‘सावरकर सदन’ खरेदी करून संवर्धन करावे; हिंदू विधीज्ञ परिषदेची पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    30-May-2026   
Total Views |
Hindu Vidhijna Parishad
 
मुंबई : (Hindu Vidhijna Parishad) महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करून त्याचे संवर्धन केले जात आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तब्बल ३८ वर्षे वास्तव्य असलेले राज्यातील ‘सावरकर सदन’ सरकारने खरेदी करून त्याचे संवर्धन करावे. तसेच त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह आणि दलित हक्कांसाठी लढा दिला, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतीतपावन मंदिराची स्थापना करून तिथे आंतरजातीय भोजनाचे आयोजन करत मंदिरात हरिजनांना प्रवेश देऊन जातीयवाद संपवण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ३६ कोटी ४ लाख रुपये, तर त्यात विविध साहित्याच्या खरेदीसाठी १ कोटी २५ लाख रुपये खर्च केले. याशिवाय अन्य विविध स्मारकांसाठी ५६ कोटी रुपये, तर देहली येथील आंतरराष्ट्रीय केंद्रासाठीही सरकारने १९६ कोटी रुपये व्यय केले आहेत. याउलट सावरकर सदनाविषयी मात्र सरकार उदासीन आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान बनवावे
 
सावरकर कुटुंबाने देशाकरता मोठा त्याग केला असून त्या कुटुंबाच्या घराच्या संवर्धनाचा आर्थिक भारही त्याच कुटुंबावर टाकणे हे अन्यायकारक ठरेल. सावरकर सदनाची जागा संबंधित मालकांकडून खरेदी करून येणार्‍या पिढ्यांसाठी ते एक प्रेरणास्थान बनवावे. या वास्तूचे संवर्धन आणि त्याच्या प्रसारासाठी पुरेसा निधी द्यावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रासाठीचे बलिदान आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यातील योगदानाचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी विनंती हिंदू विधीज्ञ परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.(Hindu Vidhijna Parishad)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....