नराधमांचे करायचे काय?

    03-May-2026   
Total Views |
Pune Horror Case
 
पुण्यातील भोर-नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. त्या नराधमाला कठोरातील कठोर आणि तत्काळ शिक्षा होणे गरजेचे. अजाण, निष्पाप बालिका राक्षसी प्रवृत्तीची बळी ठरली. हे सगळे प्रकार कसे आणि केव्हा थांबणार? कायदा त्याचे काम करेलच. पण, समाजाचे काय? घटना घडली, आता यापुढे अशा घटना होऊ नये, यासाठी काय करता येईल? याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
उन्हाळ्याच्या सुटीत चार वर्षांची बालिका नसरापूर, भोरला आजीकडे आली होती. ती बाहेर खेळत होती. दुपारची वेळ आणि इतक्यात ६५ वर्षांची व्यक्ती तिथे आली. तिला म्हणाली, "तुला गाईचे वासरू बघायचे आहे का, चल तुला दाखवतो.” अजाण बाळ वासरू बघायला मिळेल म्हणून त्याच्यासोबत गेले. त्या नराधमाने गोठ्यात नेऊन त्या बालिकेवर निर्घृण बलात्कार केला. या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून तिचा दगडाने ठेचून नंतर खून केला. शेणाच्या ढिगार्‍याखाली तिचा मृतदेह टाकून दिला. लिहितानाही हात थरथरतात... संताप, दुःख या भावना शब्दांत व्यक्त होऊच शकत नाहीत. कायद्याने या राक्षसाला शिक्षा होईलच. पण, या नराधमाला फाशीची किंवा जन्मठेपेची सजा पुरेशी आहे का? तर नाही, त्याचे तुकडेतुकडे करून त्याला तडफडत ठेवून, किडे पडून मरायचीच शिक्षा द्यायला हवी. याहीपेक्षा भयंकरातली भयंकर शिक्षा त्याला मिळायला हवी. अर्थात, कायदा आणि त्याद्वारे दिलेली शिक्षा भावनांवर आधारित होत नसते.
 
या घटनेनेही महाराष्ट्रासह अवघा देश हादरला. या घटनेचा मागोवा घेताना माहिती मिळते की, याच घटनेतील गुन्हेगाराला ७५ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार केल्याबद्दल आणि स्वतःच्या पुतणीवरही अत्याचार केल्याप्रकरणी १९९८ आणि २०१५ साली शिक्षा झाली होती. दोन्ही वेळा तुरुंगात शिक्षा भोगून तो बाहेर आला होता. काहीच काम करत नसे, गावभर फिरे आणि अशेच धंदे करे. थोडक्यात, त्याची मानसिकता तशीच घाणेरडी होती. खरेतर असे वाटते की, बिचार्‍या बालिकेचा खून उघडकीस आला. पण, या गुन्हेगाराने असे आणखीनही गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. बालिकांवर अत्याचार करावा, अशी मानसिकता यांच्यामध्ये येते कुठून? ना कसली भीती, ना कसली लाज! नसरापूरच्या घटनेने एक गोष्ट विचार करायला लावली, ती म्हणजे निर्घृण बलात्कार प्रकरणातले गुन्हेगार असेच असतात, ज्यांनी यापूर्वीही अनेकदा बलात्कार, विनयभंग वगैरे गुन्हे केलेले आहेत. ते जामीन मिळून बाहेर आलेले असतात किंवा पूर्वीच्या गुन्ह्याची शिक्षा भोगून बाहेर आलेले असतात.
 
एक गुन्हा केला, त्याची शिक्षा भोगून कदाचित गुन्हेगार सुधरू शकतो. पण, एकदा गुन्हा केला, शिक्षा भोगली; पुन्हापुन्हा तोच गुन्हा करून शिक्षा भोगून तुरुंगातून ये-जा करणारे बलात्काराचे गुन्हेगार त्यांचे काय? कुत्र्याचे शेपूट वाकडे असते, ते सरळ होते का? ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ या म्हणी काय उगीच आहेत. माणसाच्या मनाचे परिवर्तन होऊ शकते म्हणतात. पण, माणसाच्या मनाचे ना? यांसारख्या नराधमांची नाही. त्यांची विकृत मानसिकता बदलणार नाहीच, हे सत्य असते. अशा वेळी या गुन्हेगारांवर जरब बसेल, अशी कायदेशीर यंत्रणा असायलाच हवी. समाजाने या असल्या लोकांपासून सावध असायलाच हवे. ज्या गावात बलात्कार किवा विनयभंगाचे वारंवार गुन्हे करणारी व्यक्ती असेल, त्या गावात, त्या परिसरात त्या व्यक्तीबद्दल फोटोसकट असे लिहायला हवे की, ‘या गावात हा नराधम, बलात्कारी विकृत राहात आहे.’ अनेकदा या असल्या नराधमांना पोलीस स्थानकात दररोज हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात येतात. पण, तरीही प्रश्न आहे, असे निर्देश किती दिवस देणार? त्यामुळे सातत्याने असे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांसाठी कठोर आणि कायमची सजा हवी. माणूस सुधारू शकतो, हे गृहीतक यांच्यासाठी नसावे. कारण, यांच्यातला माणूस मेलेला असतो. उरलेली असते, ती फक्त राक्षसी विकृतता. जिला ना आई समजत, ना लेकरू!
 
बालिकांवरच्या अत्याचाराच्या घटनेत अनेकदा असेच दिसून आले की, त्या एकट्या खेळत असतात. त्यांना कुणीतरी आमिष देते. जगाच्या वाईट प्रवृत्तींचा मागमूसही नसलेल्या बालिका मग त्या नराधमांच्या शिकार बनतात. या सगळ्या परिप्रेक्ष्यात प्रत्येक आई-बाबांची आणि नातेवाईकांची त्यांच्या संबंधित मुलांप्रतिचे कर्तव्य वाढले आहे. आपले मूल कुठे आहे, कुणासोबत आहे, याची २४ तास डोळ्यांत तेल घालून काळजी घ्यायलाच हवी. यावरून वाचलेली एक घटना आठवली. शहरात नव्याने राहायला आलेले एक
दाम्पत्य. त्यांना एक वर्षाची मुलगी. ती मुलगी आईपासून क्षणभरही दूर राहत नसे. स्वयंपाक करताना बालिकेची आई तिला पाळण्यात ठेवे; पण ती रडत असे. शेजारचा किशोरवयीन मुलगा रडणे ऐकून आला आणि त्या महिलेला म्हणाला,"बेबी रडतेय ना, तुम्ही स्वयंपाक करा. तोपर्यंत मी बेबीला फिरायला नेतो,” असे म्हणून दोन-तीन दिवस त्या दोन वर्षांच्या बेबीला गार्डनमध्ये नेले. बेबी गार्डनमधून आली की, तिच्या अंगावर लाल चट्टे दिसायचे. पण, डास चावले किंवा कुठली तरी अ‍ॅलर्जी असेल म्हणून तिच्या आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, तिसर्‍या दिवशी गार्डनमधून एकटाच तो परत आला.
 
बेबी कुठे आहे विचारल्यावर, "ती हरवली. कदाचित, घरी आली असेल म्हणून मी घरी पाहायला आलो,” असे त्याने सांगितले. पण, सत्य होते की, त्याने त्या बालिकेवर अत्याचार केला होता आणि मृतदेह झुडपात फेकून दिला होता. त्या गुन्हेगार मुलाला जेव्हा पोलिसांनी पकडले, कसून चौकशी केली, त्यावेळी त्याने कबूल केले की, दररोज तो त्या बालिकेसोबत अश्लील कृत्य करायचा. त्यामुळे तिच्या अंगावर रॅशेस उठलेले असायचे. पण, आईने दुर्लक्ष केले. तिच्या कल्पनेतही नव्हते की, तिच्या मुलीसोबत असे घडत आहे. पण, त्यामुळे त्या विकृत मुलाची हिंमत वाढली आणि त्याने बालिकेवर अत्याचार केला. त्या अत्याचाराने ती लहान बालिका मृत्युमुखी पडली. त्या महिलेने त्या मुलावर विश्वास ठेवला नसता तर? मुलीच्या अंगावर संशयास्पद रॅशेस उठतात, तर त्याबद्दल चौकशी केली असती तर? आपल्या अजाण बालकांना आपण कशाच्या विश्वासावर कुणाच्याही हातात सोपवतो? बालकांच्या सुरक्षिततेसाठी जेवढे उपाय योजू, तेवढे कमी आहेत. पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंबामध्ये आई-वडील जागेवर उपलब्ध नसायचे, तरी बालकांची काळजी घ्यायला इतर नातेवाईक असायचे. पण, आता परिस्थितीमुळे संयुक्त कुटुंबे तुटली. अशा वेळी पाळणाघर किंवा मुलांसाठी घरी काम करायला एखादी व्यक्ती नोकरीला ठेवावी लागते. अशा वेळी ते पाळणाघर किंवा घरात कामाला ठेवणार्‍या व्यक्तीची पोलिसांतर्फे तपासणी आणि त्यांच्यावर गुन्हे आहेत का, याची पडताळणी करणे गरजेचे आहे.
पाळणाघरातील प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ माहिती असणेही आजघडीला तितकेच गरजेचे आहे. मुले शाळेत, खासगी शिकवणीला किंवा छंदवर्गाला जातात, इथेही हीच काळजी घेतलीच पाहिजे. आपल्या हातून जराही काही वाईट घडले, तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील, ही भीती संबंधित व्यक्तीच्या मनात उत्पन्न करणे गरजेचे आहे.
 
तसेच प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत एक समिती बनावी, ज्यांनी सर्वानुमते पोलिसांच्या आणि लोकांच्या सहमतीने अशा विकृतांची एक यादी बनवावी. तसेच परिसरातला कोणता भाग कधी निर्जन असतो, याचीही यादी करावी. त्या निर्जनस्थळी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे किंवा लोकांची वर्दळ राहील, अशी व्यवस्था करावी. हे काम कठीण आहे; पण अशक्य नाही. लोकसहभागातून ही व्यवस्था उभी राहू शकते. पण, कितीही टाळला; तरी मनात विचार येतो की, नसरापूरच्या घटनेमध्ये एकट्या बालिकेला बाहेर खेळायला सोडायला नको होते. कदाचित, बालिकेच्या नातेवाईकांना स्वप्नातही वाटले नसेल की, आपल्या अंगणातून कुणी तिला नेईल. सगळा गाव आपलाच आहे. इथे कसली भीती, असा विश्वास त्यांच्या मनात असणार. पण, त्यांच्या या भोळ्या विश्वासाने घात केला.
आता या असल्या नराधमांचे करायचे काय? ‘तारीख पे तारीख’ देऊन सोडायचे की, होऊ घातलेल्या गुन्हेगाराला धडकी भरेल, अशी तत्काळ भयंकर न्यायपूर्वक शिक्षा द्यायची? या सगळ्या पार्श्वभूमीवर माणुसकीला काळिमा फासणार्‍या त्या विकृत गुन्हेगाराला तत्काळ आणि न्यायाच्या अंतिमतेची शिक्षा व्हायलाच हवी!
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.