दिल्ली पोलिसांकडून दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; नऊ जण जेरबंद;आयएसआय व दाऊदशी संबंधित लोकांच्या इशाऱ्यावर होते नाचत

    30-May-2026   
Total Views |
Delhi Police

मुंबई : (Delhi Police) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'आयएसआय' आणि मुंबई अंडरवर्ल्डशी (दाऊद) संबंधित असलेल्या एका संशयित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत नऊ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून शस्त्रे आणि स्फोटक साहित्याचा साठाही जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती आहे की, ही कारवाई दीर्घकाळापासून सुरू असलेला तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. या मॉड्यूलच्या हालचालींवर काही काळापासून नजर ठेवली जात होती, त्यानंतर एक समन्वित मोहीम राबवून यातील सदस्यांना अटक करण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही नेपाळमूळचे व्यक्तीही आहेत. त्यांना विशेषतः दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षित केले जात होते. या संपूर्ण नेटवर्कचे संचालन कोण करत होते आणि भारतातील त्यांचे स्थानिक सहकारी कोण आहेत, याचा तपास यंत्रणा आता शोध घेत आहेत.
 
त्याचबरोबर प्राथमिक तपासात समोर आले आहे की, अटक करण्यात आलेले आरोपी कथितरित्या पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय आणि मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांच्या इशाऱ्यावर काम करत होते. त्यांच्यावर राष्ट्रीय राजधानीतील महत्त्वाच्या वास्तू आणि सुरक्षा दलांच्या तळांना लक्ष्य करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आरोपी सार्वजनिक ठिकाणे आणि सुरक्षा प्रतिष्ठानांवर हल्ल्याचा कट रचत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
 
सध्या अटक केलेल्या आरोपींची चौकशी करून त्यांचे संपूर्ण नेटवर्क, इतर साथीदारांची ओळख आणि जप्त करण्यात आलेली शस्त्रे व स्फोटकांच्या स्रोताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणात सीमेपलीकडील संबंध, फंडिंग नेटवर्क आणि परदेशात बसलेल्या म्होरक्यांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहेत.
 
पोलीस चौकशीतून समोर आले की, संशयित आरोपी पॉवर प्लांट (ऊर्जा प्रकल्प), न्यूक्लियर प्लांट (अणू ऊर्जा प्रकल्प), वीज केंद्र, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांना लक्ष्य करण्याचा कट रचत होते. पाकिस्तानमधून पाठवण्यात आलेली स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना अंडरवर्ल्डच्या मदतीने देशाला हादरवून सोडण्याचा हा धोकादायक कट रचत होती.
 
दहशतवादी मॉड्यूलची कार्यपद्धती कशी चालते?
 
स्थानिक युवक किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची भरती करणे.
बनावट ओळखपत्रे, सिम कार्ड आणि बँक खात्यांचा वापर करणे.
एन्क्रिप्टेड अॅप्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सीमापार हँडलर्सशी संपर्क ठेवणे. 
हवाला नेटवर्कच्या माध्यमातून निधी मिळवणे.
भाड्याच्या घरांचा आणि सुरक्षित आश्रयस्थळांचा (सेफ हाऊस) वापर करणे.
लक्ष्यांची रेकी करून लहान-लहान गटांद्वारे कारवाया अंजाम देणे.(Delhi Police)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक