‘आयटी’ क्षेत्रात कार्यरत असूनही, केवळ उत्सुकतेपोटी ज्योतिषविद्या शिकत, पाश्चात्त्य ‘सायना’ पद्धत, भारतीय ‘वैदिक’ आणि ‘कृष्ण’ पद्धतीवरही प्रभुत्व मिळवणार्या आदित्य दोंदे यांच्याविषयी...
गेल्या काही महिन्यांत बुवाबाजी करणार्या चार-पाच भोंदूंना अटक झाली आणि त्यामुळे जनमानसात सर्वच ज्योतिषांना सरसकट ‘भोंदू’ ठरवण्याची, ज्योतिषशास्त्रालाच ‘भंपकबाजी’चा शिक्का मारण्याची चढाओढ लागलेली दिसते. अशा परिस्थितीत, सामान्यजन ज्योतिषाकडे जाताना कचरणे स्वाभाविकच. पण, आश्चर्य असे की, आज कित्येक तरुण ‘एआय’शी चॅट करत, फक्त जन्मतारीख सांगून आपले लग्न कधी होणार, ते जाणून घेण्यात अधिक उत्सुक दिसतात! सोशल मीडिया पाहताना, ‘भोंदू पंडितांच्या नादी लागू नका; त्यापेक्षा ‘एआय’शी चॅट करा’ अशी स्पष्ट जाहिरातच त्यांनी केलेली दिसते. परंतु, जर आपण ते शास्त्र नीट समजून घेतले; तर आपल्या लक्षात येते की, भविष्य वर्तवण्यासाठी फक्त जन्मतारीख पुरेशी नसते, तर त्यासह जन्मस्थान, नक्षत्र, ग्रह-तार्यांची स्थिती असे बरेच काही समजून घेत, त्याचे एकत्रित गणित मांडायचे असते.
या संपूर्ण शास्त्राबद्दल असलेल्या उत्सुकतेपोटीच आदित्य दोंदे यांनी ज्योतिषाचे रीतसर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आदित्य यांचे वडील उद्योजक. त्यांचाच आदर्श घेत, आदित्य यांनीही ‘बीबीए’ आणि नंतर ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वकिलीचेही पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले. आपल्या उच्चशिक्षणाच्या बळावर त्यांना लगेचच चांगली नोकरीही मिळाली. यासोबत त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यातूनच ‘साडेसाती’, ‘ग्रहण’, ‘कालसर्पयोग’ वगैरे शब्द त्यांना कळले आणि हे सगळे काय असते, ते पुरते जाणून घेण्याची उत्सुकता काही त्यांना स्वस्थ बसू देईना.
थोडे शोधल्यावर त्यांना मुंबईतील ‘भारतीय विद्या भवना’त ज्योतिषशास्त्राचा ‘ज्योतिर्विद्’ आणि ‘ज्योतिष विशारद’ असा पाच वर्षांचा अभ्यासक्रम असल्याचे समजले. त्यांनी लगेचच तेथे प्रवेश घेत आपल्या ज्योतिष-अभ्यासाचा श्रीगणेशा केला.
