“नीटमुळे विद्यार्थ्यांचे नाही, तर संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले” – नवनाथ बन
30-May-2026
Total Views |
मुंबई : (NEET Paper Leak) भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी नीट परीक्षा प्रकरणावरून संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला. विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा दावा करणाऱ्या राऊतांना उत्तर देताना बन म्हणाले की, "विद्यार्थ्यांचे नाही तर संजय राऊत यांचेच मानसिक संतुलन ढासळले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील अड्ड्यांवर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक करण्याचे काम केले असून आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जात आहे.
मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री जबाबदारी झटकत नसून दोषींना शिक्षा व्हावी यासाठी ठोस पावले उचलत आहेत. मात्र संजय राऊत निराशा आणि वैफल्याच्या गर्तेत गेल्यामुळे वास्तवापासून दूर गेले आहेत."अशी टीका बन यांनी शुक्रवार दि.२९ रोजी केली.
संजय राऊत यांनी इतर पक्षांच्या भवितव्याबाबत सातत्याने केलेल्या वक्तव्यांवर नवनाथ बन यांनी टीका केली. "महाराष्ट्रातील जनतेने उबाठा गटाचे राजकीय वास्तव दाखवून दिले असून इतर पक्ष संपतील किंवा भाजपात विलीन होतील अशा भविष्यवाण्या राऊत यांनी थांबवाव्यात. राहुल गांधींकडून सुपारी घेऊन उबाठा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची राऊत यांची तयारी सुरू आहे का ?
सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालविण्यास सक्षम आहेत आणि एकनाथ शिंदे शिवसेना चालविण्यास समर्थ आहेत. त्यामुळे इतर पक्षांची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वाची चिंता राऊत यांनी करावी." असा टोला बन यांनी लगावला.
विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भातील संजय राऊत यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
"महाराष्ट्रातील जनतेने महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला भोपळा दिला असून त्यांची राजकीय ताकद संपुष्टात आल्याचे जनतेने दाखवून दिले आहे. काँग्रेसची खुमखुमी जिरली आहे आणि उबाठा गटाचीही खुमखुमी संपली आहे.
आता पुढील पाच वर्षे निवडणुकीची तयारी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, हे स्वतः राऊतांनी मान्य केले आहे. मात्र इतर पक्ष संपतील अशा भविष्यवाण्या करत राहिल्यास उबाठा गटाचे अस्तित्व आणखी धोक्यात येईल आणि अखेरीस काँग्रेसमध्ये विलीन होण्याची वेळ येईल." असा दावा नवनाथ बन यांनी केला. (NEET Paper Leak)