‘इक्यू-70’ श्रेणीचे स्टील पाईपचे उत्पादन करणारा भारत पहिला देश; ‘एक्सेलोरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया’ कंपनीचे यश
31-May-2026
Total Views |
नवी दिल्ली : (India Steel Industry) ‘एक्सेलोरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया’ या भारतीय कंपनीने ‘इक्यू-70’ या श्रेणीचे वेल्डेड पाईप तयार केले असून, हे यश साध्य करणारी ती जगातील एकमेव स्टील उत्पादक कंपनी ठरली आहे. या यशासाठी ‘एक्सेलोरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया’ कंपनीला ‘अमेरिकन ब्युरो ऑफ शिपिंग’ या संस्थेकडून प्रमाणपत्रही देण्यात आले. ही संस्था जागतिक स्तरावर निर्माण होणार्या अभियांत्रिकी उत्पदनांना स्वतंत्रपणे प्रमाणित करते.
गेल्या दशकभरामध्ये भारतात नवोन्मेषाला गती मिळाली असून, त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम उत्पादन क्षेत्रावर दिसून येत आहे. अलीकडच्या काही वर्षांत देशातील उत्पादन क्षेत्राने कात टाकली असून, विविध प्रकारातील उत्पादनांची निर्मिती देशातच होऊ लागली आहे. अलीकडेच ‘एक्सेलोरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया’ या गुजरातमधील स्टील उत्पादक कंपनीने, ‘इक्यु-70’ या श्रेणीचे वेल्डेड पाईप तयार केले आहेत. असे करणारी ती जगातील पहिलीच कंपनी ठरली असून, याचे सकारात्मक परिणाम देशातील विविध क्षेत्रांवर दिसून येणार आहेत.
‘ईक्यू-70’ ग्रेड वेल्डेड पाईप हे उच्च क्षमता, टिकाऊपणा आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ओळखले जातात. तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक, पाणीपुरवठा योजना, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, पेट्रोकेमिकल उद्योग तसेच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अधिक दाब आणि कोणत्याही हवामानामध्येही हे पाईप टिकाऊ असल्याने, लांब अंतरावरील द्रव किंवा वायू वाहतुकीसाठी तसेच औद्योगिक वापरासाठी हे पाईप विश्वासार्ह पर्याय मानले जातात. त्यांच्या मजबुतीमुळे देखभालीचा खर्चही तुलनेने कमीच असतो.
आतापर्यंत, अशा महत्त्वाच्या उपयोगांसाठी आयात केलेल्या सीमलेस पाईपवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता स्वदेशी बनावटीचे ‘इक्यु-70’ पाईप तेल आणि वायू उद्योग, पवन ऊर्जा प्रकल्प आणि खोल समुद्रातील पाईपलाईनसाठी एक उत्तम पर्याय ठरण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित उद्योगांचे परदेशी पुरवठा साखळीवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच, वितरण व्यवस्था आणि उत्पादन खर्चातही सुधारणा होणार आहे.
‘ईक्यू-70’ श्रेणीचे हे पाईप अमेरिकेच्या पेट्रोलियम इन्स्टिट्यूटच्या 5एल*100क्यु मानकाप्रमाणेच आहे. या पाईपमधील स्टील उच्च दर्जाचे असून, त्याची किमान यिल्ड स्ट्रेंथ 690 मेगापास्कल्स आहे. देशातील सागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांसाठी लागणार्या विशेष पोलाद उत्पादनांमध्ये, भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांमधील एक पुढचे पाऊल म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे.
‘ईक्यू-70’ ग्रेड वेल्डेड पाईप म्हणजे काय?
‘ईक्यू-70’ ग्रेड वेल्डेड पाईप हे उच्च दर्जाच्या पोलादापासून तयार करण्यात येणारे विशेष प्रकारचे पाईप आहेत. ते अति-उच्च-शक्तीच्या स्टील प्लेट्स वापरून तयार केले जातात, ज्यांना सिलिंडरचा आकार देऊन प्रगत ‘सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून एकत्र जोडले जाते. ‘ईक्यू-70’ हे नाव या पाईपच्या उच्च क्षमतेचा ताण सहन करण्याचे प्रतीक आहे. हे पाईप जास्त दाब, तापमानातील बदल आणि कठीण औद्योगिक परिस्थिती सहन करण्यास सक्षम असतात. (India Steel Industry)