मुंबई : (Prajakt Tanpure BJP) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शनिवारी, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील शरद पवार गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम विभाग प्रमुख गोविंद येतयेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, "राहुरी मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्या विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालूक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. वर्षानुवर्षे समाजातील अनेक घटकांसोबत त्यांनी काम केले आहे. ज्या विश्वासाने तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. भाजपा संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील."
पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार - प्राजक्त तनपुरे
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील वीज, शेती आणि पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक होईल. पक्ष भविष्यात जी काही जबाबदारी सोपवेल ती उत्तमप्रकारे पार पाडेन," अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची चर्चा
प्राजक्त तनपुरे हे २०१९ मध्ये राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. प्राजक्त तनपुरे हे जेष्ठ नेते आ. जयंत पाटील यांचे भाचे आहेत. दरम्यान, दिवंगत भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीत प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणूकीत तनपुरे यांना भाजपतर्फे अहिल्यानगरमधून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.(Prajakt Tanpure BJP)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....