भारतीय सांस्कृतिक अस्मिता, ऐतिहासिक स्मृती आणि सभ्यतात्मक सातत्य यांविषयीची समान चिंता, ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यामध्ये प्रकर्षाने दिसून येते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर प्रथम जयंती वर्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्तर प्रथम वर्षाचे औचित्य साधून, भारतीय इतिहास, समाजजीवन, संस्कृती आणि राष्ट्रचेतना यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणार्या या महान व्यक्तिमत्त्व व संस्थेच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म इ.स. १७२५ मध्ये अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) जिल्ह्यातील चौंडी येथे झाला. होळकर घराण्यात विवाहानंतर त्यांना मराठा साम्राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय परंपरेचा जवळून परिचय झाला. पती खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर त्यांनी अत्यंत धैर्याने राज्यकारभार स्वीकारला. १८व्या शतकातील अस्थिर राजकीय परिस्थितीत त्यांनी मालव्याचे प्रशासन केवळ यशस्वीपणे सांभाळले नाही; तर लोककल्याण, न्यायव्यवस्था आणि सांस्कृतिक पुनरुत्थान यांचा आदर्श समन्वय साधला. त्यांची कारकीर्द भारतीय इतिहासात सुशासन आणि धर्माधिष्ठित लोककल्याण यांचे प्रभावी उदाहरण म्हणून ओळखली जाते.
अहिल्यादेवींच्या कार्याचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू म्हणजे, त्यांनी केलेले मंदिर पुनर्निर्माण आणि तीर्थक्षेत्रांचे संवर्धन होय. मध्ययुगीन काळात भारतातील अनेक हिंदू मंदिरे परकीय आक्रमणांमध्ये उद्ध्वस्त झाली होती. सोमनाथ, काशी विश्वनाथ, मथुरा, उज्जैन आणि इतर अनेक धार्मिक केंद्रांवर झालेली आक्रमणे ही केवळ स्थापत्य-नाशापुरती मर्यादित नव्हती; ती भारतीय समाजाच्या सांस्कृतिक आत्मविश्वासावर झालेला आघात होती. अशा परिस्थितीत अहिल्यादेवींनी मंदिर पुनर्निर्माणाद्वारे भारतीय सांस्कृतिक सातत्याचे पुनर्स्थापन करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, त्यांनी सोमनाथ, गया विष्णुपाद मंदिर, रामेश्वरम्, द्वारका, बद्रीनाथ, हरिद्वार आणि उज्जैन येथे घाट, विहिरी, धर्मशाळा आणि यात्रेकरूंकरिता सुविधा उभारल्या.
अहिल्यादेवींच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी विध्वंसाला पुनर्निर्माणाने उत्तर दिले. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या धार्मिक द्वेषाला प्रोत्साहन दिले नाही. उलट, त्यांनी सांस्कृतिक पुनरुज्जीवनाद्वारे समाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे कार्य ‘सांस्कृतिक प्रतिकार’ या संकल्पनेच्या संदर्भात विशेष महत्त्वाचे ठरते. ‘सांस्कृतिक प्रतिकार’ म्हणजे केवळ संघर्ष नव्हे; तर आपल्या परंपरा, स्मृती आणि अस्मिता यांचे पुनर्स्थापन करण्याची प्रक्रिया होय. अहिल्यादेवींनी मंदिरांचे पुनर्निर्माण करून भारतीय समाजामध्ये हरवलेली सांस्कृतिक चेतना पुन्हा जागृत केली. याच संदर्भात २०व्या शतकात उदयास आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विचार करता येतो. इ.स. १९२५ मध्ये डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. ब्रिटिश वसाहतवाद, सामाजिक विघटन आणि भारतीय समाजामध्ये निर्माण झालेला सांस्कृतिक न्यूनगंड या पार्श्वभूमीवर संघाची स्थापना झाली. संघाच्या मते, भारताची राष्ट्रीय ओळख ही त्याच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये आणि सभ्यतात्मक सातत्यामध्ये निहित आहे. त्यामुळे भारतीय समाजामध्ये सांस्कृतिक अभिमान, संघटन आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करणे, हे संघाच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. संघाने सुरुवातीपासूनच शाखा व्यवस्थेद्वारे व्यक्तिनिर्माण आणि समाजसंघटनावर भर दिला. शाखेमध्ये शारीरिक शिक्षण, बौद्धिक चर्चा, शिस्त आणि राष्ट्रीय विचार यांचे प्रशिक्षण दिले जात होते. पुढे संघाशी संबंधित विविध संस्थांनी शिक्षण, ग्रामविकास, सेवा प्रकल्प, वनवासी कल्याण, सामाजिक समरसता आणि धार्मिक-सांस्कृतिक जनजागृती यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्य विस्तारले. विशेषतः भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय अस्मिता यांविषयी अभिमान निर्माण करण्यावर संघाने सातत्याने भर दिला.
अहिल्यादेवी होळकर आणि संघ यांच्या कार्यामध्ये काही महत्त्वपूर्ण साम्यस्थळे आढळतात. सर्वप्रथम, दोघांच्याही कार्यामध्ये ‘भारतीय सांस्कृतिक अस्मितेचे संरक्षण’ ही मध्यवर्ती प्रेरणा दिसते. अहिल्यादेवींनी मंदिर पुनर्निर्माणाद्वारे भारतीय सांस्कृतिक स्मृतीचे पुनर्स्थापन केले, तर संघाने सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि सामाजिक संघटनाद्वारे भारतीय सभ्यतात्मक ओळख दृढ करण्याचा प्रयत्न केला. दोघांच्याही कार्यामध्ये भारतीय संस्कृतीचे सातत्य ही मूलभूत संकल्पना दिसून येते. दुसरे म्हणजे, दोघांच्याही कार्यामध्ये समाजाच्या आत्मविश्वासाच्या पुनर्बांधणीचा प्रयत्न दिसतो. मध्ययुगीन आक्रमणांमुळे निर्माण झालेल्या सांस्कृतिक असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवींनी मंदिरांचे पुनरुज्जीवन केले. त्याचप्रमाणे ब्रिटिश वसाहतवादामुळे निर्माण झालेल्या मानसिक गुलामगिरीच्या पार्श्वभूमीवर संघाने भारतीय समाजामध्ये सांस्कृतिक अभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रक्रियांमध्ये भारतीय समाजाच्या मानसिक पुनर्जागरणाचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो. तिसरे म्हणजे, दोघांच्याही कार्यामध्ये अखिल भारतीय दृष्टिकोन आढळतो. अहिल्यादेवींनी उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील तीर्थक्षेत्रांचे संवर्धन केले. यामुळे भारतीय सांस्कृतिक एकात्मतेला बळकटी मिळाली. त्याचप्रमाणे संघाने भाषिक, प्रादेशिक आणि जातीय भेदांपलीकडे जाऊन ‘एकात्म भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. शाखा व्यवस्था आणि विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून संघाने देशव्यापी सामाजिक जाळे निर्माण केले. चौथे म्हणजे, दोघांच्याही कार्यामध्ये ‘लोकसंघटन’ हा महत्त्वाचा पैलू दिसून येतो. अहिल्यादेवींनी मंदिरांसोबत घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे आणि यात्रेकरूंकरिता सुविधा उभारून समाजजीवन अधिक संघटित केले. तीर्थक्षेत्रे ही केवळ धार्मिक केंद्रे नसून, सामाजिक देवाणघेवाणीची केंद्रे बनली. त्याचप्रमाणे संघाने शाखा, सेवा प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांद्वारे समाजामध्ये संघटन आणि परस्पर सहकार्याची भावना निर्माण केली.
तथापि, अहिल्यादेवी आणि संघ यांच्यातील साम्यस्थळांचा विचार करताना त्यांच्या कार्यातील मूलभूत भिन्नतांचाही तितयाच गांभीर्याने विचार करणे आवश्यक ठरते. इतिहासलेखनाच्या दृष्टीने कोणत्याही दोन घटकांची तुलना करताना त्यांच्या कालखंडाचा, सामाजिक-राजकीय परिस्थितीचा, उपलब्ध साधनसामग्रीचा आणि कार्यपद्धतीचा विचार करणे अपरिहार्य असते. या निकषांवर विचार केला असता, अहिल्यादेवी आणि संघ हे भारतीय सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दोन वेगवेगळ्या ऐतिहासिक टप्प्यांचे प्रतिनिधित्व करणारे घटक असल्याचे दिसून येते.आजही काशी, गया, सोमनाथ, उज्जैन, हरिद्वार, द्वारका किंवा रामेश्वरम् येथे त्यांच्या कार्याच्या खुणा प्रत्यक्ष स्वरूपात पाहायला मिळतात. या अर्थाने, अहिल्यादेवींचे सांस्कृतिक योगदान स्थापत्य, वास्तू आणि सार्वजनिक सुविधांच्या रूपाने मूर्त स्वरूपात प्रकट झालेले दिसते. परंतु, येथे एक बाब अत्यंत ठळकपणे नमूद करावी लागेल आणि ती म्हणजे, जरी अहिल्यादेवी एका अत्यंत समृद्ध राज्याच्या सत्ताधारी होत्या. तरीही, त्यांनी मंदिरांचे पुनर्निर्माण, घाटांची उभारणी, धर्मशाळांची निर्मिती, अन्नछत्रांची स्थापना किंवा यात्रेकरूंसाठी सुविधा निर्माण करणे यांसारख्या उपक्रमांसाठी राज्याच्या संसाधनांचा उपयोग केला नाही, तर त्यासाठी त्यांनी स्वतःच्या खासगी संपत्तीचा वापर केला आणि एक राज्यकर्ता कसा असावा, याचे अत्यंत आदर्श उदाहरण घालून दिले.
याउलट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २०व्या शतकात ब्रिटिश वसाहतवादी सत्तेच्या काळात झाली. संघाकडे कोणतीही राजकीय सत्ता, प्रशासकीय अधिकार किंवा शासकीय साधनसंपत्ती उपलब्ध नव्हती. त्यामुळे संघाने समाजपरिवर्तनासाठी पूर्णपणे भिन्न मार्ग स्वीकारला. संघाच्या कार्याचा केंद्रबिंदू राज्यसंस्था नसून, समाज हा होता. व्यक्तिनिर्माण, स्वयंसेवकांचे संघटन, राष्ट्रीय विचारांची जडणघडण आणि सांस्कृतिक आत्मभान जागृत करणे, या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे संघाचे कार्य मुख्यतः वैचारिक, सामाजिक आणि मानसशास्त्रीय स्वरूपाचे मानले जाते.
अहिल्यादेवींच्या कार्यामध्ये सांस्कृतिक वारशाचे भौतिक संरक्षण हा एक महत्त्वपूर्ण घटक होता. मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि तीर्थक्षेत्रांचे पुनरुज्जीवन करून त्यांनी भारतीय संस्कृतीची दृश्यमान प्रतीके जतन केली. भारतीय समाजाच्या सांस्कृतिक स्मृतींचे केंद्र असलेल्या धार्मिक स्थळांचे पुनर्निर्माण म्हणजे एका अर्थाने, इतिहासाचे पुनर्लेखन नव्हे; तर इतिहासातील सातत्याचे पुनर्स्थापन होय. त्यामुळे त्यांचे कार्य सांस्कृतिक वारसासंवर्धनाच्या आधुनिक संकल्पनेचे प्रारंभीचे उदाहरण मानता येते. या दोघांच्या कार्यातील आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे, त्यांच्या कार्यक्षेत्राच्या स्वरूपामध्ये आढळतो. अहिल्यादेवींच्या कार्याचा केंद्रबिंदू मुख्यतः तीर्थसंस्कृती, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा हा होता. त्यांनी भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना परस्पर जोडणार्या सांस्कृतिक जाळ्याला नवसंजीवनी दिली. रा. स्व. संघाच्या कार्यामध्ये सांस्कृतिक पुनर्जागरणासोबतच भावी राष्ट्रनिर्मितीचा विचार अधिक प्रकर्षाने दिसून येतो. संघाने सांस्कृतिक स्मृतींच्या संरक्षणाबरोबरच संघटित, आत्मविश्वासपूर्ण आणि राष्ट्रनिष्ठ समाजाची निर्मिती करण्यावर भर दिला.
इतिहासलेखनाच्या दृष्टिकोनातून पाहता, या दोन्ही प्रवाहांविषयी विविध मतप्रवाह आढळतात. काही इतिहासकारांच्या मते, अहिल्यादेवींचे कार्य हे हिंदू सांस्कृतिक पुनर्जागरणाचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. त्याचप्रमाणे संघाच्या समर्थकांच्या मते, संघाने भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाला वैचारिक अधिष्ठान दिले. दुसरीकडे, काही अभ्यासक या दोन्ही प्रक्रियांकडे ‘सांस्कृतिक राजकारण’ म्हणून पाहतात. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करताना भावनिक गौरवगान किंवा राजकीय पूर्वग्रह टाळून विश्लेषणात्मक आणि संशोधनाधारित दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक ठरते. अहिल्यादेवींच्या कार्यामध्ये धर्म आणि लोककल्याण यांचा सुंदर समन्वय दिसतो. त्यांनी मंदिरांसोबत घाट, विहिरी, धर्मशाळा आणि यात्रेकरूंकरिता निवासव्यवस्था निर्माण केली. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. तीर्थक्षेत्रे सामाजिक आणि आर्थिक देवाणघेवाणीची केंद्रे बनली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामविकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये सेवा प्रकल्प राबवून समाजामध्ये कार्यकर्तृत्वाची भावना निर्माण केली.
अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये भारतीय सांस्कृतिक अस्मितेचे संरक्षण, सभ्यतात्मक सातत्याचे जतन आणि समाजाच्या आत्मविश्वासाची पुनर्बांधणी यांसारख्या बाबींमध्ये निश्चितच काही समान धागे आढळून येतात. मात्र, त्यांच्या कार्याची साधने, कार्यपद्धती, संस्थात्मक स्वरूप, ऐतिहासिक संदर्भ आणि उद्दिष्टांच्या अभिव्यक्तीची माध्यमे यांमध्ये भिन्नता दिसून येते. त्यामुळे या दोघांची तुलना समानतेच्या आधारावर नव्हे, तर भारतीय सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दोन परस्परपूरक आणि भिन्न ऐतिहासिक अभिव्यक्ती म्हणून करणे अधिक उचित ठरेल. या दृष्टिकोनातून पाहिल्यास, अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय संस्कृतीच्या संरक्षण आणि पुनरुत्थानाच्या अखंड प्रवासातील दोन महत्त्वपूर्ण मैलाचे दगड म्हणून अभ्यासता येतात.
शेवटी असेही म्हणता येईल की, अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दोन वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारे घटक आहेत. त्यांची साधने, कार्यपद्धती आणि कालखंड भिन्न असले; तरी भारतीय सांस्कृतिक अस्मिता, राष्ट्रीय आत्मविश्वास आणि सभ्यतात्मक सातत्य यांविषयीची समान चिंता त्यांच्या कार्यामध्ये स्पष्टपणे दिसते. अहिल्यादेवींनी मंदिर पुनर्निर्माणाद्वारे भारतीय सांस्कृतिक स्मृतीचे पुनरुज्जीवन केले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामाजिक संघटन आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाद्वारे भारतीय समाजामध्ये सांस्कृतिक चेतना दृढ करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच, भारतीय सांस्कृतिक इतिहासाच्या व्यापक संदर्भात या दोन्ही प्रवाहांचा तुलनात्मक अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभ्यासनीय ठरतो.
प्रा. शिवाजी सरगर