राहील, यासाठीदेखील अत्यावश्यक आहे. आमचा इतिहास आम्हाला कंठरवाने सांगतो की, राजकीयदृष्ट्या तुम्ही दुर्बळ झालात, तर अनंत संकटे तुमच्यावर येऊन आदळतील. तुमचे जगणे असह्य होईल. म्हणून सत्तेचा किल्ला मजबूत ठेवून संघटित शक्तीच्या विराटरूपाचे दर्शन वेळोवेळी प्रकट करून वाट चुकलेल्या आपल्या सर्व बांधवांना आपण आपल्या घरात परत आणू शकतो.
साधनेचा प्रवास कधी संपत नसतो. साधनेच्या प्रवासातील अंतिम लक्ष्य ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’ हे आहे. त्यादिशेने १२ वर्षांचा एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. आता पुढच्या वाटचालीसाठी सिद्ध होऊन राहायचे आहे आणि या महावायावर ठाम विश्वास ठेवून वाटचाल करायची आहे की, ‘जिथे धर्म आहे, तिथे विजयच विजय आहे.’
रमेश पतंगे