_202605311420251532_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
रा. स्व. संघ परिवार आणि महिला या विषयात दोन टोकाची मते समाजात दिसून येतात. संघविरोधकांचे असे मत असते की, रा. स्व. संघ ही फक्त पुरुषांची संघटना आहे आणि त्यामुळे ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संघाचे काम अपूर्ण तर आहेच. शिवाय, समाजातील महिलांच्या स्थानाबद्दल आणि महिलांच्या प्रश्नाबद्दल संघ स्वाभाविकपणे अनभिज्ञ आहे. दुसर्या बाजूने संघ परिवारात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्याला मग तो पुरुष कार्यकर्ता असो किंवा ती महिला कार्यकर्ती असो, ‘राष्ट्र सेविका समिति’, संघ परिवारातील विविध संघटना, प्रकल्प यांत अक्षरश: हजारो ठिकाणी कार्यरत असलेल्या लक्षावधी महिला कार्यकर्त्या त्यांच्या डोळ्यासमोर येतील. अशी दोन टोकाची चित्रे समोर येण्यामागे काही कारणे आहेत. एकतर ‘संघाचे विरोधक’ नावाची जी काही मंडळी आहेत, त्यांची संघाबद्दल असणारी मते ही प्रत्यक्ष अनुभवापेक्षाही ऐकलेल्या-वाचलेल्या दुय्यम स्रोतांमधून आलेली असतात. संघ-हिंदू-भाजप समर्थकांची मते जरी त्यांच्या-त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आलेली असली, तरी त्यांच्या आकलनात अनेकदा पूर्णत्वाचा अभाव असतो. संघ, संघ परिवार आणि महिला सहभाग याचा धावता; पण वास्तव आढावा ज्यांना घ्यावासा वाटत असेल, त्यांच्यासाठी गीता गुंडे यांनी लिहिलेले ‘चालविशी हाती...’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.
तसे बघितले तर ‘महिला’ हा विषय संघाच्या दृष्टीने कधीच दुर्लक्षित नव्हता. संघस्थापनेनंतर दहा-अकरा वर्षांतच ‘राष्ट्र सेविका समिति’चे काम सुरू झाले. ते जरी संघाच्या योजनेद्वारे सुरू झाले नसले, तरी विचारविनिमयापासून ते संघटनउभारणीमध्ये सहकार्य देण्यापर्यंत संघाची भूमिका सकारात्मकच राहिली. तरीही, या सुरुवातीच्या काळात संघ आणि समिति यांचे काम समांतरपणे, एकाच लक्ष्यासाठी; पण वेगवेगळे सुरू राहिले. साधारण स्वातंत्र्यानंतर लगेचच संघपरिवारातील ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’, ‘भारतीय जनसंघ’, ‘भारतीय मजदूर संघ’, ‘वनवासी कल्याण आश्रम’ अशा जनसंघटना स्थापन झाल्या. तत्त्वत: त्यांच्या कामांत पुरुष व महिला अशा दोघांच्याही सहभागाची कल्पना होती. पण, स्थापनेच्या नंतरच्या १०-१५ वर्षांनंतरच महिला सहभागाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. याच स्थित्यंतराच्या काळापासून म्हणजे, १९६०च्या दशकाच्या मध्यावर गीता गुंडे यांचा ‘अभाविप’शी एक युवा कार्यकर्ती म्हणून संबंध आला. गीताताई तेव्हापासून आजवर, म्हणजे गेली ६० वर्षे संघ आणि संघविचार-परिवारात काम करत आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी लिहिलेले आत्मकथन केवळ एका महिला कार्यकर्तीचे आत्मकथन न राहता, संघातील महिला सहभागाच्या इतिहासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे झाले आहे.
संघस्थापनेला जेव्हा ५० वर्षे झाली, तेव्हा म्हणजे १९७५ साली देशावर कुप्रसिद्ध आणीबाणी लादली गेली होती. संघाचा ‘सुवर्णमहोत्सवी’ वाढदिवस तुरुंगातच साजरा झाला. त्यावेळी आणीबाणीविरोधात देशभर सत्याग्रह झाले. त्यात संघ आणि संघपरिवाराचा सहभाग मोठा होता. सत्याग्रही महिलांच्या संख्येत बहुतांश सहभाग संघपरिवारातील महिलांचा होता. साधारण १९६०च्या दशकात देशभर संघपरिवारात झालेल्या महिला सहभागाची ही जणू पोचपावतीच होती. त्या सगळ्या काळाविषयी गीताताईंनी केलेल्या नोंदी मुळातून वाचण्यासारख्या आहेत. तो भाग वाचताना असे लक्षात येते की, आणीबाणीच्या काळात लोकशाहीवादी संघटना, आणीबाणीला विरोध करणारे राजकीय पक्ष यांच्यातर्फे आलेल्या एकत्रित संख्येपेक्षा संघ परिवारातून आलेल्या महिला सत्याग्रहींची संख्या अधिक होती. याची नोंद तटस्थ निरीक्षकांनी घेतली असती, तर ‘संघात महिला का नाहीत?’ अशासारखे खुळचट प्रश्न संघ टीकाकारांना पडले नसते. गीताताई सत्याग्रहाच्या आयोजनात होत्या, भूमिगत चालणार्या कामात सहभागी होत्या आणि त्यांनी प्रत्यक्ष सत्याग्रहात सहभाग घेऊन कारावासही भोगला होता.
संघस्थापनेपासून आणीबाणीपर्यंतच्या ५० वर्षांत संघ आणि संघविचारांच्या संस्था यांना समाजात स्वीकारार्हता मिळत गेली आणि आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनाच्या कालखंडामुळे त्या स्वीकारार्हतेमध्ये प्रचंड वाढ संघपरिवाराने अनुभवली. संघ परिवारातील महिलांच्या सहभागातदेखील ‘क्वांटम जंप’ म्हणू शकू इतकी वाढ झाली. १९६०च्या दशकात ‘अभाविप’च्या निमित्ताने संघपरिवारात सक्रिय काम करणार्या गीताताई यांचीही सक्रियता आणीबाणीनंतरच्या म्हणजे, मागील ५० वर्षांत भरपूर वाढली. त्यातील मागील ४०-४२ वर्षे तर त्या पूर्णवेळ काम करत आहेत. १९८४ मध्ये गीताताईंनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून ‘अभाविप’च्या कामाला सुरुवात केली. तिथपासून ते २००९ अशी तब्बल २५ वर्षे त्यांनी ‘अभाविप’चे पूर्णवेळ काम केले. त्यादरम्यानच १९९३ पासून त्यांच्याकडे रा. स्व. संघाच्या विचार-परिवारातील महिलाकार्याच्या समन्वयाचे कामदेखील आले. २००९ पासून आजपर्यंत त्यांच्याकडे पूर्णपणे महिला समन्वयाचे काम आहे. हा सगळा प्रवास अत्यंत सहजपणे, साधेपणाने आणि पारदर्शी पद्धतीने गीताताईंनी शब्दबद्ध केला आहे.
वरील वर्णनात वारंवार ज्या ‘महिला समन्वय’ या शब्दाचा उल्लेख आला आहे, ते काम आहे तरी काय? असा प्रश्न संघाशी संबंध असणार्या वा नसणार्या अशा दोघांनाही पडण्याची शयता आहे. ते कुतूहल शमवण्याचे कामही हे आत्मकथन करते. संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघ व संघविचारांच्या संस्थांच्या बद्दल, संघाचे स्वयंसेवक असलेल्या अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी या पंतप्रधानांबद्दल विपुल लिहिले गेले, लिहिले जात आहे. संघाच्या कार्यपद्धतीबद्दल, शाखा, उत्सव, प्रशिक्षण वगैरे विषयांवरदेखील विविध माध्यमांतून लिहिले जात आहे. पण, ‘महिला समन्वय’ या महत्त्वाच्या रचनेबद्दल अत्यल्प लेखन झालेले दिसते. गीताताईंच्या या पुस्तकाच्या निमित्ताने तो भागही शताब्दी वर्षात लोकांच्या समोर येतो आहे, ही चांगली गोष्ट आहे. ‘महिला समन्वय’ नावाची कुठलीही संस्था नाही. रा. स्व. संघ परिवारात अनेक संस्थांत महिलांचा सक्रिय सहभाग असतो. स्थानिक स्तरापासून ते अखिल भारतीय स्तरापर्यंत असतो. त्यात ‘राष्ट्र सेविका समिति’सारखी महिलांची मोठी संघटना आहे. ‘अभाविप’, ‘विश्व हिंदू परिषद’, ‘भारतीय मजदूर संघ’, ‘वनवासी कल्याण आश्रम’ अशांसारख्या विशाल संघटना आहेत. ‘विद्या भारती’सारख्या देशव्यापी शिक्षणसंस्था आहेत, अनेक लहान-मोठी सेवाकार्ये आहेत आणि स्थानिक, जिल्हा व प्रांत स्तरावर काम करणार्या शेकडो संघटना आहेत. या प्रत्येक संघटनेत महिलांचा भरपूर सहभाग आहे. त्या-त्या संस्था-संघटनांत महिलांचे काम बघणारी काही रचना असतेच. पण, तरीही विविध संघटनांत कार्यरत असणार्या महिलांमध्ये काही विषयांच्या बाबत समान धारणा निर्माण करण्याची, समान समज विकसित होण्याची गरज असते. ते काम एका अनौपचारिक रचनेतून होत असते. गीताताई गुंडे या महिला समन्वयाच्या कामाच्या महत्त्वाच्या प्रवर्तक आहेत आणि सुमारे तीन दशके योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी हे काम घडवले आहे, स्थिर केले आहे. हा प्रवासदेखील त्यांनी अत्यंत तटस्थपणे, आपण याचे ‘पायोनियर’ आहोत, असा कुठलाही आवेश न आणता, प्रवाहीपणे शब्दबद्ध केला आहे.
आज आपल्या स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करणार्या संघाकडे आणि संघविचार-परिवारातील संस्थांकडे समाज आशेने आणि सकारात्मक पद्धतीने बघत आहे. आज देश पातळीवर आणि अनेक राज्यांत संघाचे स्वयंसेवक राजकीय पदे सांभाळत आहेत. विकास-पर्यावरण समतोल, सामाजिक समरसता, विविध धर्म-पंथात सलोखा, भारतीय समाजाचा जो मुख्य आधार आहे ती कुटुंब व्यवस्था, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि संरक्षण सिद्धता, २०४७ पर्यंत भारताला विकसित देश म्हणून बघण्याचे स्वप्न, त्यासाठी कृषी-उद्योग-सेवा अशा सर्व आघाड्यांवर उद्योजकतेची वाढती गरज, एक विकसित देश म्हणून सर्वसामान्य नागरिकांत आवश्यक असलेले नागरिक कर्तव्यांचे भान अशा विविध विषयांत आगामी काळात भरपूर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हे काम संघ वा संघपरिवार एकट्याने करणे अशय आहे, तसे कल्पनेतही नाही. अराजकीय लोकसहभागाची मोठी भूमिका आगामी काळात अपेक्षित आहे. ज्यामध्ये ५० टक्के संख्येने असणार्या महिलावर्गाचा सहभागही आवश्यक आणि अनिवार्य आहे. अशा मोयाच्या कालखंडात महिला सहभागासाठी आयुष्याचा प्रदीर्घ काळ निरपेक्षपणे आणि व्रतस्थपणे व्यतित करणार्या जीवनव्रतीचे हे आत्मकथन प्रकाशित होणे अत्यंत समयोचित आहे, असेच म्हटले पाहिजे.
- शरदमणी मराठे
पुस्तकाचे नाव : चालविशी हाती...
लेखिका : गीता गुंडे
संपादन : सुधीर जोगळेकर
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
पृष्ठसंख्या : १३५
मूल्य : रुपये १५०/-