आमदार प्रमोद जठार यांची महापौर रितू तावडे यांना भेट; महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि पर्यटनासंदर्भातील चार महत्त्वाच्या मागण्या

    30-May-2026
Total Views |
Ritu Tawde
 
मुंबई : (Ritu Tawde) आमदार प्रमोद जठार यांनी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेत विविध नागरी, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पर्यटनाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी चार प्रमुख मागण्यांचे निवेदन महापौरांना सादर केले. भेटीनंतर बृहन्मुंबई भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधत या मागण्यांची माहिती दिली.
 
प्रमोद जठार यांनी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत पर्यटकांसाठी आणि विशेषतः लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मिनी टॉय ट्रेन सुरू करण्याची मागणी केली. या उपक्रमामुळे पर्यटकांना संपूर्ण उद्यान सहज पाहता येईल, मुलांसाठी आकर्षण निर्माण होईल तसेच मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
 
तसेच कोकणातील महिला बचत गट आणि महिला संस्थांनी तयार केलेल्या मसाले, काजू, आंबा, फणस प्रक्रिया उत्पादने, कोकम, हस्तकला आणि इतर पारंपरिक वस्तूंच्या विक्रीसाठी महानगरपालिकेच्या बाजारपेठांमध्ये कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. यामुळे महिलांना आर्थिक बळ मिळेल आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले.
 
 
याशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये “महापौर रुग्ण सहाय्यता निधी कक्ष” सुरू करण्याची मागणी करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी तातडीची मदत मिळावी यासाठी प्रथम प्रायोगिक तत्त्वावर केईएम रुग्णालय येथे ही योजना सुरू करून नंतर इतर रुग्णालयांत विस्तार करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
 
केईएम रुग्णालय परिसर “हेल्थ कॉरिडॉर” म्हणून विकसित करण्याचाही प्रस्ताव त्यांनी महापौरांसमोर मांडला. या अंतर्गत रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्गिका, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अल्पदरातील धर्मशाळा तसेच परिसराचा नियोजित विकास करण्याची मागणी करण्यात आली. त्यांनी केईएम, वाडिया, टाटा आणि महात्मा गांधी कामगार रुग्णालय परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष उपाययोजनांची आवश्यकता असल्याचेही सांगितले. (Ritu Tawde)