मानवी मनाचा सूक्ष्म निरीक्षक

    03-May-2026
Total Views |
Raghu Rai
 
आपल्या कॅमेर्‍यातून बदलत्या भारताचा पट उलगडणारे एक प्रख्यात छायाचित्रकार रघु राय यांचे दि. २६ एप्रिल रोजी निधन झाले. एखाद्या साध्या प्रसंगातील सौंदर्यही अचूकपणे कॅमेर्‍यात टिपण्याची राय यांची हातोटी सर्वार्थाने विलक्षण होती. सत्ता, एकाकीपणा आणि मानवी भावभावनांचा संगम खुबीने कॅमेर्‍यात कैद करण्याची त्यांची अनोखी शैली विस्मयकारक अशीच. म्हणूनच, त्यांच्या छायाचित्रांतून भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रवासाचे यथार्थ दर्शन घडते. त्यांच्या याच अद्भुत छायाचित्रणाच्या साधनेचा मागोवा घेणारा हा लेख...
 
'बेटर फोटोग्राफी’च्या मासिकात रघु राय यांचा लेख प्रकाशित करण्याचा प्रस्ताव होता आणि त्यानिमित्ताने माझी त्यांच्याशी झालेली पहिली जवळची भेट आजही तितकीच जिवंत आहे. मुंबईत एका प्रदर्शनासाठी ते आले असताना, मी त्यांना माझ्या ऑफिसमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रवास सोपा व्हावा म्हणून मी स्वतः विमानतळावर त्यांना घ्यायला गेलो. सहा फूट उंच, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि एक विलक्षण सहजता... म्हणूनच रघु राय कोणाच्याही मनात पटकन घर करायचे. विमानतळापासून प्रभादेवीपर्यंतचा प्रवास म्हणजे जणू एक चालतं-बोलतं वर्कशॉपच होतं. त्यांच्या गळ्यातला कॅमेरा क्षणभरही विश्रांती घेत नव्हता-रस्त्यावरची माणसं, दिवे, सावल्या, गोंधळ, शांतता सगळं काही ते टिपत होते. मी थोड्या मिश्किलपणेच विचारलं, "कॅमेर्‍याशिवाय तुम्ही जगाकडे पाहतच नाही का?” त्यावर त्यांनी हलकंसं हसत उत्तर दिलं - ”i like to read people through my camera.” त्या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण दृष्टिकोनाचं सार दडलं होतं. त्याक्षणी मला जाणवलं - हा केवळ फोटोग्राफर नाही, तर मानवी मन वाचणारा एक सूक्ष्म निरीक्षक आहे.
 
दिल्ली, कोलकाता आणि भारतातील असंख्य शहरांच्या गल्लीबोळांतून फिरताना राय यांनी साध्यासुध्या क्षणांतलं असाधारण सौंदर्य शोधलं. त्यांच्या छायाचित्रांत मानवी चेहर्‍यांमधील ईश्वरीय भाव, जीवनातील सूक्ष्म विनोद आणि वेदना यांचा एक अद्भुत समतोल दिसतो. ते केवळ दृश्य टिपत नव्हते, ते त्या क्षणाचा आत्माच पकडत होते. त्यांच्या कॅमेर्‍याला जणू एक अंतर्मुख नजर लाभली होती, जी गोष्टी दिसतात त्यापलीकडचं काहीतरी उलगडणारी! त्यांच्या फ्रेममध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही केवळ विषय राहत नसे, तर एक कथा बनत असे. त्यांच्या हातातला निकॉन कॅमेरा एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यासारखा होता. सामान्य नजरेला न दिसणारे तपशीलही टिपण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. विशेषतः कोलकाता आणि दिल्लीच्या रस्त्यांवर त्यांनी असंख्य चेहरे, भाव आणि क्षण जिवंत केले. गर्दीतून एखादा भाव, एखादी नजर, एखादा स्पर्श ओळखण्याची त्यांची ताकद आश्चर्यकारक होती. त्यांच्यासोबत असताना नेहमी असं वाटायचं की, पुढच्या वळणावर त्यांना काहीतरी अद्भुत सापडणार आहे आणि ते खरोखर सापडायचंही. कारण, त्यांच्या दृष्टीतच एक अखंड शोधाची भूक होती.
 
चांदणी चौकातील गजबज आणि जामा मशिदीच्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टिपलेलं १९८२ सालचं संध्याकाळच्या प्रार्थनेचं छायाचित्र हे त्यांच्या दृष्टीचं उत्कृष्ट उदाहरण. गुडघ्यावर बसून प्रार्थना करणारी एक स्त्री, मावळत्या प्रकाशाचं तिच्याभोवती निर्माण झालेलं वलय आणि पार्श्वभूमीला उभी असलेली भव्य वास्तू - हा क्षण त्यांनी केवळ टिपलाच नाही, तर अमर केला. त्या छायाचित्रात धर्म, मानवी भाव, प्रकाश आणि शांतता यांचा एक अद्भुत संगम आहे. रघु राय यांच्या छायाचित्रांतून भारताचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रवास स्पष्टपणे दिसतो. ’Thousand lives : photographs 1965-2005' १९६५-२००५’ या त्यांच्या प्रदर्शनातून त्यांच्या कामाचा व्यापक पट समोर येतो. त्यांनी सामान्य क्षणांना असामान्य उंचीवर नेलं. त्यांच्या छायाचित्रांतून देशाच्या अनागोंदीतून सुव्यवस्थेकडे जाणार्‍या प्रवासाचं सूक्ष्म चित्रण दिसतं. ते केवळ छायाचित्रकार नव्हते, तर काळाचे साक्षीदार होते.
 
सत्ताधार्‍यांशी त्यांचं नातंही तितकंच प्रामाणिक आणि प्रभावी होतं. इंदिरा गांधी यांच्यासोबतचे त्यांचे संबंध निकटचे होते आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक दुर्मीळ क्षणही राय यांनी कॅमेर्‍यात बंदिस्त केले. सत्ता, एकाकीपणा आणि मानवी भावभावनांचा संगम त्यांच्या छायाचित्रांत स्पष्टपणे दिसतो. मनेका गांधींचं एकाकी छायाचित्र असो किंवा इंदिरा गांधी यांच्या निधनानंतरचे भावनिक क्षण, राय नेहमी योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित असत. इतिहास घडत असताना त्याची नोंद घेण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. त्यांनी होमाई व्यारावाला, कुलवंत रॉय, सुनील जनाह यांसारख्या अग्रगण्य छायाचित्रकारांच्या परंपरेला पुढे नेत ती अधिक समृद्ध केली. त्यांच्या कामात अध्यात्माची एक सूक्ष्म छटा होती. मदर तेरेसा आणि दलाई लामा यांची त्यांनी टिपलेली छायाचित्रं केवळ प्रतिमा नसून, ती एक आध्यात्मिक अनुभूती देतात. त्यांच्या फ्रेममध्ये मानवी चेहर्‍यांपलीकडे काहीतरी दिव्य जाणवतं.
 
दि. २६ एप्रिल रोजी दिल्ली येथे कर्करोगाशी दीर्घ लढा दिल्यानंतर त्यांचं निधन झालं. परंतु, त्यांच्या छायाचित्रांतून ते आजही जिवंत आहेत. त्यांनी केवळ क्षण टिपले नाहीत, तर त्यांनी इतिहासाची नोंद ठेवली. आंदोलने, संघर्ष, बदल, संप आणि पुनर्निर्मिती, या सगळ्यातून त्यांनी भारताच्या लोकशाहीचा चेहरा जगासमोर आणला. त्यांच्या छायाचित्रांतून एक देश श्वास घेताना दिसतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण छायाचित्रकार घडले. राय यांचा विनम्र स्वभाव, चौकटीबाहेर पाहण्याची वृत्ती आणि लोकांशी जोडून घेण्याची ताकद ही त्यांची खरी ओळख होती. ते शिकवताना केवळ तंत्रावर भर देत नसत, तर दृष्टिकोन घडवण्यावर भर देत. ‘तू काय पाहतोस?’ यापेक्षा ‘तू कसं पाहतोस?’ हा प्रश्न ते अधिक महत्त्वाचा मानायचे. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे, त्यांच्यासाठी छायाचित्रण ही केवळ कला नव्हती, ती एक साधना होती. संयम, संवेदनशीलता आणि सतत जागरूक राहण्याची वृत्ती यांचा मिलाफ म्हणजे त्यांची कार्यशैली. ते एखाद्या क्षणाची वाट पाहू शकत, तासन्तास, केवळ योग्य फ्रेम मिळावी म्हणून! आणि जेव्हा तो क्षण येत असे, तेव्हा तो इतिहास बनत असे!
 
आज त्यांच्या छायाचित्रांकडे पाहताना असं वाटतं, भारताचा इतिहास अजूनही जिवंत आहे भिंतींवर, पुस्तकांत आणि आपल्या स्मरणात. रघु राय यांनी केवळ आपल्यासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाचा धडा दिला आहे - भारतीय छायाचित्रकारांनीही तितक्याच निष्ठेने, सातत्याने आणि संवेदनशीलतेने आपल्या संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. आपल्या सभोवतालच्या वास्तवात, माणसांत, परंपरांमध्ये आणि बदलत्या काळात दडलेली ही दृश्य वारसा जपण्याची जबाबदारी प्रत्येक कलाकाराने मनापासून स्वीकारली पाहिजे. कारण, भविष्यातील पिढ्या जेव्हा मागे वळून पाहतील, तेव्हा त्यांना आपला काळ समजून घेण्यासाठी अशाच प्रामाणिक नजरेची गरज भासेल. रघु राय यांची छायाचित्रं आपल्याला शिकवतात की, सौंदर्य भव्यतेतच नसतं; ते साध्या माणसांत, क्षणभंगुर घटनांत आणि दैनंदिन जीवनाच्या सूक्ष्म तपशीलांत दडलेलं असतं. त्या सौंदर्याला ओळखणं, जपणं आणि जगासमोर मांडणं-हीच खरी छायाचित्रकाराची जबाबदारी आहे.
 
- शिरीष कारळे
(लेखक ज्येष्ठ छायाचित्रकार आहेत.)