डॉ. बशीर बद्र म्हणजे उर्दू साहित्यातील एक अग्रणी नाव. त्यांनी आपल्या साहित्यनिर्मितीतून मानवी भावभावना, सामाजिक विषय आणि आयुष्यातील अपरिहार्यता लोकांसमोर मांडली. त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याचा ऐवज जवळजवळ १८ हजार ओळींचा आहे. इतके विपुल लिखाण मागे ठेवून नुकताच त्यांनी आपला देह ठेवला. ‘पद्मश्री’ आणि ‘साहित्य अकादमी’ यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या या सारस्वताच्या साहित्याचा वेध घेणारा हा लेख...
बडे लोगों से मिलने में, हमेशा फांसला रखना
जहाँ दर्या समंदर से मिला, दर्या नहीं रहता
बारावीचे दिवस. संभाजीनगरात असताना वापरात साधे आणि लहान हॅण्डसेट्स असायचे. ‘अॅण्ड्रॉईड’ नावाची भानगड हाताशी आलेली नव्हती आणि त्यामुळेच रेडिओचा अपार आधार वाटत असे. ग्रीष्माच्या एका दुपारी कोणत्याशा रेडिओ स्टेशनवरती, जगजीतसिंग यांच्या एकाहून एक सरस गझल सुरू होत्या. बशीर बद्र पहिल्यांदा भेटले ते इथे! वर नमूद केलेल्या ओळी त्यावेळेपासून आजतागायत डोयात गळ टाकल्यासारख्या रुतलेल्या आहेत. अर्थात, या लेखनातले तत्त्वज्ञान आणि त्याची सहजता सशक्त आहे म्हणूनच!
डॉ. बशीर बद्र यांचा जन्म १९३५ सालातला. असे म्हणतात की, अगदी बालवयात त्यांनी पहिला ‘कलाम’ लिहिला. परंतु, त्यांच्या वडिलांना हा सगळा प्रकार मान्य नव्हता. वडिलांचे देहावसान झाल्यानंतरच्या काळात त्यांनी ‘अलिगढ मुस्लीम विद्यापीठा’तून ‘उर्दू’ भाषाविषयात ‘एमए’ केले आणि येत्या काही वर्षांत ‘आजादी के बाद की गजल का तनकीदी मुताला’ या विषयावर ‘पीएचडी’ पूर्ण केली. बशीर साहेबांचे लिखाण उत्तरोत्तर इतके बहरत गेले की, त्याला सीमांचे बंधन उरले नाही. जगभरातून त्यांना अमाप प्रेम मिळत गेले. बशीर बद्र हे प्रेमाच्या प्रेमात पडलेले शायर होते आणि म्हणूनच कदाचित, त्यांच्या सर्वाधिक शायरी आणि गझल या मानवाचे परस्पर संबंध, मानवी वर्तणूक आणि भावनांची गुंतवळ यांबाबत भाष्य करणार्या आहेत. ही सगळी सांगड खालील ओळींत दिसून येते. ते म्हणतात,
लोग टूट जाते हैं एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में
हर धडकते पत्थर को, लोग दिल समझते हैं
उम्रे बीत जातीं हैं, दिल को दिल बनाने में|
माणसाच्या प्रवृत्ती आणि सामाजिक अवस्थांवर, अडचणींवर भाष्य करण्याची त्यांची हातोटी ही ‘काबिल-ए-तारीफ’ होती. बद्र यांचे उर्दू, पर्शियन, हिंदी आणि इंग्रजी भाषांतरावर प्रभुत्व होते. ते उर्दू भाषा आणि त्यातील साहित्याचे गाढे अभ्यासकही होते. परंतु, लिष्ट शब्द आणि बोजड लेखनाची कास त्यांनी धरली नाही. सोप्या, सुटसुटीत लेखनाच्या माध्यमातून ते सामान्य जनांपर्यंत पोहोचले. या लेखनाचे अधिष्ठान प्रतिभेच्या पायावर उभे होते. त्यांचे म्हणून जे एक तत्त्वज्ञान होते, अभिव्यक्ती होती- त्यावर होते! मराठीत जे स्थान स्व. मंगेश पाडगावकर यांचे, तेच स्थान उर्दू साहित्यात बशीर बद्र यांचे आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये. सहज-सोप्या भाषेत लोकांना आपल्या काव्यकवेत घेणारी ही दोन मोठी माणसे आपल्याकडे होऊन गेली!
काळानुरूप बशीर बद्र यांच्या लिखाणातले वैविध्य मोठ्या प्रमाणात विस्तारत गेले. त्यातही ‘स्नेहल भावनांची वीण’ हा बहुतांश वेळा त्यांच्या कवितांचा गाभा राहिला. विशेष म्हणजे, त्यांचे ‘शेर’ प्रेमभावनेतील शारीर परिघाच्या पल्याडचे जग दाखवतात.
कभी तो आसमां से चांद उतरे जाम हो जाये
तुम्हारे नाम की एक खूबसूरत शाम हो जाये
उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो
न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाये|
अशा प्रकारचा ‘सॉफ्ट रोमान्स’ त्यांनी फार कल्पकतेने मांडला आणि त्याची कैक उदाहरणे आपल्याला वाचायला मिळू शकतात. डॉ. बद्र यांच्या लेखनातली वास्तव स्वीकारण्याची भाषादेखील तितकीच महत्त्वाची. मानवी संबंधांची सत्यता, गुंतागुंत आणि त्यातली नाजूक मर्मस्थाने काही गझलांचा केंद्रबिंदू आहेत. ते म्हणतात,
सर झुकाओगे तो पत्थर, देवता हो जायेगा
इतना मत चाहो उसे, वो बेवफा हो जायेगा
कितनी सच्चाई से, मुझसे जिंदगी ने कह दिया
तू नहीं मेरा तो कोई, दूसरा हो जायेगा
हम भी दरिया हैं, हमे अपना हुनर मालूम हैं
जिस तरफ भी चल पडेंगे, रास्ता हो जायेगा|
ते मनाची समजूत घालतात, ‘मूव्ह ऑन’ म्हणतात आणि माणसाला स्वतःचं भव्यपण बघायला प्रवृत्त करतात. यातला अखेरचा ‘शेर’ आपल्याला हेच सुचवू पाहतो. त्यांनी आपल्या लिखाणातून प्रेमाची पखरण केली, तशीच सामाजिक विषयांवरती भाष्येही केली. ते एक जिंदादिल शायर असल्याने, मानवी मनाची संवेदना त्यांच्यात ओतप्रोत भरलेली आहे व अनेकवेळा त्यांच्या लिखाणातून, सादरीकरणातून ते दिसून आले. माणूस आपल्याच नशेत जगतो, तेव्हा तो फक्त संवेदना हरवून बसलेला हाडामांसाचा एक गोळा असतो. झुंडीच्या नशेत वावरणारा मानव ही सभ्य समाजासमोरची मोठी अडचण असते. अशा बेभान माणसाला ते गझलेच्या माध्यमातून सांगतात,
बाहर न आओ, घर में रहो, तुम नशे में हो
सो जाओ, दिन को रात करो, तुम नशे में हो
मासूम तितलियों को मसलने का शौक हैं
तौबा करो, खुदा से डरो, तुम नशे में हो|
डॉ. बशीर बद्र यांचे लिखाण हे झर्याच्या खळखळाटाप्रमाणे साधे आणि सोपे जरूर आहे. पण, त्याचे अर्थ हे महासागराचे तळ स्पर्शून आलेले आहेत. बद्र यांच्या पत्नी डॉ. राहत बद्र यादेखील उर्दूच्या अभ्यासिका आणि नितांत सुंदर शायरा. त्यांनी बशीर साहेबांबद्दल लिहिलेली एकच ओळ त्यांच्या आयुष्याचे वर्णन करण्यासाठी पुरेशी आहे, ‘अल्लाह ने मेरे शौहर के सच इतने खूबसूरत बनाए हैं की, लोगों को वोह झूठ लगते हैं!’ डॉ. बशीर बद्र आज शरीराने आपल्यात नाहीत. परंतु, त्यांचे प्रतिभासंपन्न साहित्य आपल्या आयुष्यात असेल, हे निश्चित!
- सौरभ सद्योजात