भारताची सभ्यता आणि संस्कृती जपण्याची जबाबदारी घरातील मातृशक्तीवर; साध्वी ऋतंभरा यांच्या हस्ते माता दुर्गा मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण

    30-May-2026   
Total Views |
Hindu Culture India
 
मुंबई : (Hindu Culture India) श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरातील परकोट्याच्या वायव्य कोपऱ्यात उभारलेल्या माता भगवती मंदिराच्या शिखरावर साध्वी ऋतंभरा यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहणानंतर त्यांनी सांगितले की, आजच्या पिढीला भारतातील स्त्री असण्याचा खरा अर्थ समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आपल्या संततीला कपाळावरील सिंदूराचे महत्त्व काय आहे, हे कळले पाहिजे. भारताची सभ्यता आणि संस्कृती जपण्याची जबाबदारी घरातील मातृशक्तीवर आहे. ही जबाबदारी गांभीर्याने पार पाडली, तरच या उपक्रमाचे खरे यश प्राप्त होईल.
 
याप्रसंगी राष्ट्र सेविका समितीच्या मीनाक्षी ताई, हरिद्वारहून आलेल्या महामंडलेश्वर साध्वी मैत्रीजी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षा साध्वी निरंजन ज्योती आणि साध्वी परिषदेच्या महासचिव साध्वी प्रज्ञा भारती हे देखील उपस्थित होते.
 
उपस्थितांना संबोधत साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, आज रामलला आपल्या स्थानावर विराजमान झाले आहेत. आपल्या शक्तीची पुनर्स्थापना झाली आहे. यासाठी आपल्या पूर्वजांनी ५०० वर्षांच्या दीर्घ संघर्षात पगडी बांधली नाही, पादत्राणे घातली नाहीत. या युगातील अनेक मातांनी आपल्या दोन-दोन पुत्रांचे रामजन्मभूमीसाठी समर्पण केले. सरयूचे पाणी बलिदानांच्या रक्ताने लाल झाले. आज भगवतीच्या मंदिरावर फडकणारा हा ध्वज त्या समर्पणाचे प्रतीक आहे. मातांच्या त्यागामुळेच आपल्याला हा दिवस पाहता आला आहे.
 
 
त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, येथून जाताना प्रसाद म्हणून माता जगदंबेचा सिंदूर घेऊन जा. तो प्रसाद घरी गेल्यानंतर आपल्या मुलांना कपाळावरील सिंदूराचे महत्त्व आणि त्यामागील संस्कार समजावून सांगा.
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी उपस्थित मातृशक्तीला मंदिर आणि परकोट्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत वात्सल्य परिवारातील सुमारे ६० बालिका, माता आणि साध्वी उपस्थित होत्या. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीशी संबंधित सुमारे २५० माता-भगिनी, ज्यांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात सक्रिय भूमिका बजावली होती, त्या उपस्थित होत्या. याशिवाय अयोध्या शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ३,५०० हून अधिक माता-भगिनींचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
 
इच्छाशक्ती दाखवली तर हिरण्यकश्यपूच्या घरातही प्रह्लाद जन्माला येतो
 
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांतील फरक समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या, शासित असणे म्हणजे अनुशासित असणे नव्हे. तुम्ही इच्छाशक्ती दाखवली तर हिरण्यकश्यपूच्या घरातही प्रह्लाद जन्माला येतो; आणि इच्छाशक्तीचा अभाव असेल तर ऋषी विश्रवांच्या घरात रावण जन्मतो. आपल्या शक्तीची जाणीव ठेवून आणि आपल्या कर्तव्याची जाणीव मनात बाळगून येथेून जा.
 
प्रत्येक मुलीला दुर्गेसारखे सक्षम घडविण्याचा संकल्प करा
 
भारतीय स्त्रीत्वाचा अर्थ समजून घेण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की, “आंचलाचे सामर्थ्य किती महान आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या मुली कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीच्या किंवा धर्मांतराच्या कटांचा बळी ठरणार नाहीत, यासाठी प्रत्येक मुलीला दुर्गेसारखे सक्षम घडविण्याचा संकल्प करायला हवा. तसेच गोमातेच्या रक्ताचा प्रत्येक थेंब भूमातेची वेदना वाढवत असेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असाही संकल्प करायला हवा.”(Hindu Culture India)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक