मुंबई : (Congress Government Kerala) केरळ विधानसभेत ‘वंदे मातरम्’ वरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विधानसभेतील आपल्या अभिभाषणादरम्यान 'वंदे मातरम्' पूर्णपणे गायले गेले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता मुख्यमंत्री व्ही. डी. सथीसन यांनी प्रतिक्रिया देत, वंदे मातरम् संपूर्ण गाणे बंधनकारक नाही; असे म्हटल्याचे निदर्शनास आलेय. त्यांचे म्हणणे आहे की, यासंदर्भात संसदेकडून कोणताही कायदा मंजूर करण्यात आलेला नाही.
व्ही. डी. सथीसन यांच्या म्हणण्यानुसार, संसदेकडून केवळ काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. काँग्रेस आणि तिची युती यूडीएफ एका विशिष्ट राजकीय विचारधारेच्या चौकटीत काम करतात आणि पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयांनुसार त्यांची भूमिका ठरते. या विषयावर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका स्पष्ट असून तीच भूमिका युतीलाही लागू होते.
कार्यक्रमानंतर राज्यपाल आर्लेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यपाल सभागृहात उपस्थित असताना वंदे मातरम् संपूर्ण सादर केले गेले पाहिजे. तसेच सभागृहात हे गीत केवळ वाजविण्यात आले, प्रत्यक्ष गायले गेले नाही, असेही त्यांनी नमूद केले. या वादानंतर भाजपने काँग्रेस सरकारवर राष्ट्रीय गीताचा आणि घटनात्मक परंपरांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. भाजपचे प्रवक्ते शेहझाद पूनावाला यांनी म्हटले की, राज्य सरकारने वंदे मातरम्चे संपूर्ण सादरीकरण होईल याची खात्री केली नाही. (Congress Government Kerala)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक