येत्या २५ जूनपासून राज्यात ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’

    30-May-2026   
Total Views |
Drug Free Maharashtra
 
मुंबई : (Drug Free Maharashtra) येत्या २५ जूनपासून राज्यभर ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’ राबवण्यात येणार असून या अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
 
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत सुमारे १६० मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. तसेच महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. किनारी भागांतील तिवरांच्या अनधिकृत तोडी, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
 
 
यावेळी लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक उद्याने, मैदाने, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि काही ठिकाणी अमली पदार्थांच्या वापरासंदर्भातील तक्रारी आणि सूचना मांडल्या. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई करावी. तसेच नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी दिले.
 
व्यापक जनजागृती करा - मंत्री मंगलप्रभात लोढा
 
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "राज्य शासनाच्या ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक स्तरांवर व्यापक जनजागृती केली जाणार आहे. युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीकडे प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन जनजागृतीस हातभार लावावा." (Drug Free Maharashtra)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....