पवई येथील फुकट नगर आणि मिलिंद नगर परिसरातील सुमारे २५० अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई

    30-May-2026
Total Views |
Mumbai Civic Action
 
मुंबई: (Mumbai Civic Action) पवई येथील फुकट नगर आणि मिलिंद नगर परिसरात असलेल्या जल अभियंता विभागाच्या जागेवरील सुमारे २५० अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या ‘एस’ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) आणि जल अभियंता विभागामार्फत संयुक्तपणे निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
 
उपायुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनात आणि सहाय्यक आयुक्त समरिन सैय्यद यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
 
सदर परिसरात शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई हाती घेण्यात आली. संबंधित जागा अतिक्रमणमुक्त करून तिचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
 
या कारवाईसाठी सुमारे १५० पोलीस कर्मचारी, ‘एस’ विभाग आणि जल अभियंता विभागातील सुमारे ५० अभियांत्रिकी अधिकारी व कर्मचारी, २०० मजूर तैनात होते. तसेच ७ जेसीबी, १० डंपर आणि इतर लहान मालवाहू वाहनांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
 
 
कारवाईदरम्यान अनधिकृत बांधकामे हटवून जागा पूर्णपणे मोकळी करण्यात येत आहे. अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित जागेभोवती कुंपण उभारण्याचे कामदेखील तातडीने हाती घेण्यात येणार असून, पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
 
दरम्यान, शासकीय व महानगरपालिका मालकीच्या जागांवरील अतिक्रमणांविरोधातील कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Mumbai Civic Action)