नीट न जमणारी ‘नीट’ची परीक्षा : भय इथले संपत नाही...

    30-May-2026
Total Views |
NEET Exam Fear Persists
 
‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून, तपास यंत्रणांनीही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता ‘नीट’ची फेरपरीक्षा सुरक्षितपणे पार पडावी, म्हणून उच्चस्तरीय तयारीदेखील सुरु आहे. पण, या पेपरफुटीचा प्रचंड मनस्ताप विद्यार्थी आणि पालकांनाही सहन करावा लागला. त्यानिमित्ताने अशा पेपरफुटीच्या प्रकरणांचा विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिकतेवर होणार्‍या परिणामांचा ऊहापोह करणारा हा लेख...
 
गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही वैद्यकक्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा गाजली व गाजत आहे, ती त्यातील पेपरफुटीमुळे. यंदाच्या ‘नीट’च्या पेपरफुटीचे धागेदोरे विविध राज्यांमध्ये अगदी व्यावसायिक स्वरूपात व वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे व्यापारीकरण करणारे बनल्याचे उघडकीस आले. परिणामी, ‘नीट’च्या प्रवेश प्रक्रिया व त्यातील व्यवसायी ढिसाळपणाला देशपातळीवर विरोध झाला. पालकांपासून पुढार्‍यांपर्यंत ‘नीट’ पेपरफुटीला कडाडून विरोध झाल्यामुळे सरकारला ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा व नव्याने घेण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त व अपरिहार्य होते व झालेही तसेच.
 
पेपरफूट व त्यापोटी देशपातळीवरील ‘नीट’च्या फेरपरीक्षेमुळे यावर्षीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना चक्कर येणे व त्यांच्या पालकांना घाम फुटण्यासारखी स्थिती निर्माण होणे हे म्हणा तसे स्वाभाविकच होते. यामागची संबंधित विद्यार्थी-उमेदवारांची सद्यस्थितीतील मनस्थिती म्हणजे, त्यांनी काही वर्षांपासून आपल्या डॉक्टर होण्याच्या इच्छा आणि जिद्दीपोटी केलेले प्रयत्न आणि तयारीवर फेरपरीक्षेने पाणी फेरले. त्याचवेळी त्यांच्या पालकांनी फार मोठी रक्कम मोजून आपल्या मुलाला वा मुलीला डॉक्टर बनविण्याच्या स्वप्नापोटी विविध प्रमुख शहरांतील व विशेषत: राजस्थानच्या कोटा, जयपूर, सीकर यांसारख्या इंजिनिअरिंगसह वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाची मोठी व प्रमुख व्यापारी केंद्रे ठरलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च आज मातीमोल ठरला आहे. फेरपरीक्षेमुळे या विद्यार्थी-पालकांसमोर सध्या उरलेला एकमेव पर्याय म्हणजे, फेरपरीक्षेच्या फेरतयारीच्या दरम्यानच्या कालावधीत त्यांच्या आशा-आकांक्षांचा पालापाचोळा झालेला असून, संबंधित विद्यार्थी नैराश्य व वैतागासह परीक्षेच्या फेरतयारीला लागले असून, त्यांच्या पालकांना काळजीयुक्त परिस्थितीत व प्रसंगी निद्रानाशासह आपल्या मुलांच्या स्वप्नांचा झालेला नाशच जणू पाहावा लागत आहे. ‘नीट’ची प्रवेश परीक्षा नीट न झाल्याचीच, ही सध्यातरी त्यांच्या न संपणार्‍या भयाची परिणती ठरली आहे.
 
यासंदर्भातील संख्यात्मकदृष्ट्या सांगायचे म्हणजे, यावर्षी दि. ३ मे रोजी देशातील लाखो विद्यार्थ्यांनी वैद्यक क्षेत्रातील आपल्या करिअर-स्वप्नपूर्तीची सुरुवात म्हणून ‘नीट’ प्रवेश पात्रता देण्याती पूर्वतयारी केली होती. याची मोठी तयारी त्यांनी गेल्या एक-दोन वर्षांत केली होती व त्यासाठी त्यांच्या पालकांनी लाखांवर रक्कम खर्च केली होती, गुंतवली होती.
 
या परीक्षार्थी-विद्यार्थ्यांची या दरम्यानची पार्श्वभूमी, मानसिकता म्हणजे यापैकी अधिकांश जणांनी आपले घर आणि पालकांपासून अनेक महिने व वर्षे दूर राहून ‘नीट’ची मेहनत घेऊन प्रयत्नपूर्वक पूर्वतयारी केलेली. यासाठी बहुधा सर्वांनीच खर्चिक क्लासेस लावून विविध परीक्षा-चाचण्या दिल्या. त्यासाठी प्रसंगी रात्रंदिवसही अभ्यास केला.
 
अशा प्रकारे ‘नीट’ प्रवेश परीक्षेची तयारी व पूर्वाभ्यास केल्यानंतरच्या कालावधीत या विद्यार्थ्यांना हायसे वाटले. परगावी वा घरापासून दूर राहून विशेष अभ्यास करणार्‍यांनी परीक्षेच्या अपेक्षित तारखेच्या आधी मिळालेले काही दिवस घरी व आपले पालक-नातेवाईकांसह व मित्रांसह घालविण्यासाठी घरी पोहोचले, तर मोठ्या शहरातील ‘नीट’ची तयारी करणारे मोठ्या शहर वा महानगरातील विद्यार्थी ‘नीट’च्या पूर्वतयारीचा ताण कमी झाल्याने काहीसे खूश झाले.
 
मात्र, ‘नीट’ची तयारी पूर्ण करणार्‍या या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला, तो ‘नीट’ प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे, ‘नीट’ परीक्षाच रद्द करण्यात आल्याच्या बातमीने. यातूनच या विद्यार्थ्यांना गेले बरेच महिने वा काही वर्षे सर्व प्रकारे प्रयत्न करून केलेली तयारी व मोठे प्रयत्न अशा प्रकारे अचानक व अनपेक्षितरीत्या बेकार झाल्याचे मोठे शल्य होते, तर पालकांसाठी आपल्या मुला-मुलीला डॉक्टर बनविण्याच्या स्वप्नपूर्ततेसाठी फार मोठा खर्च करून व त्यांना प्रसंगी घरापासून दूर ठेवून, विशेष तयारी करण्यासाठी सर्व प्रकारे प्रोत्साहन देणार्‍या पालकांमध्ये हतबलता आली. ‘नीट’साठी वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांची तयारी करवून घेण्यासाठी मोठी राशी घेणार्‍या, बहुतांश मार्गदर्शन करणार्‍या संस्थाचालकांच्या चेहर्‍यावरची रया गेली; तर पोलीस-प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व संबंधित मंत्री व प्रशासकीय अधिकार्‍यांचा पुरतेपणी गोंधळ उडाला. पेपरफुटी व ‘नीट’ परीक्षाच रद्द होणे, या घटकांनी या विषयाशी संबंधित विविध घटकांमधील गोंधळ प्रदीर्घ काळ कायम राहिला. एवढेच नव्हे, तर ‘नीट’ची यावेळची पेपरफुटी केरळम्पासून उत्तराखंडपर्यंत विविध राज्यांमध्ये उघड झाल्याने या शैक्षणिक-प्रशासकीय गोंधळाला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले.
 
यावेळी ‘नीट’च्या झालेल्या पेपरफुटी व गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात नैराश्य पसरले आहे. पालक हतबल झाल्यामुळे यांपैकी बर्‍याच विद्यार्थ्यांना आलेल्या नैराश्यातून सावरण्यासाठी काही ठिकाणी तर मानसशास्त्र व मानसोपचारतज्ज्ञांची मदतसुद्धा घ्यावी लागली. एवढेच नव्हे, तर नैराश्यातील या विद्यार्थ्यांना बसलेला धक्का आणि दु:खातून बाहेर काढून ‘नीट’ फेरपरीक्षेसाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्याचे मोठे दिव्य यासाठी पार पाडावे लागेल.
 
‘नीट’ची तयारी करणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, प्रशिक्षक-मार्गदर्शक या सार्‍यांनी मान्य केले आहे की, भूकंपाच्या धक्क्यांप्रमाणेच यंदाचा ‘नीट’च्या पेपरफुटीचा धक्का सर्वाधिक तीव्रतेचा ठरला. अधिकांश विद्यार्थ्यांचा यामुळे प्रयत्न-परिश्रम व अभ्यास-प्रयास यावरील विश्वासच उडाला असून, त्यांना नव्याने परीक्षेसह परिस्थितीला सामोरे जाणे अवघड ठरले आहे. पालकांपुढील जटिल प्रश्न म्हणजे, यात आमचे व आमच्या मुलांचे काय चुकले? ‘नीट’ची परीक्षा नीट न झाल्याने या सार्‍यांपुढे निर्माण झालेल्या भयप्रद परिस्थितीमुळे त्यांचे भय आणि भीती अद्यापही कायम आहे.
 
दत्तात्रय आंबुलकर