नागपूर येथे देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्र; कचरामुक्त शहराची संकल्पना साकार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    30-May-2026   
Total Views |
Nagpur Municipal Corporation
 
नागपूर : (Nagpur Municipal Corporation) देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन २८ टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पाच्या पाहणीवेळी ते बोलत होते.
 
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ, कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीना हातीबेड उपस्थित होते. एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्र तीन टप्प्यात पूर्ण होणार असून येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत शहरातील १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर संपूर्ण प्रक्रिया आधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे.
 
या प्रकल्पासाठी ओला व सुका कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेनंतर बायोगॅस, कंपोस्ट खत तसेच सुक्या कचऱ्यापासून पावर प्लेट्स इंधन तयार होणार आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ३० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून गॅस विक्रीतून महानगरपालिकेला दरवर्षी १५ लाख रुपयांची रॉयल्टी सुद्धा मिळणार आहे.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे पुढच्या काळात शहरातील सर्व कचऱ्यावर प्रक्रिया सुलभ होणार असून नागपूर शहर हे घनकचरा व्यवस्थापन तसेच कचरा मुक्त शहर म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाईल. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही.
 
या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या बायोगॅस वर शहरातील १९८ बसेस साठी सीएनजी ही ग्रीन एनर्जी उपलब्ध होणार आहे. तसेच चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होईल. महाजनको साठी लागणाऱ्या एनर्जी प्लेट्स सुद्धा उपलब्ध होणार आहेत."(Nagpur Municipal Corporation)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....