‘भवन्स’ महाविद्यालयात प्रामुख्याने सूर्याच्या भ्रमणावर आधारित ‘सायना’ नामक पाश्चात्त्य पद्धतीनुसार ज्योतिष शिकवले जात असे. सोबत, भारतीय वैदिक पद्धतीची केवळ तोंडओळख करून देत अधिकच्या माहितीसाठी पुस्तकांची नावे सुचवली जात. आदित्य ती सगळी पुस्तके आवर्जून वाचत असत. त्यातून त्यांच्या मनात ‘वैदिक’ पद्धतीविषयी असलेली उत्सुकता आणखी बळावली आणि त्यांनी नागपूरच्या ‘कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालया’त ज्योतिषशास्त्राच्या ‘डिप्लोमा’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तेथे त्यांना चांद्र हालचालींवर आधारित ‘वैदिक’ आणि ‘कृष्ण’ पद्धतीनुसार ज्योतिषाचे शिक्षण घेता आले. तेव्हा भारतीय पद्धतीचे महत्त्व आणि विषयाचा आवाका त्यांना खर्या अर्थाने समजला. परंतु, त्या अभ्यासक्रमातील संस्कृत वाचणे, ही त्यांच्या पुढील मोठी समस्या बनली. घरचे वातावरण तसे आध्यात्मिक असले, तरी सर्व श्लोक-परवचा मराठीतच म्हटले जात असे. त्यामुळे त्यांचा संस्कृतशी तसा कधी संबंधच आला नव्हता. पण, आजही ज्योतिषशास्त्रविषयक अनेक ग्रंथ संस्कृत भाषेत उपलब्ध आहेत. आपण केवळ भाषाज्ञानाअभावी त्या ज्ञानाला मुकू नये, असे आदित्य यांचे मत होते. म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठातून संस्कृतचे ‘डिप्लोमा’ शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
हे दोन्ही डिप्लोमा करतानाच, ते भवन्स महाविद्यालयातही ज्योतिष शिकतच होते. मुंबई विद्यापीठातून संस्कृत वाचणे आणि सामान्य शब्द समजून घेण्याएवढे ज्ञान प्राप्त केल्यावर त्यांनी ज्योतिषशास्त्रात उच्चशिक्षण घेण्यासाठी पुन्हा ‘कविकुलगुरू कालिदास विद्यापीठा’त प्रवेश घेऊन ‘ज्योतिर्विज्ञान’मध्ये पदव्युत्तर पदवी संपादित केली.
आदित्य हे ‘आयटी’ क्षेत्रात काम करत असल्यामुळे ते ज्योतिषाचा सराव करण्यासाठी नियमित वेळ देऊ शकत नाहीत. परंतु, तरीही कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या समस्या-निवारणासाठी मदत करणे, त्यासाठी रत्न-खडे सुचवणे, एखादा मुहूर्त काढून देणे, वास्तुदोष दूर करणे, नवीन जन्मलेल्या बाळांची पत्रिका बनवणे, अशी छोटी-मोठी कामे ते स्वखुशीने करतात.
आदित्य यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतल्यामुळे त्यांना पाश्चात्त्य आणि वैदिक दोन्ही पद्धतींचे ज्ञान मिळाले. त्याचाही त्यांना विशेष लाभ होतो. ‘व्यक्तीला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी इच्छाशक्ती, चांगली कर्मे आणि दैवी पाठिंबा या तीन गोष्टींची आवश्यकता असते,’ हा गुरुमंत्रदेखील आदित्य कायम लक्षात ठेवतात.
फलानि ग्रहचारेण
सूचयन्ति मनीषिणः|
को वक्ता तारतम्यस्य
तमेकं वेधसं विना॥’
अर्थात, ग्रह-तार्यांची स्थिती पाहून ज्ञानीजन भविष्याचे केवळ संकेत देऊ शकतात. परंतु, नेमके काय घडणार आहे, हे विधात्याशिवाय अन्य कोण सांगू शकेल?
एखादी इच्छा ठेवून कर्म करत असताना त्याचे फळ निश्चित मिळेल, असा दैवावर विश्वास असणेही महत्त्वाचे आहे. हल्ली लोकांना सगळे काही ‘इन्स्टंट’ हवेय. सुयोग्य मंत्राचा जप करूनही समस्यांचे निवारण होऊ शकते. पण, आजची पिढी तेवढ्या समर्पणभावाने, तेवढा वेळ देऊन साधना करू इच्छित नाही. त्यामुळे झटपट फळ देणारे स्वयंघोषित ज्योतिषांचे फावते, असे आदित्य सांगतात.
"प्रत्येक व्यक्तीच्या जन्मावेळी असलेली ग्रह-तार्यांची स्थिती वेगवेगळी असल्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीसाठी वर्तवलेला अंदाज दुसर्या व्यक्तीला लागू होत नाही. ज्योतिषशास्त्र हे अथांग सागरासारखे आहे. आपण अभ्यास करत जेवढे पुढे जाऊ, तेवढी त्याची व्याप्ती आपल्याला कळत जाते. जीवनपर्यंत अभ्यास करून या ज्ञानसागरातील जास्तीत जास्त शिंपले वेचणे,” हे आदित्य यांचे स्वप्न आहे. आदित्य दोंदे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!
ओवी लेले