कडक उन्हात मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात;राज्य सरकारतर्फे मागण्यांचा विशेष मसुदा सादर;;अभ्यासकांशी चर्चा करून जरांगे निर्णय घेणार

    30-May-2026   
Total Views |
Manoj Jarange
 
जालना : (Manoj Jarange) मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी शनिवारी रणरणत्या उन्हात अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी झालेल्या चर्चेनुसार, जरांगे यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे एक विशेष मसूदा घेऊन उपोषणस्थळी पोहोचले.
 
यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "जरांगे पाटील यांनी आज उपोषणाला सुरुवात केली आहे. काल माझी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यावर आधारीत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दांबद्दल शासन स्तरावर करत असलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांना कल्पना दिली आणि शासनाची भूमिका स्पष्ट आहे.
 
केवळ आश्वासन नाही तर दिलेल्या लिखीत स्वरुपाच्या मसूद्यामध्ये १०० टक्के कारवाई होईल, याबद्दल साशंक काही कारण नाही. कारवाई बऱ्यापैकी पुढे चालली आहे. काही तृटी होत्या हे मी काही नाकारत नाही. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणे थांबली. त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. अशा अधिकाऱ्यांच्या कारवाईबद्दल सुचना दिलेल्या आहेत."
 
...तोवर सावलीत बसा
 
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना उपोषणासाठी सावलीत बसण्याची विनंती केली. ते म्हणाले की, "तुमच्या अभ्यासकांशी तुम्हाला चर्चा करून त्यावर अंतिम मान्यता घ्यायची आहे. शासनाला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही. समाजबंधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेत आहात त्याबद्दल सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. पण आपण सावलती बसा, अभ्यासक आले की, मग आपण चर्चा करु, मी उपलब्ध आहे." (Manoj Jarange)
 
 
या मसुद्यात मनोज जरांगे यांनी केलेल्या १० ते १२ मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी जरांगेंनी अभ्यासकांना उपोषणस्थळी येण्याचे आवाहन केले. यात मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना आणि सातारा गॅझेटचा जीआर काढण्यासंदर्भात सरकारने १ महिन्यांची मुदत मागितली. परंतू, हे दोन्ही निर्णय तातडीने घेण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली.
 
सरकारच्या मसुद्यात काय?
 
- सर्व जिल्ह्यांच्या शासकीय संकेतस्थळावर ५८ लाख नोंदी उपलब्ध
- हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यप्रणाली तयार केली आहे
- जात पडताळणी प्रमाणपत्राचा दर १५ दिवसाला आढावा घेणार
- स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करण्याची कार्यवाही १ महिन्यात केली जाईल
- सातारा गॅझेटबाबत महाधिवक्ता यांचे मत घेऊन कार्यवाही केली जाईल
- आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना १५ दिवसांत पैसे देणार
- कुणबी प्रमाणपत्र वितरणाचा आढावा घेण्यासाठी हेल्पलाईन
- तहसीलदार दर १५ दिवसांनी ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेणार
- शिंदे समितीला १ वर्षाची मुदतवाढ
- सारथी संस्थेचे बळकटीकरण करणार
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात अतिरिक्त निधीची तरतूद (Manoj Jarange)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